आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ४ : शाळा व महाविद्यालय परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी राज्य सरकार ‘तंबाखूमुक्त शाळा अभियान’राबवत आहे. दुसरीकडे शिक्षण विभाग आणि पोलिस यंत्रणेच्या अनास्थेमुळे वर्षभरात ६८० पैकी केवळ ९४ शाळाच ‘तंबाखूमुक्त’ झाल्याची माहिती समोर आली आहे. कहर म्हणजे, काही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या दप्तरात तंबाखूच्या पुड्या सापडल्याची वस्तुस्थिती अभियानातून समोर आली आहे.
तंबाखूमुळे होणारे आजार आणि मानवी मृत्यू टाळण्यासाठी केंद्र सरकारने तंबाखू वापरावर नियंत्रण आणण्यासाठी सिगारेट व तंबाखूजन्य नियंत्रण कायदा २०१३ तयार केला. त्याच्या अंमलबजावणीसाठी २०१५ मध्ये राज्य सरकारने शालेय शिक्षण विभागासाठी स्वतंत्र आदेश काढला. त्यानुसार परिसरात तंबाखूविरहित वातावरण तयार करण्याची जबाबदारी शाळांवर टाकण्यात आली आहे. या आदेशानुसार शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध, तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांची माहिती देणारे फलक लावणे बंधनकारक केले आहे. अद्याप ५८६ शाळा तंबाखूमुक्त होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
पाहणीत काय आढळले...
शहरातील काही शाळांच्या परिसराचा फेरफटका मारला असता १०० यार्ड आतील परिसरात सर्रास तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे, तर व्यसनमुक्तीविषयक जनजागृती, तसेच प्रतिबंधात्मक फलकही तेथे दिसले नाहीत. शालेय परिसरात तंबाखू, गुटख्याच्या पुड्या आढळून येतात. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ‘तंबाखूमुक्त शाळा’ असा फलक लावलेले नाही.
शाळांच्या प्रवेशद्वाराशेजारीच टपऱ्या
शहरातील काही महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारांजवळील चहा व फास्टफूडच्या टपऱ्यांवर गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री सुरू आहे. या बेकायदा टपऱ्या हटवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. १०० यार्डांच्या आत अशा पदार्थांची विक्री न करण्याविषयी कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयांची आहे. त्यामुळे महाविद्यालये आणि महापालिका तसेच पोलिस प्रशासनाच्या समन्वयातून ही कारवाई होणे अपेक्षित आहे.
बालहक्क कायद्यानुसार कारवाई कधी?
बालकांना आणि बालकांकडून तंबाखूजन्य पदार्थ विक्री करवून घेण्यावर प्रतिबंध आहे. अशा व्यक्तींवर बालहक्क कायद्यानुसार कारवाई केली जाते. मात्र, शहरातील बहुसंख्य कॅन्टीन, चहाच्या हातगाड्या, टपऱ्यांवर सिगारेट, गुटखा, तंबाखूची सर्रास विक्री होते. या ठिकाणी बालकामगार काम करतात. ग्राहकांना चहा, नाश्त्याच्या ऑर्डरबरोबरच गुटखा, सिगारेट पुरवण्याचे कामही करावे लागते.
अन्न व औषध प्रशासनाकडून बोटचेपी भूमिका
या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईबाबत बोटचेपी भूमिका घेतली जात आहे. परिणामी, छोट्या पानटपऱ्या ते मोठ्या किराणा दुकानापर्यंत सर्वत्र तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम आणि बेकायदा विक्री होत आहे. अन्न व औषध आणि महापालिका प्रशासनाने शालेय परिसरांची तपासणी करून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास मनाई
शहरात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास मनाई आहे. मात्र, चौकाचौकांत टपऱ्यांबाहेर, हॉटेल, उद्यान परिसर या ठिकाणी खुलेआम धूम्रपान सुरू असते. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांकडून विहित रकमेचे चलन फाडून दंडात्मक कारवाई करण्यात येते.
कोट
‘‘देशभरात दिवसाला सरासरी पाच हजार मुले व्यसनामध्ये अडकत आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील शाळांमध्ये आम्ही काम केले आहे. यावेळी काही विद्यार्थ्यांकडे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ आढळल्याचे शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले. आम्ही शाळांमध्ये जाऊन समुपदेशन करतो. विद्यार्थ्यांना तंबाखूचे दुष्परिणाम सांगून त्यांना परावृत्त केले जाते आणि शाळा शंभर टक्के तंबाखूमुक्त करण्यासाठी आमचा प्रयत्न असतो.
-डॉ. जयश्री सारस्वत, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा रुग्णालय, पुणे
शहरातील शाळांची संख्या
-महापालिका शाळा - १३४
-स्वयंसहाय्यित शाळा - ३१९
-खासगी अनुदानित - १३५
-खासगी विनाअनुदानित - ५३
-खासगी २० टक्के अनुदानित -२७
-समाज कल्याण विभाग -५
-भटकी विमुक्त विभाग - २
-अनधिकृत शाळा -३
-अपंग कल्याण विभाग -१
-आदीवासी कल्याण विभाग -१
-एकूण -६८० शाळा
अशी आहे वस्तूस्थिती
- वर्षभरात ६७८ पैकी केवळ ९४ शाळांमध्ये १०० टक्के यश
- तपासणीत विद्यार्थ्यांच्या बॅगेत सापडले तंबाखूजन्य पदार्थ
- शाळांच्या परिसरात जनजागृतीपर फलकांचा अभाव
- महाविद्यालय परिसरातील टपऱ्यांवर तंबाखूजन्य पदार्थ विक्री
- शालेय परिसरात आढळल्या तंबाखू, गुटख्याच्या पुड्या
- टपऱ्यांवरील बालकामगारांमार्फत तंबाखूज पदार्थांचा पुरवठा
- सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास मनाई, तरीही खुलेआम विक्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.