पिंपरी वर्धापन दिन ः वास्तू पुरवणी
--
गडकिल्ल्यांचे सानिध्य
पिंपरी चिंचवड शहराची नगरपालिका होऊन आता ५० वर्षे होऊन गेली आहेत. या पाच दशकांमध्ये नगरपालिकेचे रुपांतर महापालिकेत झाले. वेगवान स्थित्यंतरे अनुभवली आहेत. शहराला आजूबाजूच्या गडकिल्ल्यांचा, ऐतिहासिक वास्तुंचा वैभवशाली वारसा प्राप्त झाला आहे. त्यांच्या सानिध्यात पर्यटन स्थळेही विकसित झाली आहेत. या गडकिल्ल्यांचा वाटा निश्चितच मोलाचा नि निर्णायकही आहे.
- संदीप तापकीर, इतिहास अभ्यासक
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. पुण्यातून किंवा दक्षिण महाराष्ट्रासह कोकणातून शिवनेरीला जाण्यासाठी पिंपरी चिंचवडमधूनच जावे लागते. याच शिवाजी महाराजांनी किल्ल्यांच्या साक्षीने स्वराज्य निर्माण केले आणि वाढवले. अशा छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ल्यांशी अनन्यसाधारण नाते होते. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले किल्ले हे आपल्या शहराच्या अवतीभोवती आहेत, हे आपले भाग्यच म्हणावे लागेल. लोहगड, विसापूर आणि राजमाची या तीन किल्ल्यांना शिवस्पर्श झाला आहे, असे आपण खात्रीशीररित्या म्हणू शकतो. या तीन किल्ल्यांच्या व्यतिरिक्त पिंपरी चिंचवड शहराला लागून असणाऱ्या मावळ तालुक्यातील तुंग, तिकोना, मोरगिरी, अनघाई आणि इंदोरी हे इतर पाच किल्ले आहेत. या पहिल्या तीन आणि नंतरच्या पाच अशा एकूण आठ किल्ल्यांपैकी सात किल्ले हे गिरीदुर्ग प्रकारात मोडतात, तर इंदोरी स्थलदुर्ग प्रकारात मोडतो. या आठही किल्ल्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येक किल्ल्याला विस्तीर्ण इतिहास आहे. किल्ला पाहताना आजूबाजूची मंदिरे, लेणी यांनाही भेट देऊ शकतो.
लोहगड
युनेस्कोने शिवछत्रपतींच्या १२ किल्ल्यांना ११ सप्टेंबर रोजी जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. त्यातील एक किल्ला म्हणजेच लोहगड होय. लोहगडाला शिवछत्रपतींच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. हा किल्ला सर्पाकार द्वाररचनेसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. याबरोबरच गडावरची विंचूकाटा माचीदेखील आपले वेगळे अस्तित्व दर्शवते. अशा पद्धतीची अनोखी माची आणि द्वाररचना यांमुळेच हा किल्ला जागतिक वारसा स्थळ ठरला आहे. लोहगडावर लोमेश ऋषींची गुहा, शिवमंदिर, तलाव, शिलालेख, सदर, चार दरवाजे काही शिल्पे, लेण्या, विंचवाच्या नांगीसारख्या चिंचोळी आकाराची विंचूकाटा माची इत्यादी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. १४८२ पासून अस्तित्वात असणारा लोहगड शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम १६५७-५८ मध्ये जिंकला. १६६४ मध्ये जेव्हा महाराजांनी सुरतेची लूट केली, तेव्हा ती लूट त्यांनी लोहगडावरच सर्वप्रथम ठेवली होती. पुरंदरच्या तहात महाराजांना हा किल्ला मोगलांना द्यावा लागला. १३ मे १६७० रोजी पुन्हा शिवसैन्याने हा किल्ला माळा लावून जिंकला. १६७१-७२ च्या गडदुरुस्तीच्या अंदाजपत्रकामध्ये महाराजांनी या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी ५००० होनांची तरतूद केलेली दिसते.
विसापूर
लोहगडाशेजारचा विसापूर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनीच बांधून घेतलेला दिसतो. एकसलग तटबंदी हे विसापूरचे वैशिष्ट्य आहे. लोहगडापेक्षा हा आकाराने व उंचीनेदेखील मोठा असून, याच्या तटबंदीत जागोजागी बुरूज दिसतात. एका अर्थाने भाजे लेणीच्या बरोबर माथ्यावर हा किल्ला आहे. दरवाजे, द्वारशिल्प, पाण्याची टाकी, तलाव, मारुतीचे शिल्प, चोर दरवाजा, भग्नावस्थेतील वाडा, चिलखती कोट, ब्राह्मी लिपीतील शिलालेख इत्यादी गोष्टी आपण या किल्ल्यावर पाहू शकतो. शिवपूर्वकाळात या किल्ल्याचे उल्लेख आढळत नाहीत. महाराजांनी लोहगड जेव्हा जिंकला, तेव्हाच हा बेवसाऊ डोंगर जिंकून येथे किल्ला बांधला असावा. असे म्हणण्यामागे आज्ञापत्रातील त्यांची भूमिका हे सयुक्तिक कारण ठरू शकते. ‘गॅझेटियर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी’मध्ये हा किल्ला बाळाजी विश्वनाथ पेशव्यांनी बांधल्याचा उल्लेख आहे, तो पूर्णपणे चुकीचा आहे; कारण पुरंदरच्या तहात हा किल्ला शिवाजी महाराजांनी मोगलांना दिल्याची नोंद आहे. हे लोहगड-विसापूर जोडकिल्ले असून, दोन्ही एकाच वेळी आपण पाहू शकतो. या दोन्ही किल्ल्यांच्या जवळच कार्ले, भाजे व बेडसे या तीन लेणी आहेत. त्यांनाही आपण भेट देऊ शकतो.
राजमाची
शिवपदस्पर्शाने पावन झालेला मावळातील तिसरा किल्ला म्हणजे बोरघाटाचा रक्षक असणारा राजमाची होय. या किल्ल्याला श्रीवर्धन व मनरंजन असे दोन बालेकिल्ले आहेत. खुद्द शिवछत्रपतींचे या किल्ल्यावर महिनाभर वास्तव्य झाले असल्यामुळे येथे येणे प्रत्येक ट्रेकर्सला मनापासून आवडते. ‘राजमाची म्हणजे समोरून जाणाऱ्या प्रत्येक मित्राच्या आणि शत्रूच्या चेहऱ्यावर उजेड पाडणारा कंदील आहे,’ असे राजमाचीबद्दल एका इंग्रजाने लिहून ठेवले आहे. भैरव मंदिर, दीपमाळ, तोफा, शिवछत्रपतींची मूर्ती, दरवाजे, बुरूज, किल्लेदाराचा वाडा, सदर, पाण्याची टाकी, लोहस्तंभ अशा अनेक गोष्टी या दोन्ही बालेकिल्ल्यावर आपण पाहू शकतो. सातवाहन काळात हा किल्ला बांधला गेला. चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, कदंब, बहमनी, निजामशाही, आदिलशाही, शिवशाही, पेशवे, इंग्रज इत्यादी अनेकांच्या राजवटी या किल्ल्यावर झाल्या. १६५७ मध्ये शिवछत्रपतींनी हा किल्ला जिंकला. १२ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर १६६१ या काळामध्ये खुद्द शिवाजी महाराज या किल्ल्याच्या श्रीवर्धन या बालेकिल्ल्यावर राहिले होते. या किल्ल्याच्या जवळच कोंडाणे लेणी आहे.
तुंग
मावळातला एक उत्तुंग किल्ला म्हणजे तुंग. ४ फेब्रुवारी १६५६ रोजी शिवाजी महाराजांनी या सुळकेवाजा उत्तुंग शिखर असलेल्या किल्ल्याचे नामकरण ‘कठीणगड’ केले. याच्या पायथ्याला भैरवनाथ मंदिर, वीरगळ, सती वृंदावने, मारुती मंदिर, टाकी, दरवाजे, पहिल्या दरवाजानंतरची अद्भुत अशी ‘जिभी’ रचना, पहारेकऱ्यांच्या देवड्या, कोळीमेट, तुळजाईदेवी व गणपतीचे मंदिर, बालेकिल्ला, तुंगाई मंदिर इत्यादी गोष्टी आपण पाहू शकतो. हा ‘टेहळणीचा दुर्ग’ होता. पुरंदरच्या तहात शिवछत्रपतींना हा किल्ला मोगलांना द्यावा लागला. त्यानंतर त्यांनी हा १६७० मध्ये पुन्हा जिंकला. जवळच पवना धरण, दुधीवरेचे प्रतिपंढरपूर ठरलेले विठ्ठल मंदिर, हाडशी येथील सत्यसाईबाबा मंदिर ही प्रेक्षणीय ठिकाणे आहेत.
तिकोणा
चपेटदान मारुतीच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध असणारा तिकोणा किल्ला पवन मावळात मोक्याच्या ठिकाणी वसला आहे. तो आपल्याला सहजगत्या सहकुटुंब पाहता येऊ शकतो. कारण या गडाची उंची खूपच कमी आहे. तसेच हा छोटेखानीदेखील आहे. किल्ल्यावर दरवाजे, जिभीची रचना, सातवाहन काळातले तळजाई लेणे, तळे, सतीशिळा, चपेटदान मारुती, बालेकिल्ला, चोरदिंडी, राजवाडा, सदर, हवालदाराचा वाडा, अलंगा, बालेकिल्ला चार दरवाजे, वितंडेश्वर महादेवाचे मंदिर, पाण्याची टाकी इत्यादी गोष्टी आपण पाहू शकतो. ४ फेब्रुवारी १६५६ रोजी महाराजांनी या किल्ल्याचे नाव ‘वितंडगड’ ठेवले. याचा अर्थ त्यापूर्वीच त्यांनी तो जिंकला होता. पुरंदरच्या तहात तो मोगलांना द्यावा लागला. पुन्हा त्यांनी हा किल्ला १६७० मध्ये जिंकला. जवळच लोणावळा हे महाराष्ट्रात सुपरिचित असलेले थंड हवेचे ठिकाण आहे.
मोरगिरी
लोहगड, विसापूर, राजमाची, तूंग आणि तिकोना ही पाच किल्ले बऱ्यापैकी सर्वांना माहीत आहेत. त्यामानाने मावळातील मोरगिरी आणि अणघाई हे दोन किल्ले अपरिचित आहेत. हे दोन्ही किल्ले थोडेसे कठीण श्रेणीतील आहेत. यातील मोरगिरी हा किल्ला स्थानिक लोकांना ‘जांबुळणीचा डोंगर’ या नावाने परिचित आहे. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाके, गुहा व जाखमातेची मूर्ती आहे. तीव्र चढ असल्यामुळे खूप कमी ट्रेकर्स येथे भेट देतात. परिणामी, या किल्ल्याला जाता-येताना योग्य ती काळजी घ्यावी. शक्यतो स्थानिक माहीतगार सोबत ठेवावा. या किल्ल्याचा कोणताही ऐतिहासिक उल्लेख मिळत नाही.
अणघाई
अणघाई हा किल्ला खोपोली-पाली रस्त्यावर आहे. किल्ल्यावर जाणारी वाट अजिबात मळलेली नाही. तसेच अवघडही आहे. गडावर जाताना एक गुहा लागते. पाण्याचे कोरडे टाके लागते. त्यामध्येच अणघाई देवीची मूर्ती उघड्यावर आहे. किल्ल्यावरून कोकणातील अनेक किल्ले दिसतात. पंचक्रोशीतील गावकऱ्यांनाही याबद्दल खूप कमी माहिती आहे. जवळच अष्टविनायकातील पाली व महडचे गणपती आणि सरसगड आहे. या किल्ल्याचा इतिहास अबोल आहे.
इंदोरीचा वाडा
ज्या वाड्याला समोर ठेवून पुण्यातील शनिवारवाडा बांधला, तो म्हणजे इंदोरीचा वाडा. प्रत्यक्षात ही गढी आहे. गॅझेटिअरमध्ये याचा उल्लेख मात्र किल्ला म्हणून आला आहे. १७२० मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी सेनापती सरदार खंडेराव दाभाडे यांना इंदोरी हे गाव इनाम दिले. त्यांनी स्वतःच्या वास्तव्यासाठी १७२० मध्येच येथे एक गढी बांधली. गढीचा दरवाजा, तटबंदी, बुरूज आजही सुस्थितीत आहेत. आतमध्ये कडजाई देवीचे मंदिर आहे. भिंतीवर अनेक चित्रे सुबकरीत्या काढलेली आहेत. ती पाहूण आपण थक्क होतो. नगारखाना पाहण्यासारखा आहे. इंद्रायणीच्या काठावरच्या या गढीची रचना पाहूनच पहिल्या बाजीराव पेशव्यांनी पुण्यामध्ये मुठा नदीच्या काठावर १७३० मध्ये शनिवारवाडा बांधला. इंदोरीच्या या गढीत १८३० पर्यंत दाभाडे कुटुंबीयांचे वास्तव्य होते. आठ एकर जागेतील या गढीला नऊ भुरूज होते. अंबारीसह हत्ती जाईल, असे प्रचंड मोठे, तरीही अत्यंत आखीव रेखीव असलेले, दोन्ही बाजूंना सिंह व मध्यभागी गणपती कोरलेले प्रवेशद्वार पाहून आपण थक्क होतो.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.