पिंपरी, ता. २६ : खड्ड्यांमुळे जीवितहानी झाल्यास संबंधित विभागीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला. हिंजवडी, वाघोली आणि शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घेतलेल्या बैठकीत हा इशारा देण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनांनुसार ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली आकुर्डी मुख्यालयात महसूल, पोलिस, एमआयडीसी, एनएचएआय (भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) आदी विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. पाच डिसेंबरपूर्वी रस्ते खड्डेविरहित करण्याच्या स्पष्ट सूचना बैठकीत देण्यात आल्या. हिंजवडी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी ‘पीएमआरडीए’ निधी उपलब्ध करून देणार असून धूळ प्रदूषण करणाऱ्या आरएमसी प्लांट्स आणि विनाआच्छादन धावणाऱ्या डंपर चालकांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले. पुणे-मुंबई बाह्यवळण मार्गावर नवीन भुयारी मार्ग आणि सेवा रस्त्यांचे काम गतिमान करण्यात येणार आहे. भूगाव भुयारी मार्गाचे रखडलेले भूसंपादन मार्गी लावून पुढील आठवड्यात कंत्राटदारास आदेश देण्यात येणार असल्याचे ‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हिंजवडी-पिरंगुट-घोटावडे राज्य मार्गावरील फेज एक ते फेज तीन दरम्यानचा रस्ता आणि एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी एमआयडीसीमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने भूसंपादन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. मेट्रो लाईन-तीन खालील रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरून रस्ता सुस्थितीत एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना मेट्रोला देण्यात आल्या.
वाघोली आणि शिक्रापूर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी समांतर भुयारी मार्ग, नवीन आरपी रस्त्यांची आखणी आणि ‘पीएमआरडीए’च्या वाघोली युजीसी अंतर्गत विविध जोडरस्त्यांच्या विकासाच्या सूचना देण्यात आल्या. शिक्रापूर चौकातील भविष्यातील वाहतूकभार लक्षात घेऊन अनेक महत्त्वाचे प्रादेशिक मार्ग विकसित करण्याचे नियोजनही पुढे सरकले आहे. या सर्व प्रकल्पांमुळे पुणे पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील वाहतूक नियंत्रणास मोठा हातभार लागेल, असा विश्वास ‘पीएमआरडीए’कडून व्यक्त करण्यात आला.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.