पिंपरी, ता. ८ ः ‘लांडगा आला रे आला’ या गोष्टीतील एक मेंढपाळ मुलगा कंटाळा आल्यावर गावकऱ्यांना ‘लांडगा आला रे आला’ अशी खोटी आरोळी द्यायचा. आताही परिस्थिती वेगळी नसून लांडगा नामशेष होत असल्याने आता त्याची जागा बिबट्याने घेतली आहे. आता शहरातही ‘बिबट्या आला रे आला’ अशीच आरोळी ऐकायला मिळते. आरोळी देणारा आता कोणी मेंढपाळ मुलगा नाही तर त्या मुलाची जागा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान वापरणाऱ्यांनी घेतली आहे. एआयचा वापर करून बिबट्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करून अफवा पसरवणाऱ्यांविरोधात आता वनविभाग आणि पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी लहान मुले, महिला आणि प्राण्यांवर बिबट्याने हल्ला केला आहे. राज्यात बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत वर्षभरात ७५ नागरिकांचा जीव गेला आहे. त्यामुळे सध्या बिबट्याची प्रचंड दहशत आहे. काही ठिकाणी बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन घडत असले तरी काही ठिकाणी अफवा पसरविल्या जात आहे.
गेल्या काही दिवसांत समाजमाध्यमावर एआय तंत्रज्ञानावर बनवलेले बिबट्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अनेक जण फोटो किंवा व्हिडिओ खरा समजून तो पुढे पाठवत आहेत. इन्स्टाग्राम, फेसबुक आणि इतर प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर झालेल्या फोटो व व्हिडिओने जनतेत भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. खोटे व्हिडिओ आणि फोटो बनविणाऱ्या आणि व्हायरल करणाऱ्या दोघांवर वनविभागाने कारवाई सुरू केली आहे. नागरिकांनी व्हिडिओची सत्यता पडताळूनच फोटो आणि व्हिडिओ फॉरवर्ड करण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.
बनावट व्हिडिओ शेअर करणे गुन्हा
कोणताही व्हिडिओ, फोटो किंवा माहिती समाजमाध्यमावर शेअर करण्यापूर्वी तिची खात्री करावी. अफवा किंवा बनावट व्हिडिओ शेअर करणे हे कायद्याने गुन्हा आहे. याबाबत ॲड. प्रमिला गाडे म्हणाल्या, व्हिडिओ एडिट करून अफवा पसरवल्याने सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण होत असेल तर त्यांच्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा, २०००च्या कलम ६६ एफनुसार कारवाईची तरतूद आहे. आयटी ॲक्टनुसार आरोपीला तीन वर्षांपर्यंत कैद आणि एक लाख रुपये दंड होऊ शकतो. तसेच खोटी विधाने करणे, फेक व्हिडिओ प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे ज्यामुळे जनतेमध्ये भीती पसरत असेल आणि समाजाची दिशाभूल होत असेल तर हे कृत्य कायदेशीर गुन्हा आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस)च्या कलम ३५३ (१) अंतर्गत आरोपीला तीन ते पाच वर्षांपर्यंत कारावास आणि दंड किंवा दोन्ही होऊ शकते.
एआय निर्मित फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर वनविभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. खोटी माहिती पसरवणाऱ्यांना नोटीस दिली जात आहे. तसेच त्यांचे जबाब नोंदवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांकडे देत आहोत.
-महादेव मोहिते, उपवनसंरक्षक, पुणे वनविभाग
खोटी माहिती, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे जर सार्वजनिक शांतता भंग होत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
-डॉ. शिवाजी पवार, पोलिस उपआयुक्त गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.