पिंपरी, ता.१२ : निगडी सेक्टर क्रमांक २२, अंकुश आनंद बिल्डिंग बी-१५ परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. दिवसातून किमान तीन ते चार वेळा वीजपुरवठा बंद होत आहे, अशा तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत.
या परिसरात दर चार ते पाच दिवसांनी वाहिन्यांत बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे गृहिणींना घरगुती कामे, विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे आणि ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन कामकाजात अडचणी निर्माण होत आहेत. लिफ्ट, पाणीपुरवठा व्यवस्था, मोबाइल व इंटरनेट नेटवर्क यावरही त्याचा परिणाम होत आहे. रात्रीच्या वेळी परिसर सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे प्रशासनाने नवीन वीजवाहिनी जोडावी, अशी मागणी होत आहे.
स्थानिक नागरिकांनी वीज कार्यालयात वारंवार तक्रारी केल्या असल्या, तरी वीजपुरवठा व्यवस्थेमध्ये कायमस्वरुपी सुधारणा झालेली नाही. दरम्यान, याबाबत महावितरणचे सहाय्यक अभियंता काळे यांच्याशी संपर्क साधला असता, ‘‘दुरुस्तीचे काम सुरू आहे,’’ असे त्यांनी सांगितले.
उपकरणे बंद पडल्याने खोळंबा
वीज नसल्याने पाणीपुरवठा उशिराने झाला. संगणक, वॉशिंग मशिन, पंखा, फ्रीज बंद ठेवावे लागले. बॅकअप नसल्यामुळे त्या भागातील उद्योग, व्यावसायिकांना देखील फटका बसला. वीज नसल्यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम पडल्याने आर्थिक नुकसान झाल्याच्या तक्रारी त्यांनी केल्या. विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लाससाठीही अडथळे आले, असे नागरिकांनी सांगितले.
वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी महावितरणकडे केली. त्यावर अधिकाऱ्यांनी तातडीने पथक पाठवून दुरुस्तीचे आश्वासन दिले. याबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही सूचना दिल्या होत्या. पण, प्रशासनाने प्रत्यक्ष काम सुरू केलेले नाही. यामुळे अंकुश आनंद बी-१५ सोसायटीतील नागरिकांमध्ये नाराजी आहे.
-सुनील कांबळे, रहिवासी, सेक्टर २२-निगडी