पुणे, ता. २३ : टाळ-मृदंगांचा गजर, ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात स्वागत, वेदांताचार्य डॉ. नारायण महाराज जाधव यांचे विचार, सिद्धेश्वराच्या साक्षीने ग्रंथतुला, ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांची उपस्थिती तसेच उल्हास पवार यांनी पुण्यातील वारकरी व्यक्तिमत्त्वांच्या सांगितलेल्या आठवणी अशा भक्तिमय वातावरणात टाळयोगी पुरस्कार वितरणाच्या निमित्ताने माउली महाराज टाकळकर यांच्या शतकोत्सव प्रवेशाचा सोहळा आध्यात्मिक उंचीवर गेला.
श्री. ज्ञानेश्वर टाकळकर गौरव समिती, भारतीय वारकरी मंडळ, अद्वैत वारकरी भजनी महामंडळ, पश्चिम विभाग वारकरी भजनी मंडळ आणि वैष्णव वारकरी संस्था (हवेली) यांच्या विद्यमाने माउली टाकळकर यांना ‘टाळयोगी’ पुरस्कार वेदांताचार्य डॉ. नारायण महाराज जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
डॉ. जाधव म्हणाले, ‘‘आई-वडिलांकडून मिळालेले आध्यात्मिक संस्कार आणि तारुण्यात केलेल्या भजन साधनेच्या बळावर टाकळकर यांचे शताब्दीपर्यंतचे जीवन योग्याप्रमाणे आहे. मामासाहेब दांडेकर, पंडित भीमसेन जोशी यांच्यासारख्या महापुरुषांच्या सहवासात त्यांनी टाळाची साथ केली. टाळ या सात्विक वाद्याची प्रदीर्घ सेवा करून ‘टाळयोगी’ ही संज्ञा टाकळकर यांनी सार्थ ठरवली आहे. त्यांचे जीवन ‘टाळाटाळी लोपला नाद, अंगोअंगी मुराला छंद’ अशा स्वरुपाचे असून, ते नादब्रह्माचे उपासक आहेत.’’
उल्हास पवार म्हणाले, ‘‘एकांत आणि तपस्या या साधना आहेत. साधू एकांतात साधना करतात. मात्र, लोकांत राहून एकांताची साधना घडविणारा वारकरी संप्रदाय एकमेव आहे. टाकळकर यांचेही जीवन भजनाच्या रुपाने लोकांतात सुरू आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज आणि संत तुकाराम महाराज यांनी विश्वकल्याणाची चिंता केली. त्या परंपरेचे आपण पाईक आहोत. टाळवादनातून हरिनामात अखंड कार्यरत असलेल्या टाकळकर यांच्यावर पांडुरंगाची कृपा आहे.’’ बंकटस्वामी, मामासाहेब दांडेकर, बाळोबा पाषाणकर, माधवराव सुकाळे यांच्या आठवणी आणि सध्या पुण्यातील भजन परंपरा टिकविणारे टाकळकर, पांडुरंग दातार, तुकाराम भुमकर, शांताराम निम्हण यांच्यापर्यंतच्या इतिहास पवार यांनी यावेळी मांडला.
प्रास्ताविक सुहास पवार यांनी केले. धनंजय बडदे, सतीश जंगले, अण्णा गोसावी आणि गणेश आवजी यांची मनोगते झाली. पंडित रघुनाथ खंडाळकर यांनी अभंग गायन केले. नरहरी महाराज चौधरी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सूत्रसंचालन सौरभ करडे यांनी, कार्यक्रमाचे नियोजन अनिल खेसे, पंकज भोसले, महादेव बारणे, बाळासाहेब पाटोळे, विलास सस्ते यांच्यासह गौरव समितीच्या सदस्यांनी केले. सिद्धेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने टाकळकर यांची ग्रंथतुला करण्यात आली.
७९२०४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.