पिंपरी, ता. ३ : पिंपरी-चिंचवड महापालिकेने २०२२ मध्ये इयत्ता पहिली आणि दुसरीच्या वर्गापासून ‘इंग्लिश एज सेकंड लॅंग्वेज’ (ईएसएल) उपक्रम सुरू केला. यामुळे शिक्षक तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यासह अभिव्यक्तीचे माध्यम आणि शिक्षण आनंददायी ठरत आहे. आजपर्यंत २७ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला हा उपक्रम सरकारी शिक्षणातील शिक्षक संचालित बदलांचे उदाहरण ठरत आहे.
या उपक्रमाअंतर्गत सुमारे २०० प्राथमिक शिक्षकांना मासिक कार्यशाळांमधून प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये उच्चार (फिनिक्स), परस्परसंवाद, आणि प्रिंट-समृद्ध वर्गखोल्यांच्या निर्मितीवर भर देण्यात आला.
छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालयाच्या शर्मिष्ठा बाबर म्हणाल्या, ‘‘या उपक्रमात सहभागी झाल्यानंतर जेव्हा मला इंग्रजी प्रॅक्टिस बुक मिळाले. सुरूवातीपासूनच मला बदल दिसू लागला. आमच्या शाहेतील इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांचे वाचनकौशल्य आणि शब्दसंपत्तीमध्ये वाढ झाली आहे.’’
इंग्रजीची भीती आता विद्यार्थ्यांनाच नाही, तर शिक्षकांनाही उरलेली नाही, असे कन्या शाळा क्र. ३१, दापोडीचे शिक्षक सागर गायकवाड यांनी नमूद केले. ‘‘प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणाऱ्या इंग्रजी प्रॅक्टिस बुकमुळे वाचनकौशल्य वाढले असून, ते आमच्या वार्षिक मूल्यमापनामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. महापालिका शाळांमधील शिक्षकांच्या अभिप्रायावरून १० शिक्षकांनी मिळून ३०० पानी इंग्रजी प्रॅक्टिस बुक तयार केली आहे. ती तीन टप्प्यांमध्ये विभागलेली असून त्यामध्ये अक्षर ओळख, शब्द वाचन, वाक्य वाचन ते परिच्छेद वाचनापर्यंतचा समावेश करण्यात आला आहे. ही पुस्तके अध्यापन व मूल्यमापन अशा दोन्ही गोष्टींसाठी वापरली जात आहेत,’’ असे गायकवाड म्हणाले.
उपक्रमाचा विस्तार आणि परिणाम
उपक्रमाच्या यशामुळे आता इयत्ता तिसरी, चौथी आणि पाचवीमध्येही त्याचा विस्तार करण्यात आला आहे. नवीन प्रॅक्टिस बुक्स आणि प्रशिक्षण पद्धती तयार करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये २० हून अधिक शिक्षक, टीच फॉर इंडियाचे सहकारी, विद्यार्थी आणि अधिकारी यांचे योगदान आहे.
उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये
पुस्तकातील तीन टप्पे: अक्षर ओळख, शब्द वाचन, वाक्य वाचन तसेच परिच्छेद वाचन
मास्टर ट्रेनर्सद्वारे सहकार्यांना मार्गदर्शन व साधने निर्मिती: उपक्रमाच्या शाश्वततेस बळ
इंग्रजी भाषेची शैक्षणिक गुणवत्ता सुधारल्याचे मूल्यांकनात नमूद
वाचन, लेखन कौशल्यात सुधारणा, शब्दसंग्रहात वाढ
ईएसएल उपक्रमामुळे शिक्षक, विद्यार्थी यांच्या इंग्रजीमध्ये सुधारणा तर झालीच; शिवाय पालकांचा महापालिका शाळांवरील विश्वासही दृढ झाला आहे. नवीन सामग्री तयार करून दर्जेदार अध्यापन पद्धतीदेखील शाळांमध्ये रूजली जात आहेत.
- शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.