पिंपरी-चिंचवड

वारी विठाई अंकासाठी दोन

CD

विठाई अंकासाठी
---
ज्ञानेश्वरीतील उपमासौंदर्य

तत्त्वज्ञानातील अनेक विषय सर्वसामान्यांना कळण्यासाठी श्रीज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत जागोजागी ‘उपमेचा’ उपयोग केलेला आहे. त्यापैकी काही उपमा इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सांप्रदायिक कल्पनेप्रमाणे ‘ओवी’ ज्ञानेशांची कन्या आहे. या आपल्या लाडक्या कन्येला माउलींनी उपमादी अलंकारांच्या माध्यमातून सुंदर असा आवाज आणि अर्थ प्रदान केला आहे.
- पराग महाराज चातुर्मासे

श्री ज्ञानेश्वरी हा भगवद्‍गीतेवरील भाष्य ग्रंथ आहे. असे असले तरी श्रीज्ञानेश्वरी ग्रंथ सांगताना श्रीज्ञानोबारायांनी स्वतंत्रपणे गीतेत नसलेले अनेक विचार स्वप्रतिभेने प्रतिपादित केले आहेत, हे श्रीज्ञानोबारायांचे वैशिष्ट्य आहे. गीतेमधील सिद्धांतांचे विवरण करताना जे दृष्टांत, उपमा, रुपके त्यांनी मांडले आहेत. त्यांच्या माध्यमातून सुद्धा माउली लीलया अनेक सिद्धांत सांगून जातात. ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात म्हणल्याप्रमाणे ज्ञानेश्वरी ही ‘गीतेविण रंगू दावी’ म्हणजेच गीतेशिवाय सुद्धा स्वतःचे वेगळे अस्तित्व असणारी आहे. या सगळ्यात भगवान श्रीज्ञानोबारायांनी दिलेल्या ‘उपमा’ या फारच सार्थ आणि उपमानाला सरळ अर्थाने समजवून देणाऱ्या आहेत.
अलंकार शास्त्रामध्ये अर्थालंकार या प्रकारात ‘उपमा’ अलंकाराचा अंतर्भाव होतो. दोन गोष्टींमध्ये साम्य दर्शविण्यासाठी याची योजना केली जाते. मराठी भाषेमध्ये हे साम्य सांगण्यासाठी सम, सारखा, प्रमाणे, परी, गत, परिस, जैसे, तैसे असे शब्द योजलेले आहेत. उदा. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी. इथे सावळा रंग हे उपमेय आहे आणि नभ हे उपमान आहे. म्हणजे सावळ्या रंगाला इथे नभाची (आकाशाची) उपमा दिलेली आहे. श्रीज्ञानोबारायांनी असंख्य उपमा आपले गीता विवेचन करतांना वापरलेल्या आहेत. उपमा अलंकारावर त्यांचे विशेष प्रेम आहे. संस्कृत साहित्यामध्ये ‘उपमा कालिदासस्य’ असे म्हटलेले आहे. कवी कालिदास हे उपमेसाठी प्रसिद्ध असणारे कवी आहेत. मराठी साहित्यामध्ये मात्र श्रीज्ञानोबारायांसारखा उपमेबद्दलचा प्रगल्भ विचार इतरत्र दिसत नाही. मराठी सारस्वतात उपमा अलंकाराला माउलींच्या नावाने ओळखावे इतके माउलींचे उपमेवर प्रेम आहे. याचा अगदीच स्पष्ट खुलासा ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात आहे.
म्हणोनि अक्षरीं सुभेदी।
उपमाश्लेष कोंदाकोंदी।
झाडा देईन प्रतिपदी।
ग्रंथार्थासी।। (१३-११६३)
आपण अक्षरश: उपमांची खैरात करून गीताभाष्य करत आहोत, असे माउली सांगतात. श्रीज्ञानेश्वरीच्या याच तेराव्या अध्यायात जवळपास चारशे उपमा सांगितल्या आहेत. संस्कृत साहित्यात उपमेच्या वापराच्या बाबत अत्यंत काटेकोर असे नियम सांगितले आहेत. बऱ्याचदा दोन वस्तुंमधील साम्य उपमेला पुरेसे ठरते. माझ्या अल्पमतीला असे वाटते की, श्रीज्ञानोबाराय हे उत्तम कवी असण्याबरोबर लोकोद्धारक संत आहेत. यामुळे साहित्यशास्त्राच्या काही सूक्ष्म नियमाचे पालन करण्यापेक्षा माउलींनी लोकांपर्यंत विषय पोचण्यावर भर दिला आहे. आम्हा वारकऱ्यांच्या मते तर, माउली जे बोलतात तेच शास्त्र आहे म्हणून माउलींनी ज्या प्रकारे उपमा प्रतिपादिल्या आहेत. तेच उपमा अलंकाराचे शास्त्र आहे अशी आमची श्रद्धा आहे.

ज्ञानेश्वरीतील काही उपमा
- श्रीज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात श्रोत्यांनी हे भगवद्गीतचे निरूपण कसे ऐकावे याबद्दल श्रीमाऊली म्हणाले,
तियापरी श्रोतां।
अनुभवावी हे कथा।
अतिहळुवारपणे चित्तां।
आणूनिया।। (ज्ञानेश्वरी-१.५६)
म्हणजेच श्रोत्यांनी ही कथा अत्यंत हळुवार चित्ताने सगळ्या वासनांचा त्याग करून निर्मळ मनाने श्रवण करावी असे म्हणतात. हा उपमेय असणारा विषय खुलवण्यासाठी माउलींनी इथे उपमान दिले आहे, ते असे,
जैसे शारदियेचे चंद्रकळे।
माजी अमृतकण कोवळे।
ते वेचिती मने मवाळे।
चकोरतलगे।
माऊलींनी इथे चकोराची उपमा खुबीने वापरली आहे. ते सांगतात, ज्याप्रमाणे शरद ऋतुमध्ये चंद्रकिरणातील अमृताचे कोमल कण चकोर पक्षाची पिले मृदू, स्वच्छ मनाने वेचतात तशी तुम्ही ही कथा अती हळुवार चित्ताने ऐका. माउलींनी इथे चकोर पक्षाची दिलेली उपमा सर्वार्थाने परिपूर्ण आहे. कारण चकोर पक्षाचे वैशिष्ट्य असते की, तो पूर्णपणे चंद्र किराणाची वाट पाहत असतो. हे करत असताना तो पूर्ण समर्पित होऊन चंद्रावर अवलंबून असतो. त्या पक्षाच्या मनात कुठलाच संदेह त्यावेळी असत नाही. या चकोर पक्षांप्रमाणे नि:संदेह होऊन तुम्ही ही कथा ऐका हे सुचविण्यासाठी ही उपमा आहे. आपल्या निरूपणाची सुरुवात करताना आपल्या श्रोत्यांना माउली जणू सावधच करत आहेत.

- युद्धामध्ये अतिशय कणखर मन असणारा अर्जुन आपले सखे-सोयरे युद्धात शत्रूपक्षात समोर उभे आहेत हे पाहून त्याचे मन द्रवले. या उपमेयाचे स्पष्टीकरण करताना माउलींनी भ्रमराची उपमान दिले आहे. ती कसे पाहुयात.
जैसा भ्रमर भेदि कोडे।
भलतैसे काष्ठ कोरडे।
परि कळिकेमाजी सापडे।
कोवळीये।।
तेथे उत्तीर्ण होईल प्राणे ।
परि ते कमळदळ चिरु नेणे।
तैसे कठीण कोवळेपणे।
स्नेह देखा।। (ज्ञानेश्वरी - १.२०१,२०२)
भ्रमर पक्षी वाळलेल, अतिशय टणक झालेले लाकूड सुद्धा सहज पोखरू शकतो एवढी त्याच्या चोचीमध्ये क्षमता असते. पण संध्याकाळच्या वेळी एखाद्या कमळाच्या कोशात अडकल्यावर त्या भ्रमराला कमळाच्या नाजूक पाकळीतून जीव गेला तरी बाहेर येता येत नाही. तसा निडर, युद्धात अनेकांना आपल्या समर्थ्याने घाम फोडणारा अर्जुन युद्धात समोरची त्याचीच माणसे पाहून स्नेहाने अगदी कोमल होऊन गेला हे सांगितले आहे. विचार करताना असे लक्षात आले की, अर्जुनाच्या मनाची अवस्था सांगण्यास याखेरीज कोणतीच उपमा सार्थ ठरली नसती. माउलींची प्रतिभाच मुळी असामान्य आहे म्हणून हे शक्य झाले.

- भगवान श्रीज्ञानोबारायांनी तत्त्वज्ञानातील अनेक विषय उपमा आणि दृष्टांतांच्या माध्यमातून अगदी सुलभ करून पटवून दिले आहेत. याचे काही उदाहरणे पाहुयात
१) ज्ञानयोग आणि कर्मयोग हे दोन्ही साधनामार्ग एकाच परामानंदाच्या ठिकाणी साधकाला घेऊन जातात याबद्दल सांगतांना माउली तिसऱ्या अध्यायात म्हणतात,
का पूर्वापार सरिता।
भिन्ना दिसती पाहता।
मग सिंधू मिळणी ऐक्यता।
पावती शेखी।। (ज्ञानेश्वरी- ३. ३१)
अगदी पूर्वीपासून दोन नद्या त्यांच्या प्रवाहामुळे वेगळ्या वाहतात असे असले तरी शेवटी समुद्राच्या ठिकाणी त्या एक होतात. तसेच परामानंदरूप मोक्षाच्याच ठिकाणी सगळे साधने घेऊन जातात अशा प्रकारचा भाव इथे आहे.
२) अद्वैत वेदांतशास्त्रात परमात्मा आणि मी वेगळे नसून तो परमात्मा म्हणजेच मी आहे असे ज्ञान होणे यालाच मोक्ष असे प्रतिपादिले आहे. एकदा परमात्मा माझ्यात आहे, हे ज्ञान झाले की, खाली काही शिल्लक उरत नाही. ज्याला ज्ञान झाले आहे, तो परमात्मा माझ्यात आहे म्हणजे सर्वत्र सुद्धा तो आहे हा विवेक जागृत ठेवतो. हे पटवून देण्यासाठी पुन्हा श्रीमाउलींनी दृष्टांत दिला तो समुद्राचा,
जैसे सरिता ओघ समस्त।
समुद्रामाजीं मिळत।
परी माघौते न समात।
परतले नाहीं ।। (ज्ञानेश्वरी २.१७५)
एकदा नदी समुद्राला मिळाली की पुन्हा नदी झाली आहे असे कधी होत नाही. तसे, एकदा ज्ञान झाल्यास पुन्हा परत येणे संभवत नाही, असे माउली म्हणतात.
३) या जगात एक परामात्माच सत्य आहे, त्याव्यतिरिक्त सगळे जग हे नाशवंत आहे, अविकारी असणाऱ्या सत्यरूप परमात्म्याचे ठिकाणी आपण सर्वजण जगताचा आरोप करतो म्हणजे परमात्मा एकटा सत्य असतांना सुद्धा आपल्याला बाकी सगळे पदार्थ मिथ्या (नाशवान) असूनही सत्य वाटायला लागतात, असे वेदांतशास्त्राचे मत आहे. माऊली हे आद्य शंकराचार्यांचा मागोवा घेऊन तत्वज्ञान सांगणारे संत असल्याने माउली सुद्धा अद्वैत मतानुगामीच आहेत यात काही शंका नाही. हा विषय सामान्यांना कळवा यासाठी काही उपमा ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायात मांडल्या आहेत.
एऱ्हवी तरी भूमी आतूनि स्वयंभ।
काय घडेया गाडगेयांचे निघती कोंब।
परि ते कुलाल मतीचे गर्भ।
उमटले कीं।।
ना तरी सागरीच्या पाणी।
काय तरंगाचिया आहाती खाणी।
ते अवांतर करणी।
वारयाची नव्हे।। (ज्ञानेश्वरी - ९.७४,७५)

गाडगे, मडके काही पृथ्वीतून आपोआप बाहेर येत नाहीत. तर त्याच्यामागे कुंभाराची कल्पनाशक्ती असते. समुद्रात लाटा समुद्र निर्माण करत नाही, तर वाऱ्याच्या योगाने त्या निर्माण होत असतात. तसेच परमात्म्याचे स्वरूप हे अविकारी, शुद्ध आहे. मनुष्य मात्र निरनिराळ्या कल्पनांनी वेगवेगळ्या गोष्टींचा पसारा वाढवत असतो. अशाप्रकारे तत्त्वज्ञानातले अनेक विषय सर्वसामान्यांना कळण्यासाठी श्रीज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत जागोजागी ‘उपमेचा’ उपयोग केलेला आहे. त्यापैकी काही उपमा इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सांप्रदायिक कल्पनेप्रमाणे ‘ओवी’ ज्ञानेशांची कन्या आहे. या आपल्या लाडक्या कन्येला माउलींनी उपमादी अलंकारांच्या माध्यमातून सुंदर असा आवाज आणि अर्थ प्रदान केला आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT