पिंपरी-चिंचवड

विठाई तीन साळुंके

CD

संत तुकारामांचे आत्मभान

श्रीतुकोबारायांचे आत्मभान म्हणजे ‘मी’च्या संपूर्ण विसर्जनातून निर्माण झालेले एक समर्पणशील अस्तित्व होते. श्रीतुकोबारायांचे आत्मभान हे आत्मकेंद्रित ‘स्व’त्वाचे भान नव्हते, तर ‘स्व’च्या पार असलेल्या परमत्वाशी एकरूप होण्याची अनुभूती होती. या आत्मभानात अहंकाराचा लवलेशही राहत नाही, कारण ते केवळ अनुभूतीने उजळलेले असते.
- अर्जुन महाराज साळुंके

सं त तुकाराम महाराज हे वारकरी आणि मराठी संतपरंपरेतील एक सर्वोच्च शिखर आहेत. त्यांच्या अभंगवाणीने संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर, विचारांवर आणि श्रद्धेवर एक डोळस परिणाम केलेला आहे. संत तुकाराम महाराजांची अभंगवाणी ही त्यांच्या वैयक्तिक अनुभूतीची, भक्तीची आणि आत्मसाक्षात्काराची अध्यात्मिक फलश्रुती आहे. त्यांचे अभंग म्हणजे एकाच वेळी आत्मचिंतन, ईश्वरप्राप्तीची आकांक्षा आणि सामाजिक वास्तवाचे तत्त्वज्ञान होय.

आत्मा-परमात्माचे ऐक्य
तुकोबारायांच्या अभंग गाथ्यात आत्मानुभव आणि आत्मभानाचा प्रवास दडलेला आहे. ‘आत्मभान’ ही संकल्पना उपनिषद, भगवद्‍गीता आणि योगशास्त्र यांमध्ये आत्मा-परमात्म्याच्या ऐक्याच्या संदर्भात वापरली जाते. संत परंपरेत, विशेषतः ज्ञानेश्वरीपासून पुढे आलेल्या अभंग परंपरेत, आत्मभान हे निव्वळ बौद्धिक तत्त्व नाही, तर एक अनुभवात्मक साक्षात्कार आहे. तुकोबारायांनी आत्मभान या संकल्पनेला अत्यंत सहज, अनुभवसिद्ध आणि कृतीशील रूप दिले. त्यांच्यासाठी आत्मभान म्हणजे ‘मी कोण आहे’, ‘मी खरंच आहे का?’, ‘माझं असणं इतरांसाठी कशासाठी आहे?’ या प्रश्नांवरून सुरू होणारा अंतर्मुख प्रवास आहे.
संत तुकाराम महाराजांच्या परमार्थिक विकासाचा विचार करत असताना पाश्चात्त्य तत्ववेत्ता हेगेल याची आठवण होते. त्यांने विकासाचे तीन टप्पे सांगितलेले आहे. हेगेलच्या मते कोणत्याही प्रकारच्या उन्नतीसाठी किंवा विकासाचे परिवर्तन होणार असेल, तर होडी (नाव) ज्याप्रमाणे प्रथम एका बाजूला कलते. त्यानंतर विरुद्ध बाजूला कलते व मग पुढे सरकत विकासाचा टप्पा गाठते. त्याप्रमाणे मन प्रथम अस्तिपक्षाकडे मग नास्तीपक्षाकडे कलून या दोघांचा समन्वयात्मक संबंध धरून पुढे परिवर्तनाचा टप्पा गाठते. तुकोबारायांच्या परमार्थिक विकासाचा पहिला टप्पा म्हणजे त्यांनी आपल्या भौतिक आयुष्यामध्ये मिराशी-महाजनकी आणि देवाची सेवा यात अधिक भरभराटी आणली. त्यांचे हे ऐहिक ऐश्वर्य पराकोटीला पोहोचले होते.
माता पिता बंधु सज्जन। घरी उदंड धनधान्य।
शरीर आरोग्य लोकात मान। एकहि उणे असेना।।
यापुढील दुसरा टप्पा, याला ‘आत्म्याची अंधःकारमय रात्र’ (Dark night of the soul) असे म्हणता येईल. नियतीने त्यांच्या कौटुंबिक जीवनात एकामागून एक कठोर परीक्षा घेतल्या. आई-वडीलांचे निधन, दुष्काळामुळे झालेली उपासमार, व्यापारात झालेले नुकसान, पत्नी आणि मुलाचा मृत्यू, अशी परिस्थिती असतानाही त्यांनी ना संसाराला दोष दिला, ना देवाला दोष दिला.
तुका म्हणे देवा तू काय करिसी।
कर्मा दुस्तरासी आमुचिया।।
येथे संत तुकाराम महाराजांचे आपल्या स्वतःशी व भोवतालच्या परिस्थितीशी सतत युद्ध चालले आणि शेवटी तिसऱ्या अवस्थेत या साऱ्या सुखद-दुःखद घटनांनी ते खचले नाहीत, उलट अंतर्मुख होऊन त्यांनी आपला संसार आणि परमार्थ (वैराग्य) यांचा समतोल राखत आत्मभानाच्या दिशेने एक आध्यात्मिक प्रवास सुरू केला. ही त्यांची विलक्षण आध्यात्मिक उंची आहे. जिथे दुःख शोक होत नाही तर तोच आत्मभानाच्या शोधाचा आरंभ बनतो.
संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण जीवन, त्यांचे अभंग, त्यांची साधना आणि समाजप्रबोधन या सर्व घटकांमध्ये आत्मभानाची प्रक्रिया अत्यंत ठळकपणे दिसून येते. तुकाराम महाराजांचे आत्मभान कसे विकसित झाले? याचे उत्तर त्यांच्या आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यात पत्नी-पुत्रहानी, व्यवसायातील अपयश, समाजाची उपेक्षा, संसारातील अस्थिरता, अशा अनेक दुःखांच्या खाचखळग्यांतून जावे लागले इथेच त्यांच्या आत्मभानाचे पहिले बीज पेरले गेले. काही हालाकीच्या वेळेत स्वतःच्या जगण्यासंदर्भात तुकोबाराय एका ठिकाणी वर्णन करतात की, ‘आता मी खाणार काय? जाणार कोणाकडे? या संपूर्ण गावांमध्ये मी कोणाच्या आधाराने राहावे? या गावचा पाटीलच माझ्यावर कोपला आहे व इतरही लोक रागावलेले आहेत.
काय खावें आतां कोणीकडे जावें।
गावांत राहावें कोण्या बळें।।
या वेदनांनीच त्यांना बाह्य गोष्टींपासून तोडले आणि अंतःकरणाकडे वळवले. संसारातील लोकांचा दांभिक आणि फसवेपणा पाहून या काळात तुकोबांनी संसारातील तापाविरुद्ध झगडून आपल्या आध्यात्मिक जीवनक्रमास आरंभ केला आणि याची सुरुवात त्यांनी सुखाचा शोध घेण्यापासून केली. सुख अबाधीतपणे मिळण्यासाठी इतर कोणताही उपाय सार्थ ठरू शकत नाही हे त्यांना कळून चुकले होते. सुख कशाने लाभेल, आत्मशांती कशाने उगवेल हे शोधण्यासाठी श्रीतुकोबाराय भामनाथगिरीवर आले.
तुका म्हणे याचा संग नव्हे भला।
शोधीत विठ्ठला जाऊ आता।।
विठ्ठलाला शोधण्याचा मार्ग तुकोबांचा भक्ती आणि वैराग्याचा असला तरी या मार्गावर तुकाराम महाराज संसाराचा त्याग करत नाहीत. उलट संसारात असूनही ते वैराग्य अनुभवतात. हे वैराग्य संसारातून पलायनवादी नाही, तर तेच त्यांच्या आत्मभानाचे मूळ आहे. तुकोबा भामनाथगिरीवरच्या घळीत भगवंताचे भजन करायला बसत होते. तेथे जाण्याचा मार्ग त्याकाळी अतिशय खडतर होता. सुखाचे अंतिम ध्येय साध्य होईपर्यंत तेथेच राहण्याचा त्यांचा निश्चय झाला. जो देव आपल्या कुळाचा पूज्य आहे त्याचे नाम चिंतन व त्या चिंतनात जडणारे ध्यान श्रीतुकोबांचे सुरू झाले. संसाराच्या तापाने अंतःकरणात तीव्र दुःख होते, विठोबाच्या भेटीची दुर्दम्य आशा होती. त्याशिवाय जीवन धारण करायचे नाही हा अंतिम निश्चय ठरवून श्रीतुकोबाराय कुठल्याही अवस्थेत असले तरी नामस्मरणाचा टकळा, अंतकरणात विठ्ठलाला शोधण्याचे ध्यान त्यांचे थांबलेच नाही. तुकोबांच्या अंतकरणात हा छंद व नाद अधिकाधिक वाढतच राहिला.
आनंदाच्या कोटी। सांठवल्या आम्हां पोटीं।।... या भगवंताच्या नामस्मरणात आणि विठ्ठलाच्या अखंड ध्यानाने आनंदाचे सर्व प्रकार आमच्या पोटी साठवले आहे, असे ते जाहीर सांगतात. संपूर्ण विश्व हे चैतन्याने भरले आहे ही निर्गुण अनुभूति श्रीविठ्ठलाच्या चिंतनाने झाली.
विठोबा भेटला निराकार।।... यानंतर श्रीतुकोबांनी आपली भौतिक आसक्ती इंद्रयाणीत बुडविली आणि आत्मानंदसाठी अखंड रूढ झाले. भगवंताच्या नामस्मरण साधनेत आड येणारे अनेक मार्ग तुकोबांना आता लक्षात येऊ लागले. आपल्यातील ‘स्व’चा अहंकार, मी पणा, माझे माझे म्हणणे हे आत्मसुखापासून दूर नेणारे आहे हे लक्षात आले. एका ठिकाणी तर थेट तुकोबाराय देवाला म्हणतात,
गुणवंत केलो दोष जाणायासाठीं।
माझें माझें पोटीं बळकट दूषण।।
देवा, तुम्हीच मला गुणवंत केले. माणसाचे गुणदोष समजतील इतका मी गुणवंत झालो; पण मी गुणवंत आहे असा अभिमान माझ्यात आला व हाच मोठा दोष माझ्यात निर्माण झाला. अभिमानामुळे माझा गुण तोच माझा अवगुण ठरला. माझे भूषण हेच माझे दूषण ठरले. अशा अवस्थेमध्ये श्रीतुकोबाराय पुढे स्वतःतील मी पणावर कायम आघात करत राहिले.
पापाची मी राशी। सेवाचोर पायांपाशीं॥
करा दंड नारायणा। माझ्या मनाची खंडणा॥
जना हातीं सेवा। घेतों लंडपणें देवा॥
देव ना संसार । तुका दोहींकडे चोर॥
काही वेळा श्री तुकोबाराय स्वतःला कामचोर म्हटले तर काही वेळा मी पापाचीच रास आहे, असे ते म्हणतात. कधी तर मी ढोंगी साधू आहे; हे सोंग मिरवून मी लोकांकडून सेवा करून घेतो. ना धड परमार्थ केला ना प्रपंच, मी दोन्हीकडे चोर ठरलो हे बोलत ते स्वतःतील अहंकार मारतात. आत्मभानाच्या अनुभवासाठी देह बंधन ठरते हे जाणून श्रीतुकोबाराय स्वतःच्याच देहाच्या संदर्भांन बोलतात,
जळो आतां नावं रूप। माझे पाप गाठीचे।।
माझ्या देहाविषयी मला अभिमान आहे. हे माझ्या पदराला बांधलेले पाप आहे आणि ते पाप जळून जावे. मग यापुढे ते देवाला प्रार्थना करतात आता अंतःकरणात काम आणि क्रोध दोन्ही शिल्लक नाही.
काम क्रोध केले घर रिते।।
त्यामुळे,
तुका म्हणे करी आवडीसी ठाव।
नको माझा भाव भंगो देऊं।।
देवा , माझ्या अंतःकरणात तुम्ही येऊन प्रेमाने रहा आणि देवा, माझा तुझ्यावर असलेला दृढ भाव भंगू देऊ नको. देव ज्याच्या घरी येतो त्याचे मनुष्यपण पहिले नाहीसे होते, ही आत्मभानाची पहिली खूण आहे. भगवंताच्या नामाचा छंद जडल्यामुळे तुकोबांच्या जीवनात आता विषयांचा विसर पडला आणि अंगी ब्रह्मरस उचंबळून वाहू लागले. आत्मा व देव यांच्यामधील भेद नाहीसा झाल्यावर जो अनुभव येतो, तो आत्मानुभव होय, असे श्रीतुकोबाराय सांगतात. आत्मभान ‘मी कोण?’ या प्रश्नावर थांबत नाही, तर ‘तो कोण?’ या प्रश्नाकडे झुकते. विठोबा हा तुकोबांसाठी बाह्य देव नाही, तर त्यांच्या अंतःकरणात प्रतिबिंबित झालेला आत्मसत्ता आहे.
देव आहे देव आहे। जावळी आम्हा अंतरबाहे।।
हे त्यांचं वाक्य केवळ शब्द नाहीत, तर त्याग आणि समर्पणातून मिळणाऱ्या आत्मसाक्षात्काराचा संदेश आहे. विठोबाशी तद्रूप होणे म्हणजे ‘मी’ पणाचा शेवट आणि ‘तो’ पणाचा आरंभ होय. श्रीतुकोबारायांचे आत्मभान म्हणजे भक्तीमधील जिवंत अद्वैत असे म्हणणे योग्यच आहे. हे आत्मभान केवळ वैयक्तिक नाही, तर समाजाला आरसा दाखवणारे असून सामाजिक न्यायाचा मूलस्तंभ आहे. आज आत्मभानाअभावीच समाजात खोटे सेल्फ तयार होताना दिसत आहे.

अस्तित्वाच्या शुद्धतेचा स्त्रोत
श्रीतुकोबारायांच आत्मभान हे त्यांच्या काळात जितके क्रांतिकारक होते, त्याहून अधिक ते आजच्या काळात अध्यात्मिक समत्वाचा, मानवी अस्मितेचा आणि अस्तित्वाच्या शुद्धतेचा एक मूलभूत स्त्रोत आहे. हे आत्मभान फक्त ध्यानधारणा किंवा वैयक्तिक मोक्षाची वाट नव्हती. ते सामाजिक भान, कर्तव्यबुद्धी आणि माणसांमध्ये देव शोधण्याची वृत्ती यांशी जोडलेले होते. आजचा काळ हा केवळ तांत्रिक प्रगतीचा किंवा ज्ञानाचा नाही, तर तो ‘स्व’त्व गमावलेल्या माणसाचा काळ आहे. जिथे बहुतेकजन बाह्य यश, इमेज, ब्रँडिंग आणि आभासी आत्मप्रतिमा याच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. यामुळे माणूस निराश होऊन स्वतःपासून दूर गेला आहे. त्यामुळे श्रीतुकोबारायांचे आत्मभान आजच्या युगासाठी अत्यावश्यक ठरते.

विठ्ठलमय अनुभूती
श्रीतुकोबारायांचे आत्मभान म्हणजे ‘मी’च्या संपूर्ण विसर्जनातून निर्माण झालेले एक समर्पणशील अस्तित्व होते. श्रीतुकोबारायांचे आत्मभान हे आत्मकेंद्रित ‘स्व’त्वाचे भान नव्हते, तर ‘स्व’च्या पार असलेल्या परमत्वाशी एकरूप होण्याची अनुभूती होती. या आत्मभानात अहंकाराचा लवलेशही राहत नाही, कारण ते केवळ अनुभूतीने उजळलेले असते. त्यांचे संपूर्ण जीवन ‘मी’च्या विसर्जनातून ‘तो’चा अनुभव घेण्याचे माध्यम झाले होते. या आत्मभानात कोणतीही अपेक्षा, सिद्ध होण्याची हाव की वैयक्तिक तपश्चर्येचा गर्व नव्हता तर केवळ निरपेक्ष समर्पण होते. जसे ज्योतीत तेल पूर्ण मिसळून जाते, तसे तुकोबांचे ‘स्व’ विठ्ठलसत्तेत विलीन झाले होते. त्यामुळे त्यांचे आत्मभान म्हणजे अखंड आत्मदर्शन. एक सतत घडणारी, थांबू न शकणारी, अंतर्मनात प्रकट होणारी विठ्ठलमय अनुभूती होय.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT