पिंपरी-चिंचवड

विठाई चार जगताप

CD

हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य

हरिप्राप्तीकरिता अनेक साधने करताना कधी यश तर कधी अपयश. या साधना करताना साधक स्थिर होईल, याची खात्री नाही. क्लिष्ट आणि दुस्तर साधना करताना साधक वाया गेलेले अनुभव आहेत. ‘नाम घेता वाया गेला।’ असा कोठेही अनुभव नाही. नामातच साधक स्थिर होतो. त्याचे जीवन धन्य होते. श्री ज्ञानोबारायांच्या हरिपाठाच्या चरणातूनच सांगायचे झाल्यास एवढेच म्हणता येईल की, ‘हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य।’...
- प्रमोद महाराज जगताप, बारामती

कै वल्यसाम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या साहित्य संपदेतील अवघ्या सत्तावीस अभंगांचा छोटेखानी ‘हरिपाठ’ हा ग्रंथ वारकरी पंथाचा उपासना ग्रंथ म्हणून ओळखला जातो. ज्यात भगवंताच्या नामाचे महत्त्व विशद केलेले आहे. मूलतः वारकरी संप्रदाय हा नामधारकांचा संप्रदाय.
आम्ही नामाचे धारक। नेणो प्रकार आणिक।
सर्वभावे एक। विठ्ठलचि प्रमाण।।
असे तुकोबारायांनी म्हटले आहे. भगवद्‍प्राप्तीची जी अनेक साधने उपलब्ध आहेत, त्यातील काही सूक्ष्म तर काही दूस्तर आहेत. कर्म सूक्ष्म आहे; तर योग दूस्तर आहे. वारकरीपंथीय संतांनी सूक्ष्म आणि दूस्तर वाटा मोडून सर्वांकरिता नामाचा राजमार्ग खुला केला.
मोडोनिया वाटा सूक्ष्म दूस्तर।
केला राज्यभार चाले ऐसा ।। तु. म.
सकल संतांनी एकांतात बसून, सर्व सिद्धांताचे ज्ञानदृष्टीने अवलोकन करून, जे सार काढले ते श्रीहरिचे नाम होय, असे संत निळोबाराय बोलतात.
संत एकांती बैसले। सर्व सिद्धांत शोधिले।
ज्ञानदृष्टी अवलोकिले । सार काढिले निवडोनि ।।
ते हे श्रीहरिचे नाम ।
या हरिनामाची ख्याती वेद, पुराण आणि संतपरंपरेने गायिली आहे. वैदिक मंत्राची सुरुवात ‘हरिः ॐ’ अशीच करण्याची परंपरा आहे. भगवंताचे जे अवतार श्रीमद्‍भागवत पुराणात वर्णिले आहेत, त्यात गजेंद्रासाठी भगवंताने ‘हरि’ अवतार धारण केला. गजेंद्रमोक्ष या आख्यानाचा विचार करता भक्ताच्या संकटसमयी धावून येणारा भगवान म्हणजे ‘हरि’. विष्णुसहस्रनामात ‘हरि’ हे एक भगवंताचे नाम आहे.
अतुलः शरभो भीमः समयज्ञो हरिर्हरि
अशा या ‘हरि’ नामाचा वारंवार पाठ करणे म्हणजे हरिपाठ. या हरिपाठाचा पाच संतांनी केलेला ‘पंचरत्न हरिपाठ’ प्रसिद्ध आहे. मात्र, यात संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत एकनाथ महाराज यांचे अभंग हरिपाठाचे आहेत. संत नामदेव महाराजांचे अभंग रामपाठाचे आहेत; तर संत तुकाराम महाराजांच्या हरिपाठात क्षेपक अभंगांचा समावेश अधिक दिसतो.
वारकरी पंथात नित्यनेमाने श्रीज्ञानेश्‍वर महाराज यांचा हरिपाठ म्हणण्याचा प्रघात आहे. ‘हरिपाठ ही वारकऱ्यांची संध्या आहे’ असे प्रातःस्मरणीय गुरूवर्य मामासाहेब दांडेकर म्हणत असत. या सत्तावीस अभंगाचे ध्रुपद
हरिमुखे म्हणा हरिमुख म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ।।
असे आहे.
अर्थात मुखाने सतत ‘हरि हरि’ करणे, अलीकडे हरि हरी करणे म्हणजे रिकामटेकडेपणा किंवा कालापव्यय असा समज आहे. मात्र, असा विकृत अर्थ करणे उचित नाही. उलटपक्षी मुखात एकदा ‘हरि’ येण्यासाठी अनंत जन्मांची पुण्याई लागते, असे नाथमहाराज सांगतात.
अनंत जन्माचे सुकृत पदरी ।
त्याचे मुखी हरि पैठा होय ।।
एकदा हरिचा उच्चार करण्यासाठी अनंत पुण्य लागते आणि अखंड हरिनाम घेतल्यास अनंत पुण्य प्राप्त होते, ज्याची कोणासही गणना करता येत नाही.
श्री ज्ञानोबारायांनी हरिपाठाची निर्मिती करताना भगवद्‍प्राप्तीकरिता सर्वांनी हरिपाठ करावा, हरिभजन करावे हा उपदेश केलाच आहे. मात्र, त्याचबरोबर चार मुक्तीचा विचार, चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे यांचे नामाविषयी एकमत, भगवंताचे सगुण आणि निर्गुणरूप, कायिक, वाचिक, मानसिक तप, जीवाची प्रपंचासक्ती, योगमार्गाची दूस्तरता, यागाविषयीची सूक्ष्मता, आजच्या धकाधकीच्या मानवी जीवनप्रणालीत योग आणि यागाचे काठिण्य आणि निरर्थकता, नामाचे सौलभ्य, भक्तीहीन पुरुषाचे जीवन, संतांच्या संगतीचा लाभ, द्वैताद्वैत विचार, नामविरहित तीर्थयात्रेची विफलता, पापपुण्य विचार, नामयोगाने कुलशुद्धी, तत्त्वांचा विचार, नामधारकाचा कळीकाळावरील विजय, नामाची सुलभता आणि व्यापकता, मोक्ष विचार, उद्यमशीलता, सहजसमाधीयोग अशा अनेक गोष्टींचा उपदेश हरिपाठात केला आहे. अनेक मोठ्या ग्रंथातील, अर्थात आध्यात्मिक सकल साहित्यातील विचार संक्षेपाने, सारभूत, सूत्रबद्ध रीतीने हरिपाठात मांडला आहे. हरिपाठात सांगितलेल्या एका-एका मुद्द्यावर स्वतंत्र ग्रंथ होईल, एवढा हरिपाठातील विचार व्यापक आहे. यातील काही मुद्द्यांचा सारांशाने विचार करणे उचित होईल.

हरिपाठाच्या पहिल्याच अभंगात श्रीज्ञानोबाराय हरिपाठाचा अधिकारी कोण? हे सांगतात.
असोनि संसारीं जिव्हा वेगु करीं ।।
वेदशास्त्र उभारीं बाह्या सदा ।।
सर्वसामान्य संसारी माणूसही हरिपाठाची उपासना करू शकतो. कर्म, योग यागादि उपासनेत अधिकाराचा प्रश्‍न आहेच. नामाचा अधिकार मात्र सर्वांना आहे आणि कलियुगात नामानेच उद्धार होतो.
सकळासी येथे आहे अधिकार ।
कलियुगी उद्धार हरिच्या नामें ।।
नामाचा अधिकार सर्वांना आहे, हा झाला एक विचार. दुसऱ्या अंगाने विचार करताना, सर्वसामान्य जनांना संसार मिथ्या आहे, हे लगेच सांगून चालणार नाही. समजा या चरणांत ‘नसोनि संसारी जिव्हा वेगु करीं’ असे म्हटले असते तर सांसारिक माणसाने ही साधना आपल्यासाठी नाही असे समजून हरिपाठ वाचलाच नसता. ज्ञानेश्‍वर माउली आई असल्याने हळुहळू समजावून सांगतात. याविषयी हरिपाठाच्या या सत्तावीस अभंगांत तीन टप्पे पाहायला मिळतात. पहिल्या टप्प्यात पहिल्या अभंगात ‘असोनि संसारी’ असे म्हटले आहे. ‘संसारात असा; पण हरिमुखे म्हणा’ असा उपदेश केला. मात्र, सवलत दिली की माणूस त्याचा जास्त फायदा घेताना दिसतो. संसाराची सवलत दिली तर ‘मशक गुंतला शेंबुडी’ असा संसारात गुरफटून जातो. त्याला आत्मोद्धाराचे भानच राहत नाही. अशा वेळी हरिपाठाच्या चौथ्या अभंगात ज्ञानोबाराय संसारासक्त झालेल्या साधकाला हळूच भानावर आणतात.
सायासे करिसी प्रपंच दिननिशीं ।
हरिसी न भजसी कवण्या गुणे ।।
ज्ञानोबाराय साधकाला प्रश्‍न विचारतात की, ‘तुला संसाराची सवलत दिली तर तू एवढा संसारासक्त झालास की त्यातील कोणत्या (अव) गुणाने भगवंताचे भजन करीत नाहीस.’ साधक सावध होऊन भजनामध्ये पूर्ण रत झाल्यानंतर ज्ञानोबाराय ‘हा संसार मिथ्या आहे’, असा उपदेश शेवटच्या म्हणजे सत्ताविसाव्या अभंगात करतात.
लटिका व्यवहार सर्व हा संसार ।
वाया येरझार हरिविण ।।
संसारात राहूनही हरिपाठाद्वारे साधक भगवद्‍प्राप्तीला सिद्ध होतो.
मानवी जीवनाची सार्थकता हरिप्राप्तीतच आहे. या हरिप्राप्तीकरिता उपलब्ध असणाऱ्या इतर साधनांची निरर्थकता ज्ञानोबारायांनी हरिपाठात मांडलेली दिसते. उदाहरणार्थ पुढील चरण पाहता येईल.
योग याग विधी येणे नोहे सिद्धी ।
वायाचि उपाधी दंभ धर्म ।।
योग, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी ही अष्टांग योगसाधना आहे. यामध्ये आजच्या जीवनप्रणालीत माणूस एका आसनावर घडीभर बसू शकत नाही. तो योग कसा करणार? निगूढ मठ किंवा शिवालयात तासनसास कसा बसणार?
किंबहुना पांडवा । हा अग्निप्रवेशु नीच नवा ।
भातारेंवीण करावा । तो हा योगु ।।
म्हणौनि योगाचियां वाटा । जे निगाले गा सुभटा ।
तयां दुःखाचाचि रोलवांटा । भागा आला ।।
यज्ञयागादि कर्मात अधिकाराचा प्रश्‍न आला. द्रव्य, साहित्याचा प्रश्‍न आला. अग्नि, काळ, वेळ, मुहूर्त, ग्रहांची स्थिती या सर्व गोष्टींचा विचार आला. यात झालेल्या चुकांनी पतनाची शक्यताच अधिक असते.
कर्म धर्म नव्हती सांगा । उण्या अंगे पतन ।
भलत्या काळी नामावळी । सुलभ भोळी भाविकां ।।
योग, याग, भलत्या काळी करून फलद्रुप होत नाहीत. याउलट काळ, वेळ, नाम उच्चारिता नाही असे आम्हास हरिपाठ सांगतो. यज्ञ, याग, योगाची सिद्धी झालीच तर अणिमा, महिमा, लघिमा अशा अष्टसिद्धीचा लाभ होतो. परिणामी, साधकाच्या मनात दंभाचीच निर्मिती होते.
तीर्थयात्रा हा एक प्रभुप्राप्तीचा मार्ग. मात्र, तीर्थयात्रा करण्यासाठी शरीरस्वास्थ्य महत्त्वाचे असते. अनेक लोक तीर्थयात्रा करतात. तेही सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यावर करतात.
तुकोबाराय म्हणतात,
जव हे सकळ सिद्ध आहे ।
हात चालावया पाय ।
तव तु आपुले स्वहित पाहे ।
तीर्थयात्रे जाय चुको नको ।।
अलिकडच्या काळात विविध यात्रा कंपन्या तीर्थयात्रा घडवितात. त्या तीर्थयात्रा असतात की पर्यटन असते, हा संशोधनाचा विषय होईल. या तीर्थयात्रा करताना मुखामध्ये भगवंताचे नाम नसेल तर केलेल्या तीर्थयात्रा देखील व्यर्थ आहेत, ही शिकवण हरिपाठातून मिळते.
त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी ।
चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ ।।
या पार्श्‍वभूमीवर पंढरीची वारी एकमेवाद्वितीय श्रेष्ठ मानली पाहिजे. कारण, ही तीर्थयात्रा करताना भजन मुख्य आहे. नामस्मरण करीतच वारकरी वाटचाल करतात.
अवघे जेणे पाप नासे । ते हे असे पंढरी ।।
गात जा गा गात जा गा । प्रेम भागा विठ्ठला ।।
देव, भक्त आणि नाम यांचा त्रिवेणी संगम म्हणजे पंढरीची वारी. वारकरी पंथात नाम आणि नामी यांचा अभेद मानला आहे. नाम घेत नामीची केलेली वारी म्हणजे ‘नाम वारी’ म्हटली पाहिजे. ‘हरिपाठ’ ही वारकऱ्यांची नित्योपासना आहे. प्रत्येक वारकरी घरात दररोज हरिपाठ म्हणण्याची परंपरा आहे. आज वारकरी संप्रदायाचा विस्तार इतका मोठा आहे, की महाराष्ट्रात एक गाव असे नाही की ज्या गावात वारकरी घर नाही. त्या घरात हरिपाठ सुरू आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात हरिपाठ गायला जातो. हरिपाठ म्हटला नाही, तर दोष नाही. मात्र हरिपाठ म्हटला तर अनेक लाभ होतात असे माउलींनी हरिपाठातच सांगितले आहे. पुढील वचनांवरून आपल्या लक्षात येईल.
तेणे मुक्तिचारी साधियेल्या । पुण्याची गणना कोण करी ।
द्वारकेचा राणा पांडवाघरी । भरला घनदाट हरि दिसे ।
अनंत जन्मोनि पुण्य होय । तुटेल धरणे प्रपंचाचे ।
परंपरा त्याचे कुळ शुद्ध । चतुर्भुज नर होउनि ठेले ।
अशी काही उदाहरणे देता येतील. हरिपाठाच्या प्रत्येक अभंगात फलप्राप्ती आहे.
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही एक विचार करता येईल. नभांगणात एकूण सत्तावीस नक्षत्रे आहेत. माणसाचा जन्म होतो, त्या वेळी चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते त्या जातकाचे जन्मनक्षत्र ठरते. त्यावर त्याची कुंडली आधारित असते. नक्षत्रसंख्या सत्तावीस आणि हरिपाठाच्या अभंगांची संख्या सत्तावीस. जातकाचे ज्या क्रमांकाचे नक्षत्र असेल त्या क्रमांकाचा अभंग त्याने उपासना म्हणून रोज म्हणावा. उदा. ज्याचे जन्मनक्षत्र अश्‍विनी असेल त्याने पहिला हरिपाठाचा अभंग ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी’ याची उपासना करावी. ज्याचे जन्मनक्षत्र मृगशीर्ष असेल, ते क्रमाने पाचवे नक्षत्र आहे. त्या जातकाने हरिपाठाचा पाचवा अभंग ‘योगयाग विधी येणे नोहे सिद्धी’ या अभंगाचा पाठ करावा. ज्याला आपले जन्मनक्षत्र ठाऊक नाही त्यांनी सर्व सत्तावीस अभंग म्हणावेत. त्यात त्याचे जन्मनक्षत्र असणारच आहे. निष्ठावंत वारकरी सर्व अभंग निष्ठेने म्हणतात. त्यामुळे नभांगणातील सारीच नक्षत्रे त्यांच्यावर कृपा करीत असतात.
सारांश, हरिप्राप्तीकरिता अनेक साधने करताना कधी यश तर कधी अपयश. या साधना करताना साधक स्थिर होईल याची खात्री नाही. क्लिष्ट आणि दुस्तर साधना करताना साधक वाया गेलेले अनुभव आहेत. ‘नाम घेता वाया गेला।’ असा कोठेही अनुभव नाही. नामातच साधक स्थिर होतो. त्याचे जीवन धन्य होते. श्री ज्ञानोबारायांच्या हरिपाठाच्या चरणातूनच सांगायचे झाल्यास एवढेच म्हणता येईल.
हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य।
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT