पंढरपुरा नेईन गुढी
वारकरी संप्रदाय हा ऐकांतिक सगुणवादी अथवा ऐकांतिक निर्गुणवादी सुद्धा नाही हा संप्रदाय सगुण निर्गुणाचा समन्वय सांगणारा आहे. यानुसार श्री ज्ञानराज माउली रखुमादेवीचा वर बाप विठ्ठल कसा आहे, हे सांगताना सांगतात, हे जे आपल्याला दिसणारे दृग्गोचर होणारे स्वरूप आहे, ते सगुण साकार आहे आणि त्याच्या तळवटी असणारी, आधारभूत असणारी वीट मात्र निर्गुण स्वरुपाची खूण म्हणजे उपलक्षण, द्योतक आहे. या ठिकाणी श्री ज्ञानराज माउलींनी वारी हे कर्म कर्तव्य नसाताना सुद्धा वारी करतात. कारण वारी हा माउलींच्या अत्यंत आवडीचा विषय आहे.
- डॉ. यशोधन महाराज साखरे, आळंदी
भ गवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत ज्ञानोत्तर भक्ती सांगितलेली आहे, भगवान सांगतात,
चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन।
आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ ।। ७.१६॥
या ठिकाणी श्रीकृष्णानी सांगितलेल्या ज्ञानोत्तर भक्तीचा महिमा वारकरी संप्रदायाने विषेशत्वाने वाढविला आहे. माउली ज्ञानोबाराय या ज्ञानोत्तर भक्ती संबंधाने सांगतात,
हें विश्वचि माझें घर।
ऐसी मती जयाची स्थिर ।
किंबहुना चराचर ।
आपण जाहला ॥
मग याहीवरी पार्था ।
माझ्या भजनीं आस्था ।
तरी तयातें मी माथां ।
मुकुट करीं ॥
याचा भाव असा की जीव ब्रह्मैक्य ज्ञानानंतर, विश्वात्मभूतीच्या अनुभवानंतर जो भक्तीमध्ये प्रवृत्त असतो, त्यास ज्ञानी भक्त असे संबोधले जाते. हा ज्ञानी भक्त भगवंतास विशेषत्वाने प्रिय असतो, असे माउली सांगतात. माउली या ज्ञानोत्तर भक्तीचा फक्त महिमा सांगून थांबत नाहीत, तर ती ज्ञानोत्तर भक्ती आपल्या चरित्रामध्ये अवतरवितात.
चरित्र दृष्टीने आपण जर माउलींना विचारले की ज्ञानानंतर तुम्हाला काय करायला आवडेल? त्याचे उत्तर माउली देतात,
माझे जिवींची आवडी ।
पंढरपुरा नेईन गुढी ॥
माझ्या जिवीची म्हणजे जीवाभावापासून आवड काय आहे? तर ती म्हणजे श्री क्षेत्र पंढरपुराला खांद्यावर गुढी घेवून जाणे. शास्त्रदृष्टीने विचार केला तर ज्ञानी महात्म्यास ज्ञानोत्तर कोणतेही कर्म अथवा कर्तव्य सांगितलेले नाही. श्री ज्ञानराज माउली तर उपजताची ज्ञानी आहेत तरी पण ते वारी हे वारकरी संप्रदायाचे मूलभूत कर्तव्य आहे. त्याचे आचरण का करतात? त्याचे उत्तर माउली देतात, माझी मनापासूनची आवड वारी आहे म्हणून. मग वारीला कशा पद्धतीने जाणार हे सांगताना माउली सांगतात खांद्यावर गुढी म्हणजे भागवत संप्रदायाची जी भगवी पताका आहे, ती खांद्यावर घेवून मी जाणार आहे. वारीला जाताना कोणी टाळ घेवून चालतात, कोणी मृदंग घेऊन चालतात, कोणी तुळस घेऊन चालतात, तर काही नियमाचे वारकरी खांद्यावर पताका घेऊन टाळ वाजवत भगवंताचे नाम घेत अभंग गात चालतात. या सगळ्यांमध्ये भगव्या पताकेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. श्री ज्ञानराज माउली सांगतात,
पाहेंपा ध्वजेचें चिरगुट ।
राया जतन करितां कष्ट ।।
तैसा मी एक पतीत ।
परि तुझा मुद्रांकित ।।
भगवी पताका हे वैराग्याचे द्योतक आहे, त्याप्रमाणे भगवदंकितत्त्वाचे उपलक्षण आहे. ही भगवी पताका आपण भगवंताचे दास, अंकीत भक्त आहोत, हे दर्शविणारी खूण आहे. म्हणून माउली सांगतात, पंढरीला खांद्यावर पताका घेऊन जाणे ही माझी मनापासूनची आवड आहे. खरे तर आवड ही निर्मित्त असते तरी सुद्धा ही आवड का निर्माण झाली असे जर माउलींना विचारले तर माउली सांगतात,
पांडुरंगी मन रंगले ।
गोविंदाचे गुणीं वेधलें ।।२।।
माझे जे आराध्य दैवत पांडुरंग ज्याला माउली येथे गोविंद या नावाने संबोधतात, तो गुण संपन्न आहे. विष्णु पुराणात देवाला भगवान हे नामाभिधान त्याच्या गुण संपन्नतेनेमुळेच प्राप्त झाले आहे, असे सांगितले आहे.
ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशसः श्रियः।
ज्ञानवैराग्ययोश्चैव षण्णां भग इतीरणा ।।
श्री ज्ञानराज माउली भगवान या नामासंबधी सांगतात,
आइका यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ।
हे साही गुणवर्य, वसती जेथ । म्हणोनि तो भगवंतु ।।
यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य या साही गुणांची परिसीमा श्रेष्ठता वरेता देवाजवळ आहे, म्हणून त्याला भगवान हे नामाभिधान प्राप्त झाले आहे. हे सहा गुणवर्यांनी भगवान संपन्न आहे आणि या गुणवर्यांनी तो संपन्न असल्याने काय झाले?
पांडुरंगी मन रंगले ।
ज्याचा रंग हा पांडुर म्हणजे फिकट पिवळसर आहे. त्याच्याकडे माझे मन वेधले गेले म्हणजे आकृष्ट झाले आणि या गुणवर्यसंपन्न अशा गोविंदाकडे, पांडुरंगाकडे माझे मन आकृष्ट झाल्याने माझ्या मनात जिथे हा पांडुरंग आहे अशा पंढरी क्षेत्रास, त्या पांडुरंगाच्या दास्यत्वाचे उपलक्षण असलेली भगवी पताका घेऊन नाचत गात आनंदाने जावे, अशी ज्ञानोत्तर आवड आहे.
एकदा जर का एखाद्या विषयाची आवड माणसाच्या अंतःकरणात निर्माण झाली की त्याला काही सुचत नाही, त्या आवडीच्या गोष्टी संबंधिचेच विचार त्याच्या मनामध्ये रुंजी घालत असतात, तीच अवस्था श्री ज्ञानराज माउलींची झाली आहे. माउली सांगतात,
जागृति स्वप्न सुषुप्ति नाठवे ।
पाहतां रुप आनंदी आनंद साठवे ।।
सर्व सजीव प्राणीमात्रांचे जीवन हे तीन अवस्थांमध्ये विभागलेले आहे
जागृती, स्वप्न, सुषुप्ती
माउली सांगतात, या तीनही अवस्था या सहजतने प्राप्त होणाऱ्या नैसर्गिक अवस्था आहेत. पण त्या गुणवर्यवान भगवांताने माझ्या मनाला वेधले असल्याने आकृष्ट केले असल्याने मला या तीनही अवस्थांचा विसर पडला आहे. वस्तुस्थितीने शास्त्रतः मला पंढरीला जाणे बंधनकारक नाही तरी माझ्या मनाला देवाने वेध लावल्याने माझ्या मनात त्या देवासंबधी जी आवड त्यामुळे मी पंढरीला गेलो आणि जेव्हा त्या देवाचे रूप पाहिले तेव्हा त्याचा परिणाम काय झाला ते सांगताना माउली सांगतात,
पाहतां रुप आनंदी आनंद साठवे ।
आपण सुरुवातीसच पाहिले आहे की, हा अभंग हा ज्ञानोत्तरभक्ती सांगणारा आहे. मी स्वतः आनंदी म्हणजे आनंद स्वरूप आहेच आणि जेव्हा या पांडुरंगाचे स्वरूप पाहता पाहणे दुरी सारून पाहतो म्हणजेच अनुभवतो तेव्हा अनंदाने आनंद साठवल्यासारखे होतो.
श्री तुकाराम महारांजांच्या शब्दात सांगायचे झाले तर
आनंदाचे डोही आनंद तरंग ।
आनंदची अंग आनंदाचें ।।
काय सांगो जाले काहीचियाबाही ।
पुढे चाली नाही आवडीने ।।
अशी अवस्था झाली झाली आहे. ज्याच्या अनुभवाने ही बोलण्याच्या पलीकडीची अनिर्वाच्य अवस्था प्राप्त झाली, तो श्री विठ्ठल कसा आहे, हे श्री ज्ञानराज माउली सांगतात,
बापरखुमादेविवर सगुण निर्गुण ।
रुप विटेवरी दाविली खुण ।।
वारकरी संप्रदाय हा ऐकांतिक सगुणवादी अथवा ऐकांतिक निर्गुणवादी सुद्धा नाही हा संप्रदाय सगुण निर्गुणाचा समन्वय सांगणारा आहे. यानुसार श्री ज्ञानराज माउली रखुमादेवीचा वर बाप विठ्ठल कसा आहे सांगताना सांगतात हे जे आपल्याला दिसणारे दृग्गोचर होणारे स्वरूप आहे, ते सगुण साकार आहे आणि त्याच्या तळवटी असणारी, आधारभूत असणारी वीट मात्र निर्गुण स्वरुपाची खूण म्हणजे उपलक्षण, द्योतक आहे.
या ठिकाणी श्री ज्ञानराज माउलींनी वारी हे कर्म कर्तव्य नसाताना सुद्धा वारी करतात. कारण वारी हा माउलींच्या अत्यंत आवडीचा विषय आहे. दुसरे कारण म्हणजे माउलींनी वारीचा आदर्श आपल्या समोर घालून दिलेला आहे, या संबंधी भगवान सांगतात,
यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ।।
याचा भाव असा की, श्रेष्ठ पुरुष जे जे कर्म करतात तेच लौकिक अथवा वैदिक कर्माला प्रामाण मानून लोक त्याच्या अनुसार कर्म करतात. माउली सांगतात,
एथ वडील जें जें करिती ।
तया नाम धर्मु ठेविती ।
तेंचि येर अनुष्ठिती।
सामान्य सकळ ।।
हें ऐसें असे स्वभावें ।
म्हणौनि कर्म न संडावें ।
विशेषें आचरावें।
लागे संतीं ॥
याचा भाव असा की वडील म्हणजे श्रेष्ठ लोक जसे वागतात तसेच सामान्य लोक वागतात. त्या श्रेष्ठांच्या वागण्याला सामान्य लोक धर्म समजतात, यास्तव समाजामध्ये ज्याना श्रेष्ठ समजले जाते, त्यांनी कर्म करताना त्यांना आवश्यक नसले तरीही धर्माणुगुण कर्माचरण आवश्य करावे. या सगळ्यांचा विचार करून असे म्हणता येईल की पहिले कारण आवड आणि आपल्यासमोर आदर्श निर्माण करण्याकरीता माउली आचरण करतात आणि सांगतात, माझे जिवीचे आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ।।
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.