पिंपरी-चिंचवड

विठाई पंधरा काशीद

CD

भक्तीच तारक

वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी असलेले संत तुकाराम महाराज एक क्रांतिकारी संत म्हणून ओळखले जातात. त्यांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा यंदा सर्वत्र साजरा होत आहे. त्यानिमित्ताने सर्वत्र अखंड हरिनाम सप्ताहही सुरू आहेत. यामधून एक गोष्ट प्रकर्षाने सांगायला हवी की, आपण तुकाराम महाराजांच्या विचारांचे पाईक समजत असू, तर त्यांच्या विचारांचे आचरण आपल्या जीवनात करणे हेच आपले परम कर्तव्य समजले पाहिजे. या बाबत प्रत्येक साधकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
- विद्या अरुण काशीद, इंदोरी

सं त तुकाराम महाराजांनी समाजाला भक्तीच्या माध्यमातून आत्मिक उन्नतीचा, लोककल्याणाचा आणि सामाजिक समत्वाचा मार्ग दाखविला. त्यांचे जीवन आणि अभंग हे आजही प्रेरणादायी आहेत. तुकाराम गाथा ही सर्वसामान्यांची, साधकांची जगण्याची जीवनवाहिनीच आहे. आदर्श जीवन कसे जागावे, हे संत तुकाराम महाराजांइतक्या सोप्या आणि सरळ भाषेत कोणीच सांगितले नाही. तुकोबारायांनी विठ्ठल भक्तीच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा एक सशक्त मार्ग उभा केला. त्यांनी अभंगांमधून दांभिकता, जातिभेद, अज्ञान यांचा तीव्र विरोध केला. त्यांनी समतेचा आणि विवेकाचा संदेश दिला. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव महाराजांसह समस्त संत मांदियाळीच्या विचारांचा आदर्श त्यांनी मानला. आपल्या अभंगांमधून सामान्यजणांपर्यंत सोप्या भाषेत अध्यात्म पोहोचविला.
भक्ती म्हणजे केवळ भजन, पूजन नव्हे तर ती जीवन जगण्याची पद्धत आहे, हे त्यांनी शिकवले. त्यांची भक्ती ही आत्मशुद्धी, सामाजिक समता आणि सत्याचा आग्रह यावर आधारित होती. त्यांनी कर्ममार्ग, ज्ञानमार्ग आणि भक्तीमार्ग यांचा समन्वय साधून सर्वसामान्य माणसाला जीवनाचा खरा अर्थ उलगडून दाखविला.
तुकोबारायांचे विचार म्हणजे समता आणि लोककल्याणाचा झरा होता. त्यांनी स्त्री-पुरुष समानता, श्रमाचे महत्त्व आणि अंधश्रद्धेविरोधातील विचार मांडले. केवळ मंदिरातील देवाची नाही तर समाजातील गरजू, गरीब, वणवण भटकणारे लोकांचीही सेवा केली पाहिजे, असे सांगितले.
जे का रंजले गांजले ।
त्यासी म्हणे जो का आपुले।।
हा त्यांचा दृष्टिकोन अत्यंत लोककल्याणकारी आहे. पंढरपूर वारीच्या माध्यमातून एक सामाजिक समरसतेचा प्रवास त्यांनी उभा केला. त्यात उच्च-नीच, जातीभेद नाही, या बाबत जनजागृती केली. त्यांचे अभंग केवळ भक्तिपर नव्हे तर समाजपरिवर्तनाचे साधन होते. त्यांनी अभंगातून सर्व विषयांना स्पर्श केला आहे. प्रपंचात राहून संसार कसार करावा, याचा वस्तूपाठ त्यांनी दाखवून दिला. आपल्या आचार विचारांतून तो दाखवून दिला. प्रतिकूल काळातही आदर्श समाज बांधण्याचा प्रयत्न केला. समाजात घडणाऱ्या घटना पाहून त्यांनी आपल्या अभंगांतून प्रबोधनात्मक रचना केल्या. येणाऱ्या अडचणींवर मात कशी करता येईल, याची शिकवण त्यांनी दिली. ती आजही समाजासाठी मार्गदर्शक ठरते आहे.
संत तुकाराम महाराजांनी भक्तीमार्गाच्या आधारे समाजातील अज्ञान, अन्याय आणि विषमतेला आव्हान देत लोकांमध्ये आत्मविश्वास, श्रद्धा आणि सदाचार निर्माण केला.
परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी संत तुकाराम महाराजांनी भक्तीची अत्यंत सोपी संकल्पना सांगितली आहे. सामान्यजनांना ती करता यावी, असा त्यांचा त्यामागील दृष्टिकोन होता. त्यांनी भक्तीला केवळ कर्मकांड, विधी, पूजा-अर्चनेपुरते मर्यादित ठेवले नाही, तर ती जीवनाचे सार, आत्मशुद्धी आणि लोककल्याण ही साधने मानली.
ठायींच बैसोनि करा एकचित्त ।
आवडी अनंत आळवावा।।
असे त्यांनी आपल्या अभंगातून सांगितले. म्हणजे कोठेही न जाताही आपल्याला ईश्वरप्राप्ती होऊ शकते. मात्र, तशा भक्ती करता आली पाहिजे. त्यासाठी त्या रमात्म्याचे नामस्मरण हे परमार्थाचे सर्वोच्च साधन असल्याचे त्यांनी सांगितले. विठ्ठलाचे नाम घेतल्यास आत्मिक शांती मिळते. आत्मिक शांती मिळाली तर विवेक जागा ठेऊन चांगले कार्य, चांगले आचरण आपल्याकडून होते. नामस्मरणाने आपोआप पापांचा नाश होतो. इतकेच नाही तर अखंड नामस्मरण हा ईश्वराशी एकरूप होण्याचा मार्ग आहे.

उत्तम भक्ताचे लक्षण।
श्री भागवती बोलिले जाण।
तुकयाच्या अंगी।
एकही न्यून असेना।।
या अभंगातून महिपती महाराज तुकोबारायांचे वर्णन करतात. त्यांच्या अंगी एकही लक्षण कमी नव्हते. सदा सत्यवादी, परोपकारी, भूतदया ही लक्षणे त्यांच्याकडे होती. सर्व जिवांना ते आपले स्वरुप मानत. आपला, परका असा भेद ते करीत नव्हते. अशी संतांची अंतरंग लक्षणे तुकोबारायांच्या अंगी होती. भक्ती ही अनिती, दांभिकता, अहंकारापासून मुक्त असली पाहिजे. अन्यथा ती भक्ती खोटी आहे, असे तुकोबाराय सांगतात. पूर्ण समर्पण भावाने परमात्म्याची भक्ती करावी. ती केली तरच भगवंताशी जवळीक शक्य आहे. म्हणून तर त्यांनी सांगितले.
या रे या रे लहान थोर।
जन्माला आलेल्या प्रत्येक जिवाला परमात्म्याची भक्ती करण्याचा अधिकार आहे. सर्वाठायी परमात्मा भरलेला आहे, याप्रमाणे ईश्वर हा प्रत्येकाच्या अंतकरणात आहे. समाजातील अनिष्ठ गोष्टी मुक्त करण्यासाठी त्यांना सकारात्मक मार्गाने भक्ती करायला सांगितली. परमात्म्याविषयी आवड निर्माण करण्यासाठी नामस्मरणाचा मार्ग दाखविला. त्यांनी कीर्तनातून समाज प्रबोधन केले. केवळ आपला उद्धार करून घेणे हे त्यांना कधीच मान्य नव्हते. आपल्याबरोबर सर्व जिवांचा उद्धार व्हायला पाहिजे, अशी त्यांची भावना होती. म्हणूनच त्यांनी रंजल्या-गांजल्यांचा उद्धार केला.
तुकोबारायांना वैकुंठाला नेले असले तरी आजही आपल्यासारख्या सामान्यजणांना अभंग गाथेच्या रुपाने विचारांचे मोठे कोठार उपलब्ध करून दिले आहे. गेल्या चारशे वर्षांपासून त्यांच्या अभंगातून अनेकांना जगण्याचा आधार मिळाला. परमार्थिकाला त्यांचे विचार दीपस्तंभाप्रमाणे आहेत. जीवन जागताना त्यांच्या आचार विचारांचे अनुकरण केल्यास आपल्यालाही उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांची अभंगगाथा युगानयुगे मार्गदर्शक राहील, यात शंका नाही.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT