पिंपरी, ता. ६ : विठ्ठल मंदिरांमध्ये पहाटेपासूनच पूजा व अभिषेक...फुलांची आकर्षक सजावट...लाडक्या देवाच्या दर्शनासाठी भाविकांनी केलेली गर्दी, भजन, कीर्तनांसारखे धार्मिक कार्यक्रम, विठ्ठल रुक्मिणी व वारकरी यांची वेशभूषा केलेले लहानगे, विविध धार्मिक-सांगीतिक कार्यक्रम असे वातावरण रविवारी (ता.६) शहरात दिसून आले. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरांच्या परिसरात पहाटेपासूनच गर्दी झाल्याने शहर-उपनगरांतील अवघे वातावरण विठ्ठलमय झाले होते.
वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस म्हणजे आषाढी एकादशी. पिंपरी-चिंचवड शहर आणि उपनगरांत ही एकादशी मोठ्या उत्साह आणि भक्तिभावात साजरी करण्यात आली. पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिलांसह शाळकरी मुले, टाळ-मृदंगांच्या गजरात दुमदुमलेला विठ्ठल मंदिराचा परिसर यामुळे संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. रविवारी सकाळपासूनच शहरात पावसाचा जोर होता. मात्र, भरपावसातही भाविकांचा उत्साह दिसून आला. आकुर्डी, एच. ए. कॉलनी, निगडी- प्राधिकरण, सांगवी, भोसरी, मासुळकर कॉलनी, भोसरी, या भागांतील विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होती.
आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात पहाटेपासूनच रांगा
आकुर्डी येथील प्राचीन विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी दिसून आली. ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’च्या गजरात मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. मंदिर समितीने परिसरात फुलांची आकर्षक सजावट केली होती. दिवसभर हरिपाठ, कीर्तन, भजन आणि अभिषेक-पूजनाचे आयोजन करण्यात आले. स्थानिक भाविकांसह लहानग्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सोहळ्यात रंग भरला. महिलांनी रिंगण सोहळा आणि पालखी सजावटीत सहभाग देत भक्तीचा उत्सव अधिक खुलवला. गर्दीच्या योग्य व्यवस्थेसाठी पोलिस बंदोबस्त तसेच स्वयंसेवकांनी विशेष प्रयत्न केले. परिसरात स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा व अन्नदानाचे उत्तम नियोजन करण्यात आले होते. पहाटे साडेचार वाजता काकड आरती झाली. पहाटे पाच वाजता अभिषेक विश्वस्त संतोष कुटे सपत्नीक यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर हरिपाठ व भजन पार पडले. संध्याकाळी पाच वाजता कीर्तन सेवा ह.भ.प. उद्धव महाराज कोळपकर यांचे कीर्तन पडले