प्रदीप लोखंडे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १२ ः पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) नदी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी इंद्रायणी नदीकाठी उभारण्यात येणाऱ्या ३६ एसटीपी प्रकल्पाच्या निधीसाठी आता जायका प्रकल्पाचा आधार घ्यावा लागणार आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाकडून अद्याप मंजुरी न आल्याने राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्याबाबत विधानसभेतही नुकतीच घोषणा केली आहे. मात्र, त्याची पुढील अंमलबजावणी कधी होणार ? असा प्रश्न आहे. तो पर्यंत हा प्रस्ताव कागदावरच राहणार असल्याचे चित्र आहे.
इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पीएमआरडीएकडून इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. देहू व आळंदी ही महत्वाची तीर्थक्षेत्रे इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेली आहेत. आळंदी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेकरिता इंद्रायणी नदी ही मुख्य स्त्रोत आहे. कार्ला, चाकण एमआयडीसी भागांत नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पामुळे नदीमध्ये मिसळणाऱ्या दूषित पाण्याचे प्रदूषण रोखले जाऊन नदीचे प्रदूषण नियंत्रणात येणार आहे. या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल सल्लागारामार्फत तयार करून नदीच्या दोन्ही काठांवर हे प्रकल्प राबविले जाणार आहेत.
निधीवर प्रकल्पाची गती...
केंद्र सरकारच्या एनआरसीडीकडे प्रस्ताव पाठवून सहा वर्षे लोटली आहेत. मात्र, अद्याप निधीसाठी मंजुरी मिळाली नाही. हे प्रकल्प त्वरित मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली असल्याचे चित्र आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जायका या नदी सुधारसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पातून निधी उभा करण्याची घोषणा केली आहे. मात्र त्याला गती कधी मिळणार ? असा प्रश्न आहे. या निधीवर या प्रकल्पाची गती ठरणार आहे.
कुठे होणार प्रकल्प ?
इंद्रायणी नदी लोणावळ्यातील (ता. मावळ) कुरवंडे या गावापासून उगम पावते. डोंगरगाव, सुधापूर, कार्ला, मळवली, वडिवळे, कामशेत, नाणे-कान्हे, आंबी, इंदोरी, देहू व आळंदी असा एकूण लांबी १०५.३ किलोमीटर प्रवास करून भीमा नदीला तुळापूर येथे मिळते. या मार्गामधील लोणावळा, तळेगाव दाभाडे, आळंदी या तीन नगरपरिषदा, वडगाव, देहू या दोन नगरपंचायती, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड आदी ठिकाणी हे एसटीपी प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत.
केंद्र सरकारच्या एनआरसीडीकडे प्रस्ताव पाठविला आहे. अद्याप त्याबाबत कोणताही प्रतिसाद प्राप्त झालेला नाही. त्यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे. जायकातून निधी देण्याबाबत राज्य शासन विचार करत असल्याचे समजले. शासनाकडून त्याबाबत कळविले जाईल.
- डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.