अमोल शित्रे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी ः वाकड काळाखडक येथे रस्ता रुंदीकरणासाठी बुधवारी (ता. १६) महापालिकेने बांधकामांवर कारवाई केली. त्यामुळे सकाळी नऊ ते दुपारी साडेबारापर्यंत डांगे चौक ते भूमकर चौक दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. पीएमपी व स्कूलबस वेळेत पोहोचू न शकल्याने विद्यार्थी व प्रवाशांची आणि कोंडीत अडकल्याने नोकरदारांसह आयटीयन्सची गैरसोय झाली. कारवाईमुळे वळवलेल्या रस्त्यांची पूर्वकल्पना नसल्याने तीन-चार किलोमीटरचा वळसा घालून जावे लागल्याचे संताप काही नागरिकांनी व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवड शहरातून हिंजवडी राजीव गांधी माहिती व तंत्रज्ञान पार्ककडे (आयटी) जाण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या चिंचवड ते हिंजवडी रस्त्यावरील डांगे चौक ते भूमकर चौक दरम्यानच्या अतिक्रमणांवर आणि रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवर कारवाई केली. तब्बल चार तास कारवाई सुरू होती. त्यानंतर राडारोडा हटविण्यात आला. त्यामुळे डांगे चौक ते भूमकर चौक दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे विद्यार्थी, आयटीयन्स आणि परगावी जाणारे व येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. या मार्गावरील पीएमपी बसचेही वेळापत्रक कोलमडले. कारवाईसाठी वाहतूक वळविली होती. मात्र, त्याची कोणतीही पूर्वसूचना नागरिकांना मिळाली नव्हती. परिणामी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
मी कंपनीत नेहमी याच रस्त्याने जाते. कंपनीत पोहोचण्यासाठी दररोज अर्धा-पाऊन तास वेळ लागतो. परंतु, रस्त्यावर आज एवढी वाहतूक कोंडी होती की यामुळे ठिकठिकाणी पंधरा ते वीस मिनिटे थांबावे लागले. कंपनीत पोहोचण्यासाठी नेहमीपेक्षा दीड तास उशीर झाला.
- प्रियांका दुबे, टीम लीड, कॉग्निझंट, फेज थ्री
नेहमीप्रमाणे डांगे चौकाच्या भुयारी मार्गातून भूमकर चौकाकडे निघालो, पण मोठ्या प्रमाणात कोंडी लागली. नेहमीपेक्षा कोंडी अधिक असल्याने कामावर पोहोचू शकतो की नाही, या बाबत चिंता वाढली होती. भूमकर चौकाजवळ वाहतूक वळवली होती. त्यामुळे कामावर पोहोचण्यास दोन तास उशीर झाला.
- शिवम सिंग, प्रोजेक्ट मॅनेजर, विप्रो, फेज टू
सकाळी लवकर गाडी पकडून कोल्हापूरला निघायचे होते. भूमकर चौकात पोहोचण्यासाठी डांगे चौकातील पीएमपी बसथांब्यावर दोन तास झाले थांबलोय. रिक्षासुद्धा मिळत नसल्याने आता कसे पोहोचायचे असा प्रश्न आहे. पुढे रस्ता अडवल्याचे सांगितले जातेय, पण काय करावे सूचत नाही.
- आकाश चव्हाण, प्रवाशी, चिंचवड
मी चिखलीत राहते. साताऱ्याला गेले होते. तेथून आताच आले. भुमकर चौकात उतरले. चिखली येथे जाण्यासाठी बसची वाट पाहिली. पण, बस मिळत नसल्याने डांगे चौकाकडे पायी चालत जात आहे. रस्ता अडवल्यामुळे पोलिस पण विचारपूस करत आहेत. नेमके काय झाले कळत नाही.
- राणी निकाळजे, प्रवाशी, चिखली
चिंचवड आणि पिंपरी येथील शाळेत जादा तास असल्याने मुलींची बस सव्वाअकरा वाजता येणे अपेक्षित होते. आता साडेअकरा वाजले तरी स्कूलबस आलेली नाही. चालकांना मोबाईलद्वारे संपर्क साधला असता, ट्रॅफिक जाम असल्यामुळे उशीर होत असल्याचे त्यांनी सांगितले.
- ज्योती लोखंडे, विद्यार्थिनींचे पालक
माझी शाळा पुणे-मुंबई महामार्गाच्या पलीकडे वाकड येथे आहे. शाळेत जाण्यासाठी बसची वाट पाहिली पण बस मिळाली नाही. मला वेळेत पोहोयचे आहे, मी पायी चालत जात आहे.
- गीता चौधरी, विद्यार्थिनी
रस्ते वळवले; कोंडीने घेरले
- भूमकर चौकातून डांगे चौकाकडे येणारी वाहतूक डावीकडे आणि उजवीकडे वळवली होती. त्यामुळे हिंजवडी, लक्ष्मी चौक, मारुंजी, विनोदे वस्तीकडून येणाऱ्या वाहनांना ताथवडे किंवा वाकड मार्गे जावे लागले
- डांगे चौकातून भूमकर चौकमार्गे हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारी वाहतूक काळाखडक येथून डाव्या बाजूने फिनिक्स मॉलकडे वळवली होती. पण, पुढील अंतर्गत छोट्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या
- भूमकर चौकातून ताथवडेमार्गे चिंचवडकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्यामुळे अंतर्गत रस्त्यावर कोंडी झाली, ताथवडे चौक व पवारनगर चौकात देखील वाहतूक कोंडी झाली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.