- प्रा. रेखा भालेराव (मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी महिला, मोशी)
मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी फॉर लेडीज मोशी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यातर्फे ‘महिला सशक्तीकरण व सक्षमीकरण’ कार्यशाळा झाली. महिला व विद्यार्थिनींमध्ये जागरूकता, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमतेचा विकास करणे हा उद्देश होता. महिला हेल्पलाइन भित्तिपत्रकाचे प्रकाशन मनीषा बिर्नीस (जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी) यांच्या हस्ते झाले. शकील शेख (मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे) आणि ॲड. परम आनंद (प्रबंधक, चाइल्ड प्रोटेक्शन) उपस्थित होते. प्रीती अडवाणी यांनी ‘महिलांची निर्णय घेण्याची क्षमता’ विषयावर मार्गदर्शन केले. स्व-आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता कशी विकसित करावी, यावर त्यांनी भर दिला. परिक्रमा खोत यांनी ‘महिलांचे हक्क व सुरक्षिततेचे नियम’ विषयावर मार्गदर्शन केले. कायदेशीर हक्क, सुरक्षिततेच्या उपाययोजना, स्वसंरक्षण तंत्राची माहिती दिली. प्राचार्य डॉ. एस. एन. ढोले, उपप्राचार्य डॉ. वृषाली तांबे उपस्थित होते. कार्यशाळेत १८० विद्यार्थिनींचा सहभाग होता. त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविले.
(34862)
स्वयंसेवकांकडून वारकऱ्यांना फराळ
मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी फॉर लेडीज मोशी येथील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी आळंदीकडून देहूकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना फराळ वाटप केले. यात चिवडा, केळी, पाण्याच्या बाटल्या आदींचा समावेश होता. प्राचार्य डॉ. एस. एन. ढोले व कार्यक्रम अधिकारी रेखा भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली त्रुप्ती सारोदे यांनी समन्वय साधला. गणेश कदम, प्रवीण पाटोळे, नवनाथ, ज्योती आल्हाट, पंकज झेंडे यांचे सहकार्य लाभले.
शाश्वत वाहतूक अन् पर्यावरणपूरक वाटचाल
(मराठवाडा मित्रमंडळ पॉलिटेक्निक, थेरगाव)
मराठवाडा मित्रमंडळ पॉलिटेक्निक व लॉजिकॉन टेक्नोसोल्युशन्स तर्फे शाश्वत वाहतूक आणि पर्यावरणपूरक पद्धतींकडे वाटचालविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इलेक्ट्रिकल विभागातील ‘इलेक्ट्रिक व्हेईकल टेक्नॉलॉजी लॅब’साठी एक इलेक्ट्रिक व्हेईकल डोनेट केली. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक पद्धतींना प्रोत्साहन देणे तसेच इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि अक्षय ऊर्जा प्रणालींशी संबंधित प्रत्यक्ष शिक्षणाच्या संधी प्रदान करणे, या उद्देशाने उपक्रम राबविला. कंपनीचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक हनुमंत पानसरे, सहसंस्थापक प्रतिभा पानसरे, ऑपरेशन्स व मार्केटिंग प्रमुख रोहित पानसरे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना क्लीन एनर्जी उपायांबद्दल नावीन्यपूर्ण विचार करण्यास प्रेरणा मिळेल, असे प्राचार्या गीता जोशी यांनी सांगितले. इलेक्ट्रिकल शाखा विभागप्रमुख तुषार कदम यांनी आभार मानले. संस्थेचे कार्याध्यक्ष बी. जी. जाधव यांनी सर्वांचे अभिनंदन केले. प्लेसमेंट अधिकारी गणेश म्हाळणकर यांनी सूत्रसंचालन केले.
(34861)
---
मुलींना महिला सबलीकरणाचे धडे
(डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी)
आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यातर्फे आयोजित ‘महिला सबलीकरण’ कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘आंतर सक्षमता ः महिलांचा आरोग्य आणि सामर्थ्याकडचा प्रवास’ असा विषय होता. प्राध्यापिका, महिला कर्मचारी आणि विद्यार्थिनींमध्ये आरोग्य, कायदेशीर हक्क आणि मानसिक सबलीकरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने कार्यशाळा झाली. अधिवक्ता ॲड. प्रितीसिंग परदेशी आणि स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. अंजली गुर्रम यांनी मार्गदर्शन केले. महिलांसाठीचे कायदे व आरोग्यविषयक बाबींची त्यांनी माहिती दिली. संस्थेचे संकुल संचालक रिअर ॲडमिरल अमित विक्रम (नि.) यांनी विद्यार्थिनींना प्रोत्साहित केले. प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे यांनी विद्यार्थिनींना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे आवाहन केले. डॉ. सोनाली महापरळे आणि प्रा. अंजू कल्याणकर यांनी संयोजन केले. डॉ. शुभांगी जाधव व डॉ. पल्लवी चौधरी यांनी मार्गदर्शन केले. भूमिका झाडे व शोना जॉन यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अश्विनी
गावीत यांनी आभार मानले.
(34860)
स्टार्टअप, इनक्युबेशन, बौद्धिक संपदा संरक्षण
(प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी)
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयात ‘स्टार्टअप, इनक्युबेशन आणि बौद्धिक संपदा संरक्षण’ विषयावर कार्यशाळा झाली. डॉ. सोनाली रवींद्र व मधुवंती केळकर यांनी मार्गदर्शन केले. ‘बौद्धिक संपदा म्हणजे काय?’, ‘पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, औद्योगिक डिझाइन, भौगोलिक निर्देशांक यांचे प्रकार’, ‘स्टार्टअप’, ‘पेटंट अर्ज प्रक्रियेची माहिती’, ‘संशोधन करताना घ्यावयाची काळजी’, ‘आयपीचे व्यवसायीकरण आणि सरकारी प्रोत्साहन योजना’ आदी विषयांवर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी आयक्यूसी समन्वयक डॉ. पी. एस. तांबडे होते. प्राचार्य डॉ. ए. जे. खंडागळे, डॉ. एच. बी. सोनवणे, डॉ. एम. बी. राठोड (उपप्राचार्य), विज्ञान अधिष्ठाता डॉ. आर. ए. पवार व डॉ. एम. एच. मौलवी यांचे सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
(डॉ. तेलंग हॉटेल मॅनेजमेंट)
कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे डॉ. अरविंद बी. तेलंग इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत झाले. सोसायटीचे अध्यक्ष वालचंद डी. संचेती, कॅनरोड हॉटेलचे महाव्यवस्थापक अभिषेक सहाय, मारिओट हॉटेलचे मनुष्यबळ विकास व्यवस्थापक पौर्णिमा कुमारी, ग्रँड एक्सोटीकाचे आम्रपाली देसाई , प्राचार्य (डॉ.) अजयकुमार राय आदी उपस्थित होते. सहाय म्हणाले, ‘‘चांगले समृद्ध जीवन जगायचे असेल तर चौकटी बाहेर पडून खूप मेहनत करा. हॉटेल उद्योगामध्ये अनेक मोठमोठे कलाकार, उद्योजक येतात. त्यामुळे चांगली सेवा द्यायची आपल्याला एक संधी मिळते. आणि त्यांच्याकडून आपल्याला खूप चांगल्या गोष्टी शिकायलादेखील मिळतात. यासाठी विद्यार्थ्यांनी आपले इंग्रजी संभाषण कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि विशेष हॉस्पिटॅलिटी कौशल्य वाढवावे.’’
विद्यार्थ्यांनी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करताना चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवले पाहिजे आणि हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक अभ्यागतांची मनापासून काळजी घेतली पाहिजे, असे पूर्णिमा कुमारी म्हणाल्या. सूत्रसंचालन द्वितीय वर्षातील विद्यार्थी मृणाल सोनकुसरे आणि अदिती भालेराव यांनी केले. प्रा. शेखर खैरनार यांनी आभार मानले.
(34863)
फील्ड प्रोजेक्टसाठी मार्गदर्शन
(मॉडर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज)
पीईएसच्या मॉडर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड कॉम्प्युटर स्टडीजमध्ये ‘फील्ड प्रोजेक्टसाठी रिसर्च मेथडॉलॉजी’ विषयावर डॉ. सुदर्शन पवार यांनी विद्यार्थ्यांना संशोधन पद्धती व प्रकल्प लेखनातील महत्त्वाच्या बाबींचे मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक (आयक्यूएसी) प्रा. धन्वंतरी नरवडे यांच्या संयोजनाखाली सत्र झाले. प्राचार्य डॉ. मनोज साठे आणि शैक्षणिक समन्वयक डॉ. प्रसन्न चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. संकेत उधाणे यांनी सूत्रसंचालन केले.
दुर्ग संवर्धन क्लबकडून लोहगड स्वच्छता मोहीम
- वैष्णवी मुंजाळ/एल. श्रेया (अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग)
दुर्ग संवर्धन क्लबच्या ३२ सदस्यांनी स्वच्छता अभियानातून १० किलो मायक्रो प्लॅस्टिक लोहगड परिसरातून उचलून नष्ट केले. क्लबचे अध्यक्ष प्रा. विकास मोगडपल्ली यांनी पर्यटकांना आवाहन केले की, गडांच्या स्वच्छतेची जबाबदारी सर्वांची आहे. गड पाहून झाल्यानंतर आपल्याकडील प्लॅस्टिक बाटली व कचरा गडाच्या पायथ्याशी आणून कचरा कुंडीतच टाकावा. क्लब केवळ स्वच्छता मोहिमेचे नव्हे तर थोर मराठा योद्धे संताजी, धनाजी यांच्या समाधिस्थळांची दुरुस्ती करण्याचा संकल्पही यावेळी केला. महाराणी ताराबाई यांचे कराड येथील समाधिस्थळाची साफसफाईचा संकल्पही क्लबने केला आहे. सचिव कन्हैया बोबडे, सहसचिव सागर गुटाळ, खजिनदार हर्षदा, स्वयंसेवक प्रणव पाठक, अद्वैत कुलकर्णी, यश मोरे, प्रा. अमोल साठे, डॉ. कैलास टेहेरे आदी उपस्थित होते.
(34859)
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.