पिंपरी, ता. १८ ः महापालिकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ करिता मिळकतकर सवलतीच्या विविध योजना जाहीर केल्या आहेत. त्याचा लाभ ३० जूनपूर्वी घेणे आवश्यक आहे. नागरिकांना करभरणा घरबसल्या करता यावा, यासाठी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध आहेत. तसेच, आर्थिक वर्षाचा संपूर्ण मिळकतकर ३० जूनपर्यंत भरल्यास पाच टक्के आणि ऑनलाइन भरल्यास आणखी पाच टक्के अशी एकूण १० टक्के सवलत मिळणार आहे.
शहरातील मालमत्ताधारकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये मिळकत कर वेळेत भरून सवलतींचा लाभ घेतला आहे. त्यामुळे ९६६ कोटी रुपयांचा महसूल वसूल झाला आहे. यावर्षीही करदात्यांसाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी मालमत्ता कर लवकर भरावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ज्या महिला, दिव्यांग आणि माजी सैनिकांनी सवलतींचा लाभ घेतला आहे, त्यांना २०२५-२६ मध्ये सवलतींचा लाभ घेण्यासाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नसल्याचेही मिळकतकर विभागाने स्पष्ट केले आहे.
शहरातील एकूण मिळकती ः ६,१५,८६३
२०२४-२५ मध्ये पहिल्या तीन महिन्यात करभरलेल्या मिळकती ः ३,४९,८३८
२०२४-२५ मध्ये पहिल्या तीन महिन्यात भरलेला कर ः ४३५ कोटी
मिळकतकर सवलत योजना
- ३० जूनपर्यंत आगाऊ तसेच, ऑनलाइन कर भरणाऱ्यांसाठी १० टक्के
- महिलांच्या नावावरील निवासी मिळकतींना ३० टक्के
- ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व (अंध, अपंग, मतिमंद, कर्णबधिर व मूकबधिर) असलेल्यांच्या नावावरील मिळकतींना ५० टक्के
- ग्रीन बिल्डिंग रेटिंगमध्ये ३ ते ५ रेटिंग असणाऱ्या मिळकतींना ५ ते १० टक्के
- कंपोस्टींग यंत्रणा, एसटीपी प्लांट, झिरो वेस्ट संकल्पना राबविणाऱ्या निवासी मिळकतींना सामान्य करात ५ ते १० टक्के
- शैक्षणिक इमारतींमध्ये ऑनसाईट कंपोस्टिंग, झिरो वेस्ट, झिरो वेस्ट रेनवॉटर हार्वेस्टिंग, झिरो वेस्ट सौर ऊर्जा यासंकल्पना राबवणाऱ्या मालमत्तांना सामान्य करात ४ ते १० टक्के
- शौर्य पदक धारक व माजी सैनिक, विधवा पत्नी, अविवाहित शहीद, सैनिक यांना मालमत्ताकरात १०० टक्के
- सलग तीन वर्षे मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ता धारकांना सामान्य कर रकमेवर २ टक्के सवलत
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने २०२५-२६ या वर्षाकरिता मालमत्ता करामधील सवलत व सूट जाहीर केल्या आहेत. या मालमत्तांची बिले देखील ऑनलाइन जनरेट झाली आहेत. ३० जून २०२५ पर्यंत ऑनलाइन मालमत्ता कर भरणाऱ्यांना किमान दहा टक्के सामान्य करावर सवलत मिळणार आहे. ३० जून २०२५ पर्यंत कर भरून विविध कर सवलीतीचा लाभ घेता येणार असल्यामुळे जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी आपला कर ३० जून पूर्वी ऑनलाईन पद्धतीने भरून या सवलतींचा लाभ घ्यावा.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.