पिंपरी, ता. ११ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने ‘हॉकी महाराष्ट्र’च्यावतीने, नेहरुनगर येथे बुधवार (ता.१२) पासून २३ ऑगस्टपर्यंत १६ व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील ३० संघ विजेतेपदासाठी भिडणार आहे.
या स्पर्धेबाबत आयोजित पत्रकार परिषदेला महापौर रवी लांडगे, महापालिकेच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष कैलास कुटे, स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, क्रीडा उपायुक्त पंकज पाटील, ‘हॉकी महाराष्ट्र’चे अध्यक्ष कृष्ण प्रकाश, सरचिटणीस मनीष आनंद, ‘हॉकी इंडिया’चे सह उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोज भोरे, सह संयोजक विक्रम पिल्लई आदी उपस्थित होते.
स्पर्धेतील ३० संघांची तीन विभागांत विभागणी करण्यात आली आहे. २३ ऑगस्ट रोजी ‘अ’ विभागाच्या अंतिम सामन्याने स्पर्धेची सांगता होईल. वरच्या विभागात बढती (प्रमोशन) आणि खालच्या विभागात घसरण (रेलिगेशन) या नियमामुळे स्पर्धेची चुरस अधिक वाढणार आहे. ‘अ’ विभागात १२ संघांचा समावेश असून त्यांची चार गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. ‘अ’ गटामध्ये हॉकी झारखंड, हॉकी पंजाब आणि हॉकी चंदीगड यांचा समावेश आहे, तर ‘ब’ गटामध्ये हॉकी हरियाणा, हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशा आणि हॉकी बंगाल हे संघ आहेत. यजमान हॉकी महाराष्ट्र संघाला ‘क’ गटामध्ये हॉकी उत्तर प्रदेश आणि मणिपूर हॉकीसोबत स्थान देण्यात आले आहे. ‘ड’ गटामध्ये छत्तीसगड हॉकी, हॉकी मध्य प्रदेश आणि हॉकी हिमाचल यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील दोन अव्वल संघ २० ऑगस्टच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील आणि त्यानंतर २१ ऑगस्ट रोजी उपांत्य सामने खेळले जातील. तिसऱ्या स्थानासाठीचा सामना आणि अंतिम सामना २३ ऑगस्ट रोजी होईल.
अशी होणार स्पर्धा
- प्रत्येक गटातील सामने साखळी पद्धतीने होणार
- ‘अ’ विभागामधील तळाचे दोन संघ ‘ब’मध्ये (रेलिगेट) समाविष्ट जातील
- ‘ब’ विभागात १० संघांचा समावेश. अव्वल दोन संघांना ‘अ’ विभागामध्ये बढती, तळाचे दोन संघ ‘क’ विभागामध्ये खाली जातील
- ‘क’ विभागात आठ संघांचा अंतर्भाव. त्यामधूनही अशाच प्रकारे अव्वल दोन संघांना ‘ब’ विभागामध्ये बढती
- ‘अ’ विभागामधील ज्या सामन्यांत विजेता निश्चित करणे आवश्यक असेल, तिथे ‘एफआयएच’च्या स्पर्धा नियमांनुसार ‘शूटआउट’द्वारे निकाल
.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.