पिंपरी, ता. १६ ः महापालिका स्थायी समितीच्या १६ सदस्यांची शुक्रवारी (ता. २०) सर्वसाधारण सभेत निवड होणार आहे. सभागृहातील १२८ संख्येनुसार आठ नगरसेवकांमागे एक ‘स्थायी’ सदस्य असे समीकरण आहे. मात्र, शिवसेनेचे सहाच नगरसेवक आहेत. तरीही त्यांचा एक सदस्य ‘स्थायी’त असेल. त्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने तडजोड केली आहे. त्यामुळे स्थायी समितीत भाजप ११, राष्ट्रवादी चार आणि शिवसेना एक असे सदस्य असतील.
राज्य व केंद्र सरकारमध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना महायुती म्हणून मित्रपक्ष आहेत. मात्र, पिंपरी चिंचवड महापालिका तिघांनीही स्वतंत्रपणे लढवली. त्यात भाजपने बाजी मारून एकहाती सत्ता मिळवली. राष्ट्रवादी विरोधी पक्ष ठरला आहे. आता महापालिका तिजोरीच्या चाव्या अशी ओळख असलेल्या स्थायी समिती सदस्यपदासाठी चढाओढ सुरू आहे. तसेच, सभागृहातील संख्याबळानुसार पक्षनिहाय स्थायीचे १६ सदस्य ठरत असतात. तिन्ही पक्षांची सदस्य संख्या अर्थात ११, ४, १ असा फॉर्मुला ठरल्याची सद्यःस्थिती आहे. परंतु, भाजपने सदस्यपदासाठी अद्याप अर्ज मागविलेले नाहीत. राष्ट्रवादीकडे चार अर्ज आले आहेत. हाच निर्णय सदस्य निवडीच्या तारखेपर्यंत कायम राहिल्यास राष्ट्रवादीला एका जागेचा त्याग करावा लागणार, शिवसेनेला एका जागेची संधी मिळणार आणि भाजप अपक्षाच्या मदतीने अधिकची एक जागा मिळणार आहे.
शुक्रवारी निवड अपेक्षित
महापौर, उपमहापौर, पक्षनेते व विरोधी पक्षनेत्यांची निवड सहा फेब्रुवारीच्या महापालिका सर्वसाधारण सभेत झाली आहे. यात सभेत स्थायी समिती व अन्य विषय समित्यांचे सदस्य निवड करणे आवश्यक होते. मात्र, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहून २० फेब्रुवारीपर्यंत सभा तहकूब केली आहे. या सभेत स्थायी व विषय समिती सदस्यांची निवड होणे अपेक्षित आहे. विशेषतः स्थायी सदस्यपदासाठी अनेक जण प्रयत्नशील असून, त्यांच्यात रस्सीखेच आणि पक्षनेतृत्वाकडे मनधरणी सुरू आहे.
सभागृहातील वास्तव
- महापालिकेत १२८ पैकी भाजपचे ८४, राष्ट्रवादीचे ३७, शिवसेनेचे सहा व भाजप पुरस्कृत एक असे संख्याबळ आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार, स्थायी समिती सदस्य संख्या १६ असते. एकूण सदस्य संख्येला १६ ने भागल्यास सरासरी आठ सदस्यांमागे एक स्थायी सदस्य ठरतो.
- स्थायी समिती सदस्य कोट्याचा विचार केल्यास भाजपच्या वाट्याला १०.५०, राष्ट्रवादीला ४.६२ आणि शिवसेनेला ०.७५ सदस्य संख्या येते. एका अपक्षाने भाजपला साथ दिल्यास भाजपचा वाटा १०.६२ होतो. पूर्णांकानुसार भाजप ११, राष्ट्रवादी ५ व शिवसेना १ असे १७ संख्याबळ होते.
- स्थायीचे १६ सदस्य असल्याने भाजपचे ११ चे गणित पूर्ण केले आहे. राष्ट्रवादीने पाचऐवजी चार सदस्य देण्याचे ठरले आहे. त्यामुळे शिवसेनेला एक जागा मिळण्याचे गणित आहे
२०१७ ची स्थिती
- महापालिकेची २०१७ ची निवडणूक १२८ जागांसाठीच झाली होती. भाजपला ७७, राष्ट्रवादीला ३६, शिवसेनेला नऊ, अपक्षांना पाच आणि मनसेला एक जागा होती. स्थायीमध्ये भाजपचे ११, राष्ट्रवादीचे तीन, शिवसेना व अपक्षांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी होता. त्यावेळी अपक्षांनी भाजपला साथ दिली होती. आता भाजपचे संख्याबळ सातने आणि राष्ट्रवादीचे एकने वाढले असून, शिवसेनेचे तीनने घटले आहे.
‘स्थायी समिती सदस्यपदासाठी अर्ज मागविलेले नाहीत. त्यासाठी कोअर कमिटीची बैठक होईल. १७ फेब्रुवारीनंतर अर्ज मागविले जातील. आमचे ११ सदस्य स्थायीमध्ये असतील.’
- शत्रुघ्न काटे, नगरसेवक तथा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष, भाजप
‘स्थायी समिती सदस्यपदासाठी आम्ही अर्ज मागवले आहेत. त्यानुसार चार जणांचे अर्ज आले आहेत. आमचे चार सदस्य स्थायी समितीमध्ये असतील.’
- भाऊसाहेब भोईर, महापालिका गट नेता तथा विरोधी पक्षनेता, राष्ट्रवादी कॉंग्रेस
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.