पिंपरी, ता. १५ : शहरातील विविध भागांत सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याच्या कडेला तसेच निर्जन ठिकाणी गांजासारख्या अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचे प्रकार समोर येत आहेत. रस्त्यालगत बसून गांजा ओढणाऱ्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांकडून किरकोळ कारणांवरून वाद घालणे, शिवीगाळ आणि हाणामारीचे प्रकार घडत आहेत. एवढेच नव्हे, तर नशेचे व्यसन भागविण्यासाठी पैसे नसल्याने वाद होऊन मारहाणीपर्यंत प्रकरणे जात आहेत. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी नशा करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील शहरातील पिंपरी, चिंचवड, चिखली, तळवडे, निगडी, मोशी, दिघी, चऱ्होली, भोसरी, कासारवाडी, दापोडी, रहाटणी, पिंपळे गुरव, वाकड, थेरगाव, बावधन, रावेत, काळेवाडी, चाकण, देहूगाव आदी भागांतील रस्त्यांच्या कडेला, मोकळ्या जागांमध्ये, मैदानांच्या परिसरात तसेच अंधार असलेल्या ठिकाणी काही जणांचे समूह एकत्र बसलेले दिसतात. या ठिकाणी गांजाचे सेवन केले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जातात. या प्रकरणात संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी नशा सुरू असल्याने त्या परिसरातून ये-जा करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. दरम्यान, अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. २७ व २८ ऑक्टोबर या दोन दिवसांत २९ जणांवर गुन्हे दाखल केले. रस्त्यालगत तसेच नदीकाठ, स्मशानभूमी, उड्डाणपूल, मोकळी मैदाने आणि निर्जन ठिकाणांचा गांजाच्या सेवनासाठी वापर होत असल्याचे या कारवाईतून समोर आले.
चिखलीतील कुदळवाडी येथे नदीकाठी तर चिंचवडमधील नदी घाट, वाल्हेकरवाडी आणि बिजलीनगर पूल परिसरात, भोसरीतील मच्छी मार्केट आणि बैलगाडा घाट परिसरात, देहूरोड येथील श्रीकृष्णनगर, उद्यान परिसर आणि मोकळ्या मैदानांत तसेच सोमाटणे फाटा आणि तळेगाव दाभाडे, नाणेकरवाडी, महाळुंगे येथे, तसेच आळंदीतील स्मशानभूमी, गहुंजे आणि पिंपरीतील रिव्हर रोड परिसरातही कारवाई करण्यात आली.
नशेच्या पैशांसाठी वाद
व्यसनासाठी पैसे उपलब्ध न झाल्यास काही जणांकडून मित्रांकडे तसेच इतरांकडे पैशांची मागणी केली जाते. पैसे देण्यास नकार दिल्यास शिवीगाळ, धमकी आणि मारहाणीचे प्रकार घडतात. काही घटनांमध्ये नशेच्या पैशांवरून झालेल्या वादाचे रूपांतर गंभीर हाणामारीत होते.
गांजा पुरवणाऱ्यांवर कारवाई कधी?
गांजा ओढणाऱ्यांवर वेळोवेळी कारवाई केली जात आहे. म्हणजेच शहराच्या विविध भागांत गांजाची विक्री होत असल्याचे दिसून येते. दरम्यान, हा गांजा कुठून येतो, गांजाचा पुरवठा करणारे कोण आहेत, याचाही पोलिसांनी शोध घेऊन त्यांच्यावरही कारवाई करून गांजा पुरवठा करणाऱ्यांच्या मुळापर्यंत जाऊन हे रॅकेट उद्ध्वस्त करणे आवश्यक बनले आहे.
रस्त्यालगत तसेच सार्वजनिक ठिकाणी व्यसन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. या प्रकरणात विविध पोलिस ठाण्यांत गुन्हेही दाखल झाले आहेत. नशेच्या कारणावरून अनेकदा वादाच्या घटना घडतात. यातून गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता निर्माण होते.
- रोहिदास पवार, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.