जागतिक मानसिक आरोग्य दिन विशेष ः लोगो
--
ज्ञानेश्वर भंडारे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ९ ः एकीकडे परीक्षा, शैक्षणिक शुल्क आणि करिअरच्या चिंतेत असलेल्या विद्यार्थ्यांना दुसरीकडे चेष्टा, धमकी आणि सोशल मीडियावरील छळालाही सामोरे जावे लागते. मात्र, आपली अडचण कोणाकडे मांडायची? तक्रारीनंतर काय होणार? अशा प्रश्नांमुळे विद्यार्थी व्यक्त होण्यास संकोच करू शकतात. त्यांना विश्वासाने बोलता येईल, असे वातावरण निर्माण करण्याची गरज समुपदेशकांनी व्यक्त केली आहे.
जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, रॅगिंगविरोधी यंत्रणा आणि पालक-शिक्षकांमधील संवाद महत्त्वाचे ठरत आहेत. कारण, सोशल मीडियावरील अपमानास्पद संदेश, वारंवार चेष्टा आणि धमक्यांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. अशा प्रकारांबाबत विद्यार्थ्यांनी संदेश, स्क्रीनशॉट आणि तारखा जतन करून पालक, विश्वासू शिक्षक किंवा रॅगिंगविरोधी समितीकडे तक्रार मांडायला हवी. अशा तक्रारींसाठी महाविद्यालयांमध्ये तक्रार पेट्यांची व्यवस्था असते. त्याआधारे प्रत्यक्ष भेट, गोपनीय ई-मेल, ऑनलाइन तक्रार आणि समुपदेशकांशी संवादाचे पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध असावेत. तक्रार कोणाकडे करायची आणि पुढील प्रक्रिया काय आहे? याची माहिती मिळायला हवी. पालकांनीही विचारपूस करावी. विद्यार्थ्यांचे ऐकून घ्यावे. तक्रारीनंतरच्या कार्यवाहीनंतर छळ थांबला का, याचा पाठपुरावा आवश्यक आहे.
---
कोणताही प्रसंग चुकीचा किंवा त्रासदायक वाटल्यास विद्यार्थ्यांनी पालक आणि शिक्षकांची मदत घ्यावी. आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनही रॅगिंग होते. पालकांनी मुलांचे चॅटिंग आणि सोशल मीडियावरील संवादाकडेही लक्ष द्यावे. शैक्षणिक संस्था आणि पालकांची भूमिका महत्त्वाची आहे.
- डॉ. मनजित संत्रे, मानसोपचार तज्ज्ञ, वायसीएम रुग्णालय
परीक्षा, शुल्क, प्लेसमेंट, कौटुंबिक अपेक्षा आणि वसतिगृहातील जुळवून घेण्याच्या अडचणी विद्यार्थ्यांसमोर येऊ शकतात. अशा वेळी अडचण सांगणे आणि मदत मागणे हे कमकुवतपणाचे लक्षण मानू नये. तर आपल्या आईवडिलांना तसेच शिक्षकांनाही याबाबत कल्पना द्यावी.
- डॉ. धनंजय अष्टुरकर, मानसोपचार तज्ज्ञ
काही विद्यार्थ्यांचा वर्गातील सहभाग आणि शिक्षकांशी संवाद कमी झाला आहे. संयमाने ऐकून घेण्याची तयारी कमी असल्यास समजावून सांगताना अडचणी येतात. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपलेसे करून विश्वासात घेऊन सूचना कराव्यात. सकारात्मकतेमुळे विद्यार्थी स्वतःहून अडचणी सांगतात.
- डॉ. पंडित शेळके, प्राचार्य, मामासाहेब मोहोळ महाविद्यालय
दामिनी पथकाकांडून विविध शाळा-महाविद्यालयांना वेळोवेळी भेटी दिल्या जातात. महिला पोलिस अंमलदारांकडून शाळेतील मुलींच्या तक्रारी, अडचणी जाणून घेतल्या जातात. ‘एक दिवस शाळेसाठी’ उपक्रमातून शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.
- सुदर्शन राठोड, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा
मदतीसाठी हेल्पलाइन ः ११२, १०९१
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.