पिंपरी, ता. ८ : ‘‘बोगस उपसूचनांद्वारे तरतूद वाढ व घट करून ठेकेदारांना ५२ कोटींपेक्षा अधिक बिलांची रक्कम दिली. याला स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेची मान्यता नाही. या अपहाराला महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन जबाबदार आहेत,’’ असा आरोप स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी बुधवारी केला. दरम्यान, ‘‘सर्व कामांमध्ये पारदर्शकता आहे. आरोपांची चौकशी आयुक्त करतील’’, अशा शब्दांत जैन यांनी आरोपांचे खंडण केले. त्यामुळे अपहार खरंच झाला, की कथित आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आर्थिक वर्ष २०२५-२६ ची महापालिकेची स्थायी समितीची शेवटची सभा ३० मार्च रोजी झाली. त्यातील उपसूचना नगरसचिव विभागाला दिल्या. मात्र, विविध विभागांशी संबंधित कामांसाठी तरतूद वाढ व घट दर्शविणाऱ्या बोगस २० उपसूचना आढळल्या. त्यांवर नगरसदस्यांच्या स्वाक्षऱ्याही आहेत. मात्र, त्या खरोखरच नगरसेवकांच्या आहेत, की बनावट याची चौकशी करायची आहे? मात्र, ‘‘संबंधित उपसूचनांद्वारे ५२ कोटींच्या बिलांची रक्कम ठेकेदारांना देऊन अपहार झाला आहे,’’ असा आरोप स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी केला. ते म्हणाले, ‘‘आमच्या भागातील कामांच्या उपसूचना होत्या. त्यावर स्वाक्षरी करण्यास ठेकेदारांनी सांगितले म्हणून स्वाक्षऱ्या केल्याचे नगरसदस्यांनी सांगितले. यात पाणीपुरवठा, स्थापत्य, बीआरटी आदी विभागांसह नाशिक फाटा, मोशी रस्ते, तळवडे, भोसरी परिसरातील कामांच्या रकमेचा समावेश आहे. याबाबत आम्हाला माहिती नसल्याचे संबंधित विभागप्रमुखांनी सांगितले. त्यामुळे या प्रकारास मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन जबाबदार असून त्यांनी लोकप्रतिनिधींची दिशाभूल केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आयुक्तांकडे करणार आहे.’’
काही प्रश्न अनुत्तरीत
- स्वाक्षऱ्या करताना नगरसेवकांच्या लक्षात आले नाही का?
- चौकशीत अपहार सिद्ध झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल होणार का?
- नेमके आर्थिक ‘हित’ कोणाचे साधले?
आरोपाचा हेतू समजला नाही ः जैन
‘‘सर्व उपसूचना विहित नमुन्यात होत्या. त्यांवरील स्वाक्षऱ्या संबंधित सदस्यांच्याच असल्याची खात्री केली. काही उपसूचना नगरसचिव कार्यालयाऐवजी थेट लेखा विभागाकडे येतात. त्याबाबतची आमच्याकडे आलेली पत्रे संबंधित विभागांना पाठवली जातात. आर्थिक वर्ष संपत आल्याने संबंधित कामांसाठी तरतूद बाद होऊ शकते, त्याचाही विचार केला. मी कामात पारदर्शकता ठेवतो. महापालिका आयुक्तांचे सर्व कामांवर बारकाईने लक्ष असते. त्यांनी चौकशी केल्यानंतर सत्य कळेल. स्थायी समिती सभापतींचा आरोप करण्यामागील हेतू समजू शकला नाही,’’ असे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.