शिरगाव, ता. ७ : मावळ तालुक्यातील अंशतः अनुदानित शाळा ८ आणि ९ जुलै रोजी बंद राहणार, असे निवेदन मावळ तालुका गटशिक्षणाधिकारी यांना मावळ तालुका समन्वयक संघातर्फे देण्यात आले आहे.
या सर्व शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याचा शासन निर्णय १४ ऑक्टोबर २०२४ रोजी शासनाने केला. परंतु अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. अधिवेशनातही यासाठी निधीची तरतूद केली नसल्याने राज्यातील शाळा बंद करून आंदोलन पुकारले आहे. आंदोलनाला पाठिंबा म्हणून तालुक्यातील अंशतः अनुदानित शाळा बंद राहणार आहेत. या याबाबतचे निवेदन गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांना नुकतेच देण्यात आले.
अंशतः अनुदानित शाळांच्या शिक्षकांनी मुंबईतील आझाद मैदानावर पाच जूनपासून आंदोलन सुरू केले आहे. पावसाळी अधिवेशनात निधीसाठी तरतूद केली जाईल, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले. मात्र, अद्याप कोणतीही ठोस तरतूद न झाल्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी आहे.
दरम्यान, निवेदन देताना संघटनेचे समन्वयक रमेश फरताडे, स्वप्नील नागणे, नारायण पवार, संजय ओव्हाळ, अनुराधा देशमुख, सुनिता वंजारी, जनार्दन बोरोले, ज्ञानेश्वर अर्नाळे, अंबादास गर्जे, गणेश दातीर, पोपट पारसे, श्रीहरी पावशेरे, हनुमान सुरनर, राधेश्याम वारे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.