संदीप सोनार ः सकाळ वृत्तसेवा
काळेवाडी, ता.१ : मध्य रेल्वेच्या पुणे जंक्शन रेल्वे स्थानक अंतर्गत असणारे चिंचवड, पिंपरी रेल्वे स्थानकांच्या वाहन तळावर ठेकेदाराच्या नावासह त्याचा संपर्क क्रमांक, नियम आणि कोणत्याही दरपत्रकाचा फलक न लावता संबंधित रेल्वे स्थानकावरील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने प्रवाशांची अव्वाच्यासव्वा पैसे घेऊन लूट करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने अशा ठेकेदारांना कायमचे काळ्या यादीत टाकून लूट थांबवावी, अशी मागणी रेल्वे प्रवाशांनी केली आहे.
पुण्या- मुंबईला जाण्यासाठी काळेवाडी, रहाटणी, थेरगावमधील नागरिकांना पिंपरी हे महत्वाचे आणि जवळचे रेल्वेस्थानक आहे. त्यातील काही रेल्वे गाड्या पिंपरी तर काही चिंचवड स्थानकावर थांबत असतात. त्यामुळे काळेवाडी, पिंपरी भागांमधून असंख्य प्रवासी, नोकरदार वर्ग कामधंद्यानिमित्त पुणे, मुंबईकडे रेल्वेने नियमित प्रवास करत असतात. मध्य रेल्वे विभागाकडून प्रत्येक रेल्वे स्थानकाला वाहनतळाची सुविधा देण्यात आली आहे. तेथे रेल्वे विभागाकडून ठेकेदाराच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. या वाहनतळावर प्रवासी आपल्या दुचाकी, चारचाकी व इतर वाहने उभी करून रेल्वेने नोकरी व व्यवसायासाठी जात असतात. त्यातील प्रवासी काही तासांसाठी; तर काही प्रवासी बाहेरगावी गेल्यानंतर काही दिवसांसाठी वाहने लावून जात असतात. संबंधित ठेकेदाराकडून स्वतःच्या माहितीसह दरपत्रकाचा फलक वाहनतळाच्या दर्शनी भागात लावणे गरजेचे आहे. मात्र, प्रत्यक्षात ते न लावता किंवा फलक नसल्याचे कारण देत प्रवाशांकडून जादा पैसे उकळले जात आहेत.
कशी होतेय लूट ?
चारचाकी वाहनासाठी त्यात मोटार व इतर वाहनांसाठी एक तासासाठी २० रुपये दर असताना येथील कर्मचारी ३० रुपये, चाळीस रुपये व काही वेळेस ६० रुपये पण तासासाठी घेत आहे. तसेच दुचाकीसाठी जसा प्रवासी तसे तासाला ५ रुपये असताना १० रुपये, २० रुपये व ३० रुपये घेताना दिसून येत आहेत. या लुटीमध्ये रेल्वे स्थानकावरील काही कर्मचारी देखील सहभागी असल्याचा आरोप प्रवासी करत आहेत. यासंदर्भात पिंपरी आणि चिंचवड स्थानकावरील वाहनतळांच्या ठेकेदारांशी प्रस्तुत प्रतिनिधीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तेथील कर्मचाऱ्यांनी संपर्क क्रमांक आणि नाव सांगण्यास नकार दिला.
गोष्ट वाढवण्याची गरज नाही...
पुढील प्रवासासाठी व आपले वाहने सुरक्षित राहण्याचा विचार करून प्रवासी आपली लूट होत असल्याचे समजून ही अधिक वेळ न दवडता किंवा वाद न घालता पैसे देत असतात. त्याचाच गैरफायदा संबंधित ठेकेदार व त्यांचे कर्मचारी घेत आहेत. या संदर्भात चिंचवड रेल्वेच्या मुख्य स्टेशन मास्तर शोभा वर्मा यांना माहिती विचारली असता ‘आम्हाला या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती नाही. तसे असेल तर बघून सांगते. गोष्ट वाढवण्याची गरज नाही’, अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
मी नेहमी चिंचवड रेल्वे स्थानकावरील वाहनतळावर माझी मोटार उभी करत असतो. मात्र तासाला २० रुपये दर असताना ३० रुपये घेतले जाते. पावती ही मशीनद्वारे दिली जाते. परंतु त्यावर कोणत्याही प्रकारचे दर व नियम नसतात. त्यामुळे नागरिकांना खरे दर कळत नाहीत.
- पंकज कुलकर्णी, प्रवासी वाहनचालक
रेल्वे स्थानकावरील वाहन तळावर नागरिकांना दिसेल असा ठळक अक्षरातील सूचना फलक स्वतःचे नाव, संपर्क क्रमांकासह लावणे हे संबंधित ठेकेदार यांचे काम आहे. परंतु ठेकेदार असे फलक न लावता नागरिकांची फसवणूक करत आहे.
- संजय गायखे, सामाजिक कार्यकर्ते, काळेवाडी
वाहन तळावर दरपत्रक लावणे बंधनकारक आहे. त्यानुसारच प्रवाशांकडून वाहनतळाचे पैसे घेतले पाहिजे. अतिरिक्त पैसे घेतले जात असतील; तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- हेमंतकुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.