काळेवाडी, ता. ४ : काळेवाडी फाटा येथील महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलाखालील धर्मवीर संभाजी चौकाला अस्वच्छतेचे ग्रहण लागल्याचे दिसून येत असून परिसराला नियमित स्वच्छतेची गरज असल्याचे दिसून येत आहे. याविषयी नागरिकांनी तक्रार केली आहे. याशिवाय, उड्डाणपुलाखाली मद्यपी, जुगारी व भिकारी यांचा वावर आहे.
काळेवाडी फाटा येथील धर्मवीर संभाजी चौक हा अतिशय रहदारीचा चौक मानला जातो. या ठिकाणी चार दिशेला महत्त्वाचे रस्ते विविध भागांना जोडतात. एका बाजूने पुण्याकडे जाणारी रहदारी; तर दुसऱ्या बाजूला डांगे चौकाकडे रावेत मार्गे मुंबई दिशेला जाणारी रहदारी मोठ्या प्रमाणात आहे. दुसऱ्या बाजूला हिंजवडी आयटी पार्ककडे कस्पटे वस्ती मार्ग तसेच विरुद्ध बाजूला काळेवाडी मार्गे चिखली व मोशी दिशेला जाणारी रहदारीचे प्रमाण मोठे असून चोवीस तास चौकात वर्दळ असल्याचे दिसून येते.
या रस्त्यावर कस्पटे वस्तीकडून चौकाकडे येताना व पुण्याच्या दिशेने येऊन डांगे चौकाकडे जाताना महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी पुलाखाली तसेच धर्मवीर संभाजी चौकाच्या डाव्या बाजूला अस्वच्छतेचे व कचरा असल्याचे नजरेस दिसून येतो. या ठिकाणी महापालिकेकडून नेमण्यात आलेल्या दोन स्वयंसेवी संस्थांकडे स्वच्छतेचा कारभार व कर्मचारी नेमून दिल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात येते. परंतु नियमित स्वच्छता होत नसल्याचे व कचरा व दुर्गंधी होत असल्याचे या ठिकाणी नागरिकांनी तक्रार केली आहे. धर्मवीर संभाजी चौकातील डाव्या बाजूला विविध व्यावसायिक अस्वच्छता करत असल्याचे व त्या ठिकाणी दुर्गंधी पसरवत आहे.
मोकळ्या श्वासासाठी प्रतीक्षा
एका बाजूला बीआरटीचा प्रशस्त रस्ता; तर दुसऱ्या बाजूने मात्र दुभाजकाचा अरुंद रस्ता. त्यामुळे वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडत असून वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे कस्पटे वस्तीकडून काळेवाडी फाट्याकडे येताना डाव्या बाजूला असणाऱ्या पदपथाची दुरवस्था झाली असून रस्त्याच्या बाजूला झाडाझुडपांची मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन व त्याखाली कचरा साचून अस्वच्छता होत असल्याचे दिसून येत आहे. उड्डाणपुलाखालच्या स्वच्छतागृहाजवळील जुनी वाहने व कचरा यांचीही साफसफाई व विल्हेवाट लावून रस्ता मोकळा करण्यात यावा, जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही. नागरिकांना सुविधा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
समस्यांची कारणे
- कस्पटे वस्तीकडून येणारा रस्ता अरुंद
- अतिक्रमण कारवाईत पाडलेल्या दुकानांचा राडारोडा पडून
- पदपथांच्या दुरवस्थेमुळे स्वच्छतेकडे दुर्लक्ष
- नियमित कीटकनाशके फवारणी, स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज
- झाडे झुडपांची अस्ताव्यस्त वाढ, त्यांची छाटणी करण्याची आवश्यकता
- उड्डाणपुलाखाली मद्यपी, जुगारी व भिकारी यांचा वावर
दोन स्वयंसेवी संस्थांना ठेकेदारी पद्धतीने स्वच्छतेचे काम दिले आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून येथे स्वच्छता राखण्याची जबाबदारी दिली आहे. महापालिका प्रशासनाकडून त्यांच्यावर देखरेख केली जाते. सकाळी सात वाजता केलेली साफसफाई दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच परिस्थिती होते. त्यामुळे त्या संदर्भात सूचना देण्यात येतील.
- खंडेराव बैलकवाड, आरोग्य निरीक्षक, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय
या ठिकाणी एका बाजूला मोठा व्यावसायिक मॉल असून डाव्या बाजूला छोटे व्यवसाय, बियर शॉपी व इतर अनेक व्यवसाय असल्याने चौकाच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असते. महापालिका प्रशासनाने या व्यावसायिकांना स्वच्छतेचे धडे देण्याची गरज असून परिसर स्वच्छ ठेवावा.
- मोहिनी जोशी, गृहिणी
SVW25A00186, SVW25A00188
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.