आमची सोसायटी आमचा उपक्रम
एक्झबिया रिवर फ्रंट, बेबड ओहोळ
विजय सुराणा ः सकाळ वृत्तसेवा
तळेगाव दाभाडे, ता. २४ ः सामाजिक, धार्मिक, अध्यात्मिक, शासकीय कार्यक्रमामुळे तसेच एकमेकांना मदतीचा हात देत गुण्यागोविंदाने नांदत असलेल्या बेबड ओहोळ येथील एक्झबिया रिवर फ्रंट सोसायटीने आपला ठसा उमटवला आहे. सोसायटीच्या आवारातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पही पूर्ण क्षमतेने चालू आहे.
मावळ तालुक्यातील निसर्गरम्य परिसरातील बेबड ओहोळ येथे एक्झर्बिया रिवर फ्रंट हाऊसिंग सोसायटी असून ती गावातील पवना नदीकाठी असलेल्या १० एकर जागेत वसली आहे. या सोसायटीच्या एकूण ७४० सदनिकांमधून जवळपास ४ हजार रहिवासी सुखी व समाधानी जीवन जगत आहेत. सर्व जाती - धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत.
सामाजिक उपक्रम
सोसायटीकडून वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिरे घेतली जातात. करोना काळात लोकांना किराणा, भाजीपाला, दूध, औषधे, तातडीची वैद्यकीय तपासणी या सर्व गोष्टी सदस्यांनी जागेवर उपलब्ध करुन दिल्या. या व्यतिरिक्त रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करुन औषधांची व्यवस्था, प्लाझ्मा डोनर्स मिळविणे, करोनाग्रस्तांना जेवणाचे डबे पोचविणे इत्यादी बहुमोल मदत संकुल वासियांनी एकमेकांना केली. कोरोनाग्रस्त कुटुंबियांना आधार दिला. त्याने संकुलातील रहिवासी लोकांचे संबंध दृढ झाले.
एकमेकांचे सहकार्य
सोसायटीचे अध्यक्ष अनिल घारे, सचिव सोनिया कोळंबकर, इतर पदाधिकारी वसीम काझमी, सुभाष गायकर, प्रमोद गायकवाड, मीना थोरबोले, स्नेहल काटकर, स्वानंद पंडित, यती घरात, नीलेश पवार यांच्या नेतृत्वाखाली वार्षिक सण उत्सव, समारंभ तसेच शासकीय उपक्रम राबविण्यात येतात. नमिता प्रसाद , प्रशांत सिंग, सागर कदम, हेमंत घारे, आरती यादव, गोपीनाथ पुरी, रूपाली दाते, सुस्मिता डे, अनिता सिंग, योगेश्वर सिंग, मंगेश मराठे, सुदेशना सरकार, गणेश पाटील, राहुल गौतम, रवी घारे, मोनाली पुरी आदींचे सहकार्य लाभते. सोसायटीचे व्यवस्थापक नयन वाघमारे आणि सुरक्षा प्रमुख अशोक वाडेकर हे दोघेही सोसायटी सदस्यांच्या अडचणीत रात्रंदिवस धावून जात मदत करत असतात.
सण-उत्सवाचा उत्साह
सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक (फौजी) यांच्या मार्गदर्शनाखाली २६ जानेवारी, १५ ऑगस्ट या दिवशी झेंडा वंदन, रक्तदान शिबिर तसेच आरोग्य तपासणी हे कार्यक्रम भरविले जातात. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमात ‘जय शिवाजी, जय भवानी’ चा नारा आसमंतात दुमदुमतो. एकमेकांमधील कटुता दूर करणारी होळी व धुलवड मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. मराठी नवीन वर्षाची गुढी सर्वांच्या घरोघरी उभी केली जाते. जागतिक पर्यावरण दिन, जागतिक महिला दिन उत्साहात साजरा केला जातो. तसेच १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंती व त्यानंतर बुद्धपौर्णिमा उत्साहात साजरी केली जाते. आषाढी एकादशीला टाळ व मृदुंगाच्या गजरात विठूरायाची पालखी काढून सामुहिक फराळ केला जातो. भाद्रपदातील गणेशोत्सव सात दिवसांपर्यंत साजरा करताना विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. त्यामध्ये महिला वर्ग व बालचमू हिरीरीने भाग घेतात. त्याचप्रमाणे ३ दिवसांच्या माघी गणेशोत्सवाची सुरवात गणेश यागाने तर सांगता भंडऱ्याने होते. त्यानंतर, महिला वर्गाच्या पुढाकारामधून नवरात्री, दांडिया तसेच कोजगरी पौर्णिमा भक्तीभावाने साजरी केली जाते. दसरा व दीपावलीला सर्व रहिवासी एकमेकांना शुभेच्छा देतात. तसेच कार्तिकी पौर्णिमेला पणत्या लावून आसमंत उजळून काढला जातो.
शासकीय उपक्रमांतही पुढाकार
सोसायटीमध्ये राज्य शासनातर्फे राबविण्यात येणारे उपक्रम म्हणजेच मतदार याद्या अद्ययावत करणे, घरोघरी जाऊन स्वच्छ सर्वेक्षण, पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांची माहिती भरून घेणे इत्यादी कार्यक्रम आयोजले जातात. सोसायटीच्याआवारात लहान मुलांसाठी विविध खेळणी उपलब्ध आहेत. तसेच सोसायटीमध्ये जिम, क्लब हाऊस, उद्यान, जलतरण तलाव इत्यादी उपलब्ध आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध आहे.
आमच्या सोसायटीत रक्तदान व आरोग्य शिबिर, वृक्षारोपणासर विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविणे तसेच सर्व सण उत्सव साजरे करणे हे सांस्कृतिक समितीचे काम आहे. देशाच्या संस्कृतीची ओळख मुलांना तसेच सर्व नागरिकांना करून देण्याची मोठी जबाबदारी आमच्यावर आहे. सोसायटीच्या आवारात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू आहे. सोसायटीत सर्व सुविधा उपलब्ध असून सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत.
- अनिल घारे, अध्यक्ष, एक्झर्बिया रिवर फ्रंट हाऊसिंग सोसायटी, बेबड ओहोळ
आमच्या सोसायटीमध्ये एकूण दहा इमारती आहेत. त्यामध्ये विविध कार्यक्रमांसह, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात. सर्व जाती धर्माची कुटुंबे एकोप्याने राहतात. त्यामुळे ही सोसायटी नसून एक परिवारच बनला आहे.
- सोनिया कोळंबकर, सचिव, एक्झर्बिया रिवर फ्रंट, हाऊसिंग सोसायटी, बेबड ओहोळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.