तळेगाव दाभाडे, ता. ३१ : इनरव्हील क्लब ऑफ मावळ शक्ती यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राजेवाडी (दिवड) येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व विविध उपयुक्त वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे, तक्ते, पुस्तके, दोरीउडी, घुंगरू काठी यांचे वितरण करण्यात आले. तसेच शाळेसाठी सिंटेक्स टाकी, पाण्याची लाईन, पंप, पाईप बंडल आणि कंपाउंड वॉल पेंटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
याप्रसंगी क्लबच्या अध्यक्षा माधवी पुरोहित, ज्योती राजीवडे, सरपंच गणेश राजीवडे आदी उपस्थित होते. पाहुण्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी शाळेच्या विकासासाठी भविष्यातही सहकार्य सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. सूत्रसंचालन गणेश दिवर यांनी केले, तर आभार प्रदर्शन महेंद्र राजीवडे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना फळे व अल्पोपाहार देऊन सांगता करण्यात आली.