वडगाव मावळ, ता. १६ : लेझीम पथकासह प्रभात फेरी, कचरा वर्गीकरणाबाबत पथनाट्य, तिरंगा प्रदर्शन यात्रा, निबंध लेखन, वकृत्व आणि रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वाटप, रक्तदान शिबिर आदी विविध कार्यक्रमांनी मावळ तालुक्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कासारसाई धरणावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.
वडगाव मावळ ः न्यू इंग्लिश स्कूल व जिल्हा परिषद शाळेतील सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी लेझीम पथकासह प्रभात फेरी काढली. घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मावळचे प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. तहसीलदार विक्रम देशमुख, आमदार सुनील शेळके, नायब तहसीलदार गणेश तळेकर, अविनाश पिसाळ आदींसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. पोलिसांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. पंचायत समितीच्या प्रांगणात गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांनी ध्वजवंदन केले. सहाय्यक गट विकास अधिकारी सेवक थोरात यांच्यासह माजी पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
वडगाव न्यायालयाच्या प्रांगणात अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश ए. के. अनभुले यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. सहन्यायाधीश, बार असोसिएशनचे पदाधिकारी व वकील वर्ग उपस्थित होता.
वडगाव नगरपंचायतीच्या प्रांगणात मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली. माजी नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी माजी जवानांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थिनींनी कचरा वर्गीकरणाबाबत पथनाट्य सादर केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा-हर घर स्वच्छता’ अंतर्गत शहरातून तिरंगा प्रदर्शन यात्रा काढण्यात आली. श्रीमंत महादजी शिंदे उद्यानात वीर जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. शहरात एलईडी व्हॅनद्वारे राष्ट्रध्वज निर्मितीबाबत विविध ठिकाणी लघु चित्रपट दाखविण्यात आला. तसेच सर्व प्रभागांमध्ये तिरंगा दुचाकी फेरी काढण्यात आली. वडगाव पोलिस ठाण्याच्या प्रांगणात पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी ध्वजवंदन केले.
शहर विकास समिती येथे सुनील चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. डी. एड. महाविद्यालयात संस्थेचे सचिव अशोक बाफना यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष तुकाराम असवले आदींसह संचालक मंडळ, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते सादर केली. भाजप कार्यालयाच्या प्रांगणात मंडल अध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वडगाव येथे विविध कार्यकारी सोसायटीच्या आवारात अध्यक्ष नारायण ढोरे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात प्राचार्य सतीश हाके यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. लायन्स क्लबचे ध्वजवंदन अध्यक्ष प्रशांत गुजराणी यांच्या हस्ते झाले.
रमेशकुमार सहानी स्कूल
रमेशकुमार सहानी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात उद्योजक रोहित सहानी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. संस्थेचे संस्थापक राजेंद्र म्हाळसकर, उपाध्यक्ष सचिन ढोरे, सचिव राजेंद्र वहिले, मुख्याध्यापिका मीना अय्यर आदींसह संचालक मंडळ, शिक्षक व पालकवर्ग उपस्थित होता. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकार सादर केले. गोपाळराव देशपांडे वनवासी विद्यार्थी वसतिगृहाच्या प्रांगणात ॲड. मिहीर प्रभुदेसाई यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. कार्यक्रमास ज्योतिकुमार कुलकर्णी आदींसह विश्वस्त मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
नारी शक्ती सन्मान पुरस्कार
तळेगाव स्टेशन : प्राथमिक आरोग्य केंद्रात रोटरी क्लब ऑफ गोल्डनचे अध्यक्ष संतोष परदेशी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. क्लबचे जिल्हा संचालक ऋषिकेश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी उद्योजिका पुष्पलता जैन यांना नारी शक्ती सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. आशा सेविकांसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. दीपक फल्ले, किरण ओसवाल, अनिता भेगडे, डॉ. शेखर चौधरी, डॉ.सौरभ मेहता आणि मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. प्रदीप टेकवडे यांनी सूत्रसंचालन तर प्रशांत ताये यांनी आभार मानले.
देहूत बक्षीस वाटप
देहू : देहू नगरपंचायत कार्यालयासमोर नगराध्यक्षा पूजा दिवटे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. नगरपंचायतच्यावतीने आयोजित निबंध लेखन, वकृत्व आणि रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. यावेळी नगरपंचायतचे मुख्याधिकारी चेतन कोंडे, कार्यालयीन अधीक्षक प्रिया कदम आदी उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेच्या संत तुकाराम विद्यालयात ज्येष्ठ नागरिक नारायण मोरे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी माजी सरपंच, कांतीलाल काळोखे, शाळेतील शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्र
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा पद्मने व इतर उपस्थित होते.
जगदगुरु इंग्लिश मीडियम स्कूल
साकोरे शिक्षण संस्था, जगदगुरु इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे सुनील हगवणे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष साकोरे, दीपाली साकोरे, मुख्याध्यापिका मीनाक्षी गाडेकर सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
लोणारी समाजातर्फे रक्तदान
देहूतील लोणारी समाज सेवा संघाच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात १२५ जणांनी रक्तदान केले. अभिनेत्री तेजस्विनी लोणारी, समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुदर्शन घेरडे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी बाळकृष्ण लोणारी, सुगंधा करांडे व इतर उपस्थित होते. अमोल कारंडे, वसंत खांडेकर, संदीप करचे, भगवंत आवटे यांनी नियोजन केले.
सॅमसन मेमोरिअल हायस्कूल
सॅमसन मेमोरियल रिपब्लिक शाळेत सुनंदा आवळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते आणि कवायती सादर केल्या. शाळेच्या संस्थापिका मोली सॅमसन उपस्थित होत्या. शिक्षिका प्रिया नायर, सपना शिंदे, पूजा शॉ यांचा आदर्श शिक्षिका म्हणून मुख्याध्यापिका संयुक्ता आरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रियंका ब्राह्मणे यांनी आभार मानले.
इंदोरीत पावसात स्वातंत्र्यदिन
इंदोरी ः प्रगती विद्यालयात ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील शेवकर व रेश्मा शिंदे यांचे हस्ते तर सरस्वती विद्यामंदिरामध्ये ग्रामपंचायत सदस्य संदीप ढोरे व जयश्री सावंत यांचे हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ग्रामपंचायत सदस्य मधुकर शिंदे व लतिका शेवकर यांचे हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानसरे वस्ती येथे ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण पानसरे व राजश्री राऊत यांचे हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंडमळा येथे ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रेय ढोरे व धनश्री काशीद यांचे हस्ते राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. पशु संवर्धन दवाखाना येथे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब वाघमोडे व डॉ. हर्षवर्धन पैठणे यांचे हस्ते पूजन व ध्वजवंदन करण्यात आले.
ग्रामपंचायत चावडी चौक
ग्रामपंचायत चावडी चौकात सरपंच शशिकांत शिंदे व उपसरपंच बेबी बैकर यांचे हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने गुणवंत विद्यार्थी तसेच कुंडमळा येथे पूल दुर्घटनाप्रसंगी पर्यटकांचे प्राण वाचविणाऱ्या १६ युवकांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे सहाय्यक राज्य परिवहन अधिकारीपदी निवड झालेल्या सोनल शिंदे-खांदवे, अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त योजनादूत अक्षदा सावंत आणि निवृत्त पोलिस पाटील जयवंत शिंदे यांचा विशेष सत्कार केला. ग्रामपंचायत अधिकारी अरुण हुलगे, तलाठी सचिन जाधव, दाऊद तांबोळी, विजय हिंगे व भरत भिसे यांनी नियोजन केले. विठ्ठल शिंदे, प्रशांत ढोरे, मनोहर भेगडे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
सोमाटणेत प्रभात फेरी
सोमाटणे ः घोरावडेश्वर डोंगरावर पुरातत्व विभाग व देवस्थानच्या वतीने साधूसंतांच्या उपस्थित पुजारी अमरनाथबाबा यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. सोमाटणे येथील तुळजाभवानी विद्यालय, दारुंब्रे येथील पंचक्रोशी विद्यालय, साळुंब्रे येथील ग्रामप्रबोधिनी विद्यालय, चांदखेड येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालय, आढले येथील कर्मवीर विद्यालय, शिवली येथील छत्रपती शिवाजी विद्यालय, दिवड येथील ज्ञानेश्वर विद्यालयात ध्वजवंदन करण्यात आले.
तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमाटणे, चौराईनगर, गणेशनगर, शिरगाव, गोडुंब्रे, दारुंब्रे, गहुंजे, साळुंब्रे, सांगवडे, चांदखेड, आढले, कुसगाव, पाचाणे येथील प्राथमिक शाळेत सरपंच, उपसरपंच यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. ध्वजवंदनानंतर विद्यार्थ्यांची गावातून ढोल, ताशा लेझीमच्या गजरात तर काही विद्यार्थ्यांची क्रांतिकारकांच्या गणवेशात प्रभात फेरी काढण्यात आली. त्याचप्रमाणे, ग्रामपंचायत सोमाटणे, शिरगाव, गोडुंब्रे, दारुंब्रे, गहुंजे, साळुंब्रे, सांगवडे, चांदखेड, आढले, कुसगाव, पाचाणे, दिवड आदी ठिकाणी सरपंच, ग्रामसेवक यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र
आढले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. दिलीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात आरोग्य कर्मचाऱ्यांच्यावतीने स्वातंत्रदिन साजरा करण्यात आला. कासारसाई धरणावर पाटबंधारे विभागाच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. कार्यालयात कर्मचाऱ्यांच्यावतीने ध्वजवंदन करण्यात आले. आढले येथे सरपंच सुवर्णा घोटकुले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. तसेच गोधाम आढले येथे गोसेवकांच्या उपस्थितीत नितीन घोटकुले यांनी ध्वजवंदन केले.
व्यसनमुक्तीचा निर्धार
टाकवे बुद्रुक : नाणे व आंदर मावळ भागात बालवाडीचे चिमुकले असो किंवा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी सर्व रंगीबेरंगी कपडे, गणवेश परिधान करून आले. धुके, तुरळक पाऊस वातावरणात प्रभातफेरी काढण्यात आली. ध्वजवंदन समारंभ पार पडला. कार्यक्रमात तंबाखू आणि व्यसनमुक्तीविषयी शिक्षकांनी माहिती दिली. व्यसनमुक्तीचा अनेकांनी निर्धारही केला.
सांगुर्डी येथे उत्साह
इंदोरी ः सांगुर्डी ग्रामपंचायत कार्यालयात अंगणवाडी पर्यवेक्षिका शर्मिला पाटील, ग्रामपंचायत अधिकारी एल.सी.चव्हाण आणि सेवानिवृत्त अंगणवाडी शिक्षिका अलका चव्हाण यांनी ध्वजवंदन केले. तसेच गावठाण
जि.प. प्राथमिक शाळेत वंचित एकल महिला बायडाबाई चव्हाण, विठ्ठलनगर जि.प.प्राथमिक शाळेत
शेतमजूर महिला ताराबाई साळुंके यांचे हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी सरपंच वसंत भसे,उपसरपंच योगिता भसे, सदस्य वसंत दवणे, संदीप चव्हाण, सोनम भसे आदी उपस्थित होते.
सांगिसे विद्यालय
तळेगाव दाभाडे ः सांगिसे येथील बोधिसत्व प्रतिष्ठान संचालित माध्यमिक विद्यालय, सांगिसे विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. उद्योजक चेतन प्रकाश मालू, शिक्षक पालक संघाचे गजानन जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कार्यक्रमास सरपंच सुनीता शिंदे, योगेश शिंदे, रेश्मा ढमाले, अनुसया शेडगे आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष गोकुळ गायकवाड, सचिव लहू कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजन करण्यात आले.
उर्सेत देशभक्तिपर गीते
उर्से : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व श्री पद्मावती विद्यामंदिर व श्री पद्मावती मंदिरातील प्रांगणात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात करण्यात आला. राष्ट्रगीत, ध्वजवंदन, कवायत झाली. ध्वजवंदनानंतर प्रमुख पाहुण्यांनी संविधान प्रतिज्ञा, विद्यार्थ्यांना देशभक्ती, शिस्त आणि समाजसेवेचे महत्त्व यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. परंदवडी,बेबडओहळ, धामणे, आढे ,ओझर्डे, सडवली आदी गावांतील जिल्हा परिषद शाळेतही मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. गावातून फेरी काढून ग्रामपंचायत व शाळेत ध्वजवंदन करण्यात आले.
लोणावळ्यात ध्वजवंदन
लोणावळा : विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, शासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालयांमध्ये भर पावसात ध्वजवंदन करण्यात आले. ग्रामीण भागात ग्रामपंचायतींमध्येही ध्वजवंदन झाले. लोणावळा, कार्ला, मळवली, कुसगाव बु. ग्रामीण भागात विविध शाळांमध्ये लोणावळा नगरपरिषदेच्यावतीने आयोजित मुख्य कार्यक्रमात प्रशासक व मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते, आजी-माजी-राजकीय पदाधिकारी, नगरपरिषदेचा कर्मचारीवर्ग उपस्थित होता.
राजकीय पक्षांकडून मानवंदना
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने लोणावळा स्क्वेअर मॉलशेजारी अध्यक्ष रवी पोटफोडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. नारायण पाळेकर, भरत हरपुडे, विलास बडेकर, दिलीप पवार, राजेश मेहता, अंजना कडू, उमा मेहता, सोमनाथ गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.
शहर काँग्रेसच्यावतीने गवळीवाडा येथील श्रीराम मंदिर येथे शहराध्यक्ष राजू गवळी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी नारायण आंबेकर, प्रमोद गायकवाड, निखिल कवीश्वर, सुधीर शिर्के, सुवर्णा अकोलकर, संध्या खंडेलवाल, वसंत भांगरे, सुबोध खंडेलवाल आदी उपस्थित होते.
भाजपच्यावतीने इंद्रायणी नगर येथील भाजप कार्यालय येथे शहराध्यक्ष अनिल गायकवाड यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी, रचना सिनकर, विजया वाळंज, अरविंद कुलकर्णी, राजू दळवी, अभय पारख आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने ज्येष्ठ नेते रमेशचंद्र नय्यर यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश दळवी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी शहराध्यक्ष नासीर शेख, बाळासाहेब पायगुडे, राजू बोराटी, विनोद होगले, संतोष कचरे, श्वेता वर्तक, दत्ता गोसावी, शेखर वर्तक आदी उपस्थित होते.
पोलिस दलाकडून अभिवादन
लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या हस्ते तुंगार्ली येथील कार्यालयात ध्वजवंदन झाले. पोलिस दलाच्यावतीने ग्रामीणचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे, शहरचे निरीक्षक राजेश रामाघरे यांच्यावतीने मानवंदना देण्यात आली. आयएनएस शिवाजी नौदल प्रशिक्षण केंद्र, खंडाळा पोलिस प्रशिक्षण केंद्र, लायन्स क्लब, रोटरी क्लब याचबरोबर विविध सामाजिक संघटनांच्या वतीनेही उत्साहात ध्वजवंदन झाले.
VDM25B10289, १०२९०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.