तळेगाव स्टेशन, ता. ८ : तळेगाव एमआयडीसी लगतच्या मंगरूळ-कदमवाडी परिसरातील काही खासगी कंपन्यांच्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याच्या हेतूने सोमवारी (ता. ८) सकाळी आलेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पथकाला परत जावे लागले. नियोजित कारवाईला स्थानिक आणि कामगारांनी तीव्र विरोध केला. कंपनी व्यवस्थापनाने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनंतर न्यायालयाच्या आदेशामुळे कारवाई स्थगित करण्यात आली.
पथक आल्याची माहिती मिळताच मावळ पंचायत समितीचे माजी उपसभापती शांताराम कदम, उद्योजक रणजित काकडे आदींसह परिसरातील तीन कंपन्यांमधील शेकडो कामगार आणि स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले. ‘आमदार सुनील शेळके यांनी पीएमआरडीए प्रशासनाला पत्र लिहिले आहे. तरिही कंपन्यांना का त्रास देता, असा जाब विचारणारे फलक झळकविण्यात आले.
दरम्यान, दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मुंबई उच्च न्यायालयाने कारवाईस स्थगिती दिल्याबाबत ॲड. धनंजय काटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरुन माहिती दिली. त्यामुळे कारवाई थांबविण्यात आली. यासंदर्भात पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.
---
काही स्थानिक दलालांनी आपला कार्यभाग साधण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांची दिशाभूल केल्यामुळे अनधिकृत बांधकामांवर पीएमआरडीएकडून कारवाई क्रमप्राप्त आहे. राज्याच्या उद्योगस्नेही धोरणाला अनुसरून अशा बांधकामांची शहानिशा करून त्यांचे नियमीतीकरण करून घेण्यासाठी मी आग्रही आणि प्रयत्नशील आहे.
- सुनील शेळके, आमदार
---
एकीकडे गुंतवणूक आणण्यासाठी परदेशी जायचे व दुसरीकडे आलेल्या गुंतवणूकदारांना हेतुपुरस्सर त्रास द्यायचा, असे धोरण अवलंबिलेल्या स्थानिक राजकीय पुढाऱ्याचे कान वरिष्ठांनी ओढणे गरजेचे आहे. पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांनीही उद्योगांचे प्रश्न सोडवण्यासाठी सकरात्मकता दाखवावी, जेणेकरून उद्योगांना पूरक असलेल्या मावळचे नाव बदनाम होणार नाही. स्थानिकांच्या सहकार्यामुळे कारवाईस स्थगिती मिळाल्याने सर्व गावकरी कामगारांचे आभार.
- रणजित काकडे, उद्योजक
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.