ज्ञानेश्वर वाघमारे ः सकाळ वृत्तसेवा
वडगाव मावळ, ता.११ : अवकाळी पाऊस व कृषी सहाय्यकांच्या संपामुळे मावळ तालुका कृषी विभागाने केलेले खरीप हंगामाचे नियोजन विस्कळीत झाले होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्याने व कृषी सहाय्यकांचा संप मिटल्याने खरीप हंगामातील नियोजनाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शेतीच्या रखडलेल्या मशागतीच्या कामांसह खरीप पिकांच्या पेरणीलाही आता वेग आला आहे.
मावळ तालुक्यात खरीप पिकाखाली सुमारे १५ हजार ५०० हेक्टर क्षेत्र असून कृषी विभागाने यंदाच्या हंगामात भात १२ हजार ७०० हेक्टर, सोयाबीन ५२५ हेक्टर, कडधान्ये ३०० हेक्टर, भुईमूग ८० हेक्टर या प्रमाणे पीक लागवडीचे नियोजन केले आहे. तालुक्यात मागणीप्रमाणे इंद्रायणी, फुले समृद्धी, कोलम या भातासह इतर खरीप बियाणे व खते उपलब्ध आहेत. तालुक्यात ३६ सहाय्यक कृषी अधिकारी तसेच उपकृषी अधिकाऱ्यांच्यामार्फत प्रत्येक गावात शेतकऱ्यांच्या गाव बैठका घेण्यात येत आहेत. या बैठकांमधून उत्पादकता वाढीसाठी भात बीज प्रक्रिया, उगवण क्षमता चाचणी, रोप वाटिका तयार करणे, माती नमुने घेणे, गांडुळ खत तयार करणे, युरिया ब्रिकेटचा वापर, भात लागवडीच्या सुधारित पद्धती, फळबाग लागवड योजना, ऊस एक डोळा लागवड आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. या खरीप हंगामात भात, नाचणी व सोयाबीनची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली असून शेतकरी गटांना त्याचा लाभ देण्यात येणार आहे.
सोयाबीन क्षेत्र वाढीचे प्रयत्न
तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून भुईमूग पिकाखालील क्षेत्र कमी होऊन सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढले आहे. पूर्वी भुईमूग पिकाखालील क्षेत्र सुमारे अठराशे हेक्टर एवढे होते. ते सुमारे ८० हेक्टर एवढे झाले आहे. सोयाबीन पिकाखालील क्षेत्र मात्र सुमारे ५२५ हेक्टरपर्यंत वाढले आहे. या हंगामात राष्ट्रीय खाद्य तेल (गळीत धान्य) मिशन अंतर्गत ते आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यंदा सुमारे २५ एकर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत. यात सहभागी शेतकऱ्यांना एकरी ३० किलो बियाणे, प्रशिक्षण, निविष्ठा, सेंद्रिय व रासायनिक खते आदींचा पुरवठा करण्यात येणार आहे. हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी शासनाच्या महाडिबीटी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली. गावोगावी शेती शाळांचे आयोजन करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भात लागवडीसाठी चारसूत्री पद्धतीचा अवलंब करावा, यासाठी मोठ्या प्रमाणावर जागृती करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग व बांबू लागवड करावी यासाठीही बैठकांमधून जागृती करण्यात येत आहे.
कृषी सहाय्यकांचा संप मिटल्याने तसेच पावसाने उघडीप दिल्याने मावळ तालुक्यात खरीप हंगाम नियोजनाची यशस्वीपणे अंमलबजावणी सुरू झाली आहे. क्रॉपसॅप योजने अंतर्गत रोग कीड निर्मूलन व सल्ला प्रकल्प राबविण्यात येत आहे. यंदाच्या हंगामात एक हजार माती नमुने घेण्यात येणार आहेत.
- सूर्यकांत कुंभार, कृषी अधिकारी
शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अकरा अंकाचे (डिजीट) किसान ओळख पत्र (ॲग्रोस्टॅक कार्ड) काढून घेणे गरजेचे आहे. शासन धोरणाप्रमाणे हे ओळखपत्र धारक शेतकऱ्यांना योजनांमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्र, नागरी सुविधा केंद्र, कृषी सहाय्यक, महसूल विभाग, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आदींशी संपर्क साधून लवकरात लवकर हे ओळखपत्र काढून घ्यावे.
- मारुती साळे, मावळ तालुका कृषी अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.