वडगाव मावळ, ता. १४ : श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच, लोहगड घेरेवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने लोहगडावर महाशिवरात्र उत्सव रविवारी (ता. १५) पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.
महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला रात्री नऊ वाजता लोहगड येथील मारुती मंदिरात लोहगड, घेरेवाडी व भाजे येथील भजनी मंडळांच्या वतीने हरिजागर करण्यात येईल. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी साडेसात वाजता लोहगडावरील महादेव मंदिरात तळेगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे व पंचायत समिती सदस्या रेश्मा देवकर यांच्या हस्ते अभिषेक होईल. सकाळी नऊ वाजता लोहगड गावातून श्री शिवाजी उदय मंडळाच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात शिवपालखीची मिरवणूक काढण्यात येईल. सकाळी दहा वाजता शिववंदनेने शिवस्मारकावर अभिवादन करण्यात येणार आहे. नंतर शिवपालखी लोहगडावरील शिवमंदिरात दर्शनासाठी प्रस्थान करेल. यावेळी महाप्रसादाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
लोहगड विसापूर मंचाचे यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष आणि लोहगड किल्ल्याचा युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीत समावेश असा दुग्धशर्करा योग असल्यामुळे असंख्य ग्रामस्थ, शिवभक्त व प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे व अध्यक्ष विश्वास दौंडकर यांनी दिली. मंचाच्या पुढाकाराने लोकसहभागातून व शासकीय निधीतून लोहगड पायथ्याला शिवस्मारक उभारण्यात आलेले आहे. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना शिवकार्याची प्रेरणा मिळते. या शिवस्मारक परिसरामध्ये साजेशी शिवसृष्टी साकार व्हावी, अशी शिवभक्तांची इच्छा असल्याची भावना सचिन टेकवडे यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.