वाकड, ता. २३ : स्थानिक भूमिपुत्रांचे हक्क आणि अधिकार डावलून पीएमआरडीएकडून अत्यंत बेकायदेशीर, मनमानी पद्धतीने परतावा भूखंडांचे वाटप केले जात असल्याचा गंभीर आरोप करत कस्पटे वस्ती येथील ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे. आकुर्डी येथील पीएमआरडीएच्या कार्यालयाबाहेर सलग सहाव्या दिवशी त्यांचे आंदोलन सुरू राहिले.
ज्ञानेश्वर कस्पटे, समीर कस्पटे, मारुती कस्पटे, मुकेश कस्पटे, सोमनाथ कस्पटे, सुहास कस्पटे, सचिन कस्पटे, संजय कस्पटे, तानाजी शेडगे, बाळासाहेब कस्पटे यांच्यासह अन्य शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. या गैरप्रकारांची सखोल चौकशी करुन भूमिपुत्रांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत माघार न घेण्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.
आंदोलनकर्त्यांचे म्हणणे...
- शासन निर्णयानुसार संबंधित शेतकऱ्याला त्याच गावात उपलब्धतेनुसार १२.५ टक्के परतावा भूखंड देणे अनिवार्य
- वाकडमध्ये भूमिपुत्रांना डावलून इतर गावांतील धनदांडग्या व्यापारी, मर्जीतील लोकांना जमिनींचे बेकायदेशीर वाटप - काही विशिष्ट व्यक्तींना वाकडसारख्या मोक्याच्या ठिकाणी भूखंड देऊन नियमांचे उल्लंघन
- वाकड आणि भोसरी येथील जमिनींच्या रेडी रेकनर दरांमध्ये मोठी तफावत असतानाही केवळ संगनमताने हा आर्थिक गैरव्यवहार सुरू
दलालांच्या हिताचे काम
जमिनींचे न्यायालयात खटले प्रलंबित आहेत किंवा ज्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही, अशा प्रकरणांतही प्राधिकरणाने नियम धाब्यावर बसवून परतावा भूखंडांची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रशासन केवळ दलाल आणि व्यापाऱ्यांच्या हितासाठी काम करत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आला.
वाकड येथील स्थानिक भूमिपुत्रांचे हक्क व अधिकार डावलून गैरप्रकाराने, मर्जीप्रमाणे, बेकायदेशीरपणे व मनमानी पद्धतीने पीएमआरडीएकडून इतर लोकांना परताव्याचे वाटप केले जात आहे.
- ज्ञानेश्वर कस्पटे, उपोषणकर्ते, वाकड
विकासकामाला प्राधान्य देत ग्रामस्थांनी कुठलाही मोबदला न देता जमिनी दिल्या. त्यांच्यावर अन्याय होत आहे. शासकीय अध्यादेशानुसार जमीनधारकांना आधी परताव्याच्या जमिनी राखीव कराव्यात. त्यांना त्याचे वाटप व्हावे नंतरच इतरांचा विचार व्हावा.
- संतोष कलाटे, ग्रामस्थ, वाकड
कस्पटे कुटुंबियांसोबत कुठलाही अन्याय होणार नाही. त्यांच्या आम्ही संपर्कात आहोत. त्यांना आम्ही प्रकरण करण्याबाबत विनवणी करत आहोत. रीतसर प्रकरण दाखल झाल्यानंतर निश्चितपणे त्यांना कायदेशीर परतावा मिळेल.
- पुनम मेहता, सहआयुक्त जमीन व मालमत्ता विभाग, पीएमआरडीए
WKD26A10559
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.