सध्या अनेक वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. बॉलिवूड सिनेमांमध्ये अनेक नवीन जोड्या आणि फ्रेश कथा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत आणि आता अशीच एक फ्रेश गोष्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता आयुष्यमान खुराना पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.
पिंकव्हीला या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, धर्मा प्रॉडक्शन्स आणि सिख्या एंटरटेनमेंट नव्या सिनेमाची निर्मिती करत असून आयुषमान आणि साराची या सिनेमासाठी निवड झाली आहे. अजून या सिनेमाचं नाव ठरलं नसून आकाश कौशिक हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. ही एक स्पाय कॉमेडी प्रकारची फिल्म असेल.
सूत्रांनी दिलेल्या बातमीनुसार, "करण आणि गुनीत या प्रोजेक्टसाठी खूप उत्सुक असून या सिनेमाची स्क्रिप्ट खूप उत्तम आहे. सिनेमाचं कथानक पाहून हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवेल असा आमचा अंदाज आहे. आयुषमानचं धर्मासोबत पहिल्यांदा काम करत असून तो या भूमिकेला न्याय देईल असं आम्हाला वाटतं ."
आयुषमान पहिल्यांदाच सारा अली खानसोबत स्क्रीन शेअर करत असून त्याची करणसोबतचीही पहिली फिल्म आहे. तर साराचे नुकतेच 'ए वतन मेरे वतन','मर्डर मुबारक ' हे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस आले. तिचे हे दोन्ही सिनेमे ओटीटीवर रिलीज झाले होते. अनेकांना तिचं या सिनेमातील काम खूप आवडलं.
आता सारा आणि आयुषमानचा हा आगामी सिनेमा कशावर आधारित असणार? सिनेमाचं कथानक काय असेल? सिनेमात आणखी कोण कलाकार दिसणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागेल.
अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आलेल्या आयुषमानने व्हीजे म्हणून त्याची करिअरला सुरुवात केली. एमटीव्ही वर काही शो होस्ट केल्यानंतर त्याने काही काळ अवॉर्ड्स शोमध्येही सूत्रसंचालन केलं. 'विकी डोनर' या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून एंट्री केली. त्याचा हा सिनेमा सुपरहिट झाला.
त्यानंतर आयुषमानचे अंधाधून, बरेली कि बर्फी, मेरी प्यारी बिंदू, बधाई हो, आर्टिकल 15 हे सिनेमे खूप गाजले. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं.