एकाच या जन्मी जणू, फिरुनी नवी जन्मेन मी... या सदाबहार मराठी गाण्याची हीच ओळ बदलत्या फॅशन ट्रेंडना अगदी परफेक्ट लागू होते. नावीन्य किंवा बदल प्रत्येक गोष्टीत हवाहवासा वाटतो; मग ते जेवण असो, राहणीमान असो किंवा फॅशन असो. जुनी कुठलीही गोष्ट वापरून कंटाळा आलेला असला, तरीही ती वस्तू खराब न झाल्यामुळे आपण जपून ठेवतो, ती वस्तू परत कधीतरी ट्रेंडमध्ये येईल तेव्हा परत वापरता येईल अशी आशा आपल्याला असते.
फॅशन इंडस्ट्रीतील बदलांचेही असेच आहे! रोज रोज कुठून आणणार नवनवीन कल्पना? मग जुनेच डोळ्यासमोर ठेवून त्यात काळानुसार फेरबदल करून तीच फॅशन परत पुनर्जन्म घेते. या ‘फिरुनी परत’ जन्म घेणाऱ्या फॅशनमध्ये सत्तरच्या दशकात गाजलेल्या फ्रिल सध्या आघाडीवर आहेत.
कोणत्याही प्रकारचे कपडे असोत- फ्रॉक, जॅकेट, स्कर्ट, शर्ट, ब्लाऊज, टॉप ते अगदी साड्यांपर्यंत सर्व पेहरावांवर फ्रिल लावून त्यांना अधिक उठावदार बनवले जाते. फ्रिल अगदी साध्याशा दिसणाऱ्या ड्रेसलाही आकर्षक व स्टायलिश लूक देतात. कपड्यावर गळ्याला, खांद्याला, हाताला, बॉटमला कुठेही फ्रिल वापरली की कपडे एकदम ट्रेंडी दिसतात व घालायलाही एकदम आरामदायक असतात.
इतर गोष्टींप्रमाणेच फ्रिलमध्येही वेगवेगळे प्रकार असतात. फ्रिलचे काही प्रमुख प्रकार हे असे - सिंगल एज फ्रिल, डबल एज फ्रिल, स्पायरल फ्रिल, सर्क्युलर फ्रिल, कॅस्केडिंग फ्रिल, प्लीटेड फ्रिल, वॉटरफॉल फ्रिल, ओरेव्ह फ्रिल.
सिंगल एज फ्रिल : कापडाच्या सिंगल अथवा दुहेरी पट्टीवर प्लीट लावून बनविलेले हे फ्रिल स्कर्ट व फ्रॉकवर छान उठून दिसतात. या प्रकारात कापडाच्या अरुंद अथवा रुंद पट्टी अशा दोन्ही प्रकारच्या पट्ट्यांवर या फ्रिल बनवता येतात. कमी उंचीच्या कापडांना प्लेन फ्रिल वापरता येते.
डबल एज फ्रिल : डबल एज फ्रिलला स्तरीत किंवा लेअर्ड फ्रिलही म्हणतात. यात पहिल्या फ्रिलच्या दोन ते तीन इंच अंतरावर दुसरी फ्रिल ठेवून शिवली जाते. फ्रिल एकाखाली एक असल्यामुळे या कितीही पटींत कापडावर शिवता येतात, त्यामुळे त्याला लेअर्ड फ्रिल म्हणतात. ज्या ड्रेसची लांबी जास्त असते, त्या ड्रेसवर ह्या लेअर्ड फ्रिल जास्त उठून दिसतात. जितके जास्त फ्रिलचे थर एकावर एक असतात, कपडे तेवढेच आकर्षक दिसतात.
स्पायरल फ्रिल : स्पायरल फ्रिल ही फॅब्रिकच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत तिरपी शिवली जाते. उदाहरणार्थ, फ्रिल उजव्या खांद्याच्या टोकापासून डाव्या बाजूच्या कमरेच्या टोकापर्यंत तिरपी व निमुळती शिवली जाते. या स्पायरल फ्रिलचा लूक एकदम एलिगन्ट दिसतो, तसेच अशा फ्रिलमुळे कुठल्याही प्रकारचा टॉप अथवा कुर्ती एकदम स्टायलिश दिसू शकते.
सर्क्युलर फ्रिल : सर्क्युलर फ्रिल ह्या कापड दुमडून त्याचा कोन करून नंतर तिरप्या कापल्या जात्या. ह्यामध्ये फ्रिलला प्लीट येत नाहीत. फ्रिल प्लेन दिसते व फॉल खूप छान येतो. ज्या खांद्याच्या वरच्या भागापासून सुरू होते, त्याच साइडच्या कमरेच्या खालच्या भागापर्यंत ही फ्रिल ओव्हरलॅपिंग येते. ही फ्रिल एका वेव्ही पॅटर्नचा लूक देते. अशा प्रकारच्या फ्रिल एकतर पार्टी ड्रेसला लावल्या जातात, अथवा कुठल्याही कोट अथवा बाहीच्या कफला लावल्या जातात.
कॅस्केडिंग फ्रिल : कॅस्केडिंग फ्रिलचे कटिंग सर्क्युलर फ्रिलप्रमाणे ओरेव्ह (तिरप्या) कापडात होते. फक्त फ्रिल कापडावर शिवताना सर्क्युलर पॅटर्नमध्ये न शिवता, उभी (व्हर्टिकल) शिवली जाते. एकाखाली एक लावलेल्या ह्या फ्रिल अत्यंत सुंदर दिसतात व कुठल्याही ड्रेसची शोभा वाढवतात.
प्लीटेड फ्रिल : कुठल्याही फॅब्रिकवर प्लीटेड फ्रिल लावताना फ्रिलची लांबी कापडापेक्षा निदान तिप्पट घ्यावी लागते व नंतर त्याला ओव्हरलॅपिंग प्लीट टाकून व्यवस्थित शिवून फ्रिलची पट्टी तयार करावी लागते. ही पट्टी नंतर पाहिजे त्या कापडावर जोडता येते. शॉर्ट टॉपवर अथवा ब्लाऊजच्या बाह्यांवर ह्या प्रकारच्या फ्रिल जोडल्या जातात.
वॉटरफॉल फ्रिल : वॉटरफॉल फ्रिल हा कॅस्केडिंग फ्रिलचा प्रकार आहे. एकाखाली एक अशा बऱ्याच फ्रिल जोडल्यानंतर जो एक सुंदर फॉल इफेक्ट येतो, त्यामुळे ह्या प्रकाराला वॉटरफॉल फ्रिल म्हटले जाते. सध्या फ्रिल ऑफशोल्डर ड्रेसमध्ये लावल्या जातात. डीप नेकलाईन असलेल्या ड्रेस, ब्लाऊजभोवती सिंगल अथवा डबल लेअरमध्ये फ्रिल बनवली जाते.
ओरेव्ह फ्रिल : ओरेव्ह फ्रिल कापडात तिरप्या कापल्या जातात. त्यामुळे कापड निश्चितच जास्त लागते. कुर्ते, टॉप, गाऊन, ब्लाऊज ह्यांच्या स्लीव्हमध्ये ओरेव्ह फ्रिलचा वापर केला जातो. कापड जरी जास्त लागत असले तरी ड्रेस तयार झाल्यानंतर खूप सुंदर दिसतो.
फ्रिल बनवण्यासाठी नेहमी चांगल्या दर्जाचे आणि सॉलिड रंगाचे कापड घ्यावे, नाहीतर धुतल्यानंतर तुमचा संपूर्ण ड्रेस खराब होतो.
फ्रिल बनवण्यासाठी प्युअर कॉटनऐवजी जॉर्जेट, सॉफ्ट नेट आणि सॅटिनसारखे सॉफ्ट सिंथेटिक मिक्स कापड घ्यावे, कारण त्यामुळे फ्रिलला चांगला फॉल येतो व फ्रिल सुंदर दिसते. कडक फॅब्रिक फ्रिलचा लूक खराब करते.
फ्रिलवर लेस, बीड, स्टोन, पायपीन आणि मोती लावून ड्रेसला हेवी लूक देता येऊ शकतो.
फ्रिल केलेले कपडे मशिनऐवजी सॉफ्ट डिटर्जंटने हाताने धुवावे, जेणेकरून त्यांचे टाके आणि पिको सुरक्षित राहतील.
आजकाल लेअर्ड शरारा ड्रेसची फारच फॅशन आहे. त्याच्यासाठी बाजारातून कापड खरेदी करण्याऐवजी तुमची कोणतीही जुनी साडी वापरता येईल. साडीचा पदर वेगळा करावा (त्यापासून कुर्ता शिवता येईल), उरलेल्या कपड्यात पातळ साधी लेस किंवा गोटा पट्टीची लेस लावून आलिशान शरारा ड्रेस करता येतो. मॅच आणि सार्डिन वेगळे घेता येते. फ्रिल बनवण्यासाठी साडीचा फॉल वापरल्यामुळे ड्रेसलाही फॉल चांगला येतो आणि फ्रिलही सहज बनते.
रुंद फिती आणि सॅटिनच्या लेससह फ्रिल बनवणे खूप सोपे आहे, परंतु त्यातून फक्त साधे सिंगल एज फ्रिल बनवता येते.
फ्रिल बनवताना फॅब्रिकला मॅचिंग धागाच वापरावा.
पार्टी वेअर म्हणून साधी कुर्ती, ब्लाऊज किंवा टॉप बनवायचा असेल तर त्यात फक्त कॉन्ट्रास्ट किंवा बेज रंगाचे फ्रिल बनवा, कमी खर्चात मस्त ड्रेस तयार होईल.
फ्लेअर्ड, फ्रिल अथवा रफल्ड अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या फ्रिल, कापडाला अथवा पोशाखाला अतिशय सुंदर व आगळावेगळा लुक प्रदान करतात.
- सोनिया उपासनी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.