Kailas Man sarovar
Kailas Man sarovar Esakal
साप्ताहिक

Kailash-Man Sarovar Yatra : ओम नमः शिवाय असा जप करत बर्फाळ थंड पाण्यात तीनदा बुडी मारली आणि...

साप्ताहिक टीम

भ्रमंती : सुधीर दामले

मानसरोवराच्या काठावर पक्क्या बराकीमध्ये राहण्याची व्यवस्था होती. अंथरूण-पांघरूण, खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था होती. एका खोलीत तीन-चारजण. खोलीतून समोर दूरवर पसरलेल्या अथांग निळ्याशार रमणीय सरोवराचे दर्शन म्हणजे निखळ नयनसुखच!

कैलास-मानसरोवर यात्रा करावी हा विचार बरीच वर्षे मनात सतत घुटमळत होता. तो योग काही वर्षांपूर्वी आला. त्यावेळी माझं वय ६९ असल्यामुळे मुंबईतील दोन नामांकित पर्यटन कंपन्यांनी मला नकार दिला होता.

या यात्रेला चीन सरकारने कमाल वयोमर्यादा ७० दिली असल्याने व्हिसा मिळेल याची खात्री नव्हती. त्याच सुमारास दिल्लीच्या एका पर्यटन कंपनीची जाहिरात वाचनात आली. त्यांच्या मुंबईच्या कार्यालयाला फोन केला.

कोणतीही सबब न सांगता त्यांनी या प्रवासाला नेण्याची तयारी दर्शविली. त्याप्रमाणे मी व माझा मित्र सिध्दार्थन, आम्ही या यात्रेला जाण्याचे ठरवले. कंपनीच्या सल्ल्यानुसार जून महिन्यातील एक तारीख ठरवली.

ती तारीख ठरवताना आम्ही मानसरोवराला पोहोचू तेव्हा तेथे पौर्णिमा असेल, याची काळजी घेतली. प्रवासाचे दोन पर्याय होते. रस्त्याने जायचे किंवा हवाई मार्गाने. आम्ही हवाई मार्ग निवडला. हा प्रवास विमान व हेलिकॉप्टरने होणार होता.

हा प्रवास जास्त खर्चिक होता. लाखाच्या वर खर्च जाणार होता, पण हा प्रवास तुलनेने कमी कष्टप्रद होता. कपडे व इतर सामान नेण्यासाठी कंपनीने प्रत्येकाला एक भली मोठी डफल बॅग दिली होती. त्यातूनच सर्व सामान न्यायचे असे सांगितले.

मुंबईहून निघण्याच्या आदल्या रात्री सामान भरले. गजर लावला, झोपायला जाणार तेवढ्यात फोन वाजला. कंपनीच्या प्रतिनिधीने कळवले निघू नका. काही कारणास्तव चीन सरकारने तिबेट प्रवेश तात्पुरता बंद केला आहे. बंदी उठेल तेव्हा कळवू.

शेवटी एकदा ती बंदी उठली व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात काठमांडूला पोहोचलो. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली होती. त्या रात्री टूर लीडरने पुढील प्रवासाची सविस्तर माहिती दिली.

ज्यांना कैलासची परिक्रमा घोड्यावरून करायची होती त्यांच्याकडून १२०० युआन आगाऊ घेतले. परिक्रमा करताना फक्त बॅकपॅक जवळ ठेवता येतो.

पण तो आपल्याबरोबर नाही घोडेवाल्याबरोबर एक पोर्टर असतो, त्याच्याकडे द्यावा लागतो. त्याला त्यासाठी वेगळे ६०० युआन. मे ते सप्टेंबर असे पाच महिने ही यात्रा चालते म्हणून जेवढी होईल तेवढी कमाई ते करून घेतात, असे आम्हाला सांगण्यात आले.

दुसऱ्या दिवशी काठमांडू ते नेपाळगंज असा सुमारे ४० मिनिटांचा विमान प्रवास होता. नेपाळगंज येथे एक रात्र राहून दुसऱ्या दिवशी एका लहान विमानाने सुमारे २०-२५ मिनिटांचा प्रवास करून सिमीकोट (उंची ९,२५० फूट) येथे पोहोचलो व लगेच दुपारी हेलिकॉप्टरने २० मिनिटांचा प्रवास करून नेपाळ - तिबेट सीमेवरील हिल्सा येथे पोहोचलो. या प्रवासात नेपाळला एकेकाळी ‘माउंटन किंग्डम’ का म्हणत त्याचा प्रत्यय आला.

हेलिकॉप्टर म्हणजे आपली लाल परी... पायलटच्या शेजारी एक जण व मागे ठेवलेल्या एका फळीवर आम्ही तिघेजण. हेलिकॉप्टरच्या ३-४ फेऱ्या झाल्यावर आमचा १६ जणांचा ग्रुप हिल्सा येथे आला.

आम्हा दोघांव्यतिरिक्त बाकी सहप्रवासी म्हणजे, बडोद्याहून एक आई-मुलगी, बंगळूर येथील मध्यमवयीन जोडपे, साठीतल्या दोन ब्रिटिश स्त्रिया, कोलकत्याहून पाचजण, कानपूरहून एक तरुण जोडपे व मुंबईहून एक निवृत्त पोलिस अधिकारी असे विविध ठिकाणांहून आलेले होते.

नेपाळ व तिबेट यांच्यामध्ये एका नदीवरील पूल एवढेच अंतर. पुलावरून चालत तिबेटमध्ये प्रवेश केला. तेथे आमच्या सामानाची कसून तपासणी झाली. बौद्ध धर्म, दलाई लामा, तिबेट संस्कृती यांचा उल्लेख असलेले काहीही सामान, पुस्तक वगैरे घेऊ नका अशी सक्त ताकीद आधीच आम्हाला दिली गेली होती.

तपासणीनंतर लँडरोव्हर गाड्यांतून थोड्या अंतरावरील ताकलाकोट या गावी एका हॉटेलात पोहोचलो. वातावरणाचा सराव होण्यासाठी इथे दोन रात्री, एक दिवस असा मुक्काम होता. थंडी आहे म्हणून खोलीत सतत राहू नका बाहेर फिरा असा सल्ला आम्हाला दिला होता.

या छोट्याशा गावात डिस्को, हॉटेल, तिबेटी लोकांचा बाजार वगैरे होता, ते पाहून आलो. ताकलाकोट ते मानसरोवर या प्रवासात वाटेत राक्षस-ताल सरोवरापाशी थांबलो.

संथ गर्द निळ्या पाण्याच्या त्या रम्य सरोवरात जीवजंतू राहत नाहीत असे म्हणतात. या तळ्याच्या काठावर रावणाने शिवलिंग मिळवण्यासाठी तपश्चर्या केली अशी आख्यायिका आहे. तासभर थांबून पुढे मानसरोवराला पोहोचलो.

मानसरोवराच्या काठावर पक्क्या बराकीमध्ये राहण्याची व्यवस्था होती. अंथरूण-पांघरूण, खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था होती. एका खोलीत तीन-चारजण. खोलीतून समोर दूरवर पसरलेल्या अथांग निळ्याशार रमणीय सरोवराचे दर्शन म्हणजे निखळ नयनसुखच!

ओम नमः शिवाय असा जप करत बर्फाळ थंड पाण्यात तीनदा बुडी मारली. कुडकुडत बाहेर येऊन कपडे बदलले. कंपनीतर्फे बरोबर आलेला डॉक्टर अधून मधून वैद्यकीय तपासणी करत असे. डॉक्टरबरोबर एक गुरुजीसुद्धा आले होते.

आमच्या ग्रुपमधील पाचजणांनी पूजा केली व तेथूनच परत गेले. उरलेल्या अकराजणांपैकी काही चालत, तर काही घोड्यावर बसून परिक्रमेकरिता निघाले. पहिला टप्पा यमद्वार. यमद्वार नावाच्या या कमानीतून पुढे गेलो की चित्रगुप्ताकडे हजेरी लागते अशी आख्यायिका सांगितली जाते.

दुपारी चार-साडेचारपर्यंत पहिल्या मुक्कामाला डेराफूक येथे पोहोचलो. या ठिकाणाहून कैलास पर्वताचे जवळून दर्शन होते. दुसऱ्या दिवशी बऱ्यापैकी चढण होती. ती चढून साधारण १८ हजार फूट उंचीवर असलेला डोलमाला पास येथे आलो. येथे दगडांच्या राशी होत्या. ती तिबेटी लोकांची पवित्र ठिकाणे होती.

सर्वत्र रंगीबेरंगी पताका लावल्या होत्या. येथून तीन ते चार किलोमीटरचा उतार असल्यामुळे घोड्यावरून उतरून पोर्टरच्या मदतीने चालत खाली आलो व परत घोड्यावर बसून झुटुलफूक या मुक्कामावर आलो.

येथून निघाल्यावर काही अंतरांवर आमच्या गाड्या आल्या होत्या, त्यांत बसून मानसरोवराच्या काठाने ताकलाकोटला परत आलो. वाटेत जैन धर्मीयांचे अष्टपाद ठिकाण आहे. काही मंडळी येथे देवदर्शन करून आली.

ताकलाकोटहून निघाल्यापासून अंगाला पाण्याचा स्पर्शही झालेला नव्हता. त्यामुळे ताकलाकोटला शॉवरखाली अंघोळ करताना स्वर्गसुखाची प्रचिती झाली.

दुसऱ्या दिवशी पूल ओलांडून परत हिल्सा येथे आलो व तेथून हेलिकॉप्टरने सिमीकोट. उशीर झाला होता. दुपारी दोननंतर हवामान खराब होत असल्यामुळे विमान वाहतूक होत नाही. त्यामुळे ती रात्र सिमीकोटला राहावे लागले.

नेपाळगंजला पोहोचायलासुद्धा उशीर झाला. तेथे संध्याकाळी पाचनंतर विमान वाहतूक बंद असते. परत एक रात्र मुक्काम वाढला. काठमांडूला परत आलो तोपर्यंत काठमांडू - मुंबई विमान निघून गेले होते. टूर कंपनीने त्यांच्या खर्चाने पंचतारांकित हॉटेलमध्ये सोय केली. दुपारी पशुपतिनाथ मंदिरात निवांत दर्शन घेतले.

सकाळी स्थानिक विमानतळावर जाऊन पाच हजार रुपये व एक तासाची माउंटन फ्लाइट बुक केली आणि विमानात बसून पर्वताचे विलोभनीय दर्शन घेतले. पायलट प्रत्येकाला दोन-तीन मिनिटे कॉकपिटमध्ये बोलावून हिमालयातील उत्तुंग पर्वतराजाची माहिती देत होता.

परत आल्यावर आंतरराष्ट्रीय विमानतळावर काठमांडू - मुंबई विमानाने परतायचे होते. थकलेल्या शरीराने, पण प्रसन्न मनाने आम्ही परत आलो. माझी कैलास - मानसरोवर यात्रेची मनीषा अखेर पूर्ण झाली होती.

------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : Lok Sabha Election 2024 : जाणून घ्या 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT