Tourism tips: देशात किंवा परदेशात फिरायला जाताय ? पर्यटकांनी लक्षात ठेवाव्यात अशा काही महत्वाच्या गोष्टी!

कॅप्टन निलेश हॉलिडेजचे कॅप्टन निलेश गायकवाड यांच्याशी त्यांच्या अनुभवांबद्दल गप्पा मारताना देशात किंवा परदेशात फिरायला जाताना पर्यटकांनी लक्षात ठेववेत अशा काही मुद्द्यांविषयी
tourism tips
tourism tipsesakal

वैष्णवी कारंजकर

धकाधकीच्या जीवनातून विरंगुळ्याचे काही क्षण पर्यटनाच्या माध्यमातून आपण अनुभवतो. हे क्षण अधिक सुखकर आणि आनंददायक कसे होतील, याची काळजी आपण स्वतःच घ्यायला हवी.

वाहनांचे कर्णकर्कश्श भोंगे, अगदी रटाळ, संथपणे पुढे सरकणारं ट्रॅफिक, रणरणतं ऊन, जोरदार पाऊस किंवा गोठवणारी थंडी अशा सगळ्या अडथळ्यांना पार करून तुम्ही अखेर ऑफिसमध्ये पोहोचता.

तिथेही रोजरोज तेच काम, समस्या, ताणतणाव या सगळ्याशी लढून पुन्हा भोंगे, ट्रॅफिकच्या लढाईला सज्ज होता.

रोजच्या त्याच त्या रूटीनचा कंटाळा येत नाही का? तुम्हाला मला सर्वांनाच कधी ना कधी कंटाळा येतो आणि ब्रेकची गरज पडते. मग ठरतात फिरायला जायचे प्लॅन.

कोणी मित्रमैत्रिणींसोबत जायचं ठरवतं, कोणी कुटुंबासोबत जाण्याचे बेत आखतं. पण कधीकधी कोणाचे बेत रद्द होतात तर कोणाची सहलीतच फजिती होते. रोजच्या आयुष्यातून आराम देणारे हे फिरण्याचे बेत असे फसणं निश्चितच निराशाजनक आहे.

कोणाचीच अशी निराशा होऊ नये, यासाठी काही अगदी बारीकसारीक गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. तुमची सहल अधिक सुखकर व्हावी आणि त्यातून तुम्हाला आनंद मिळावा यासाठी या काही टिप्स.

कॅप्टन निलेश हॉलिडेजचे कॅप्टन निलेश गायकवाड यांच्याशी त्यांच्या अनुभवांबद्दल गप्पा मारताना देशात किंवा परदेशात फिरायला जाताना पर्यटकांनी लक्षात ठेववेत अशा काही मुद्द्यांविषयी बोलणे झाले.

tourism tips
Ayodhya Ram Mandir Inauguration : विराट पोहचला अयोध्येत; हरभजनही Video शेअर करत म्हणाला...

ऐनवेळची कटकट नको

भारतामध्ये जगभरातील सर्व प्रकारचे वातावरण पाहायला मिळते. जे पाहायला लोक इतर देशात जातात, म्हणजे बर्फाळ प्रदेश, वाळवंट, समुद्र किनारा हे सर्वकाही भारतामध्ये आपल्याला पाहता येते. त्यामुळे पूर्वी वातावरणाचा अंदाज घेऊन फिरायला जाण्याचे बेत आखले जायचे.

तीव्र उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी तर हिवाळ्यात उष्ण ठिकाणी फिरायला जाण्याचे बेत पर्यटक आखायचे. मात्र आता बहुतांशजणांचे बेत हे ऑफिस आणि शाळा कॉलेजना मिळणाऱ्या सुट्ट्यांवर अवलंबून असतात.

वातावरण बघून फिरायला जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. अशातच ऑनलाइन बुकिंगच्या सुविधेमुळे ऐनवेळी बेत आखून फिरायला निघता येते.

मात्र, अशा ऐनवेळच्या प्रवासात जागा न मिळणे, ऐनवेळी बुकिंग केल्याने तिकिटे, राहण्याची व्यवस्था याला जास्त पैसे खर्च करावे लागणे किंवा अगदीच गैरसोय होणे असे प्रकारही वाढत आहेत.

त्यामुळे आपल्या सहलीचे नियोजन आधीच करावे, ऐनवेळी करू नये. त्यामुळे तुमचे पैसे आणि मनस्ताप दोन्हीही वाचेल.

तसेच आपले बुकिंग एखाद्या विश्वासार्ह पर्यटन कंपनीकडून अथवा एजंटकडून करावे, जेणेकरून आपल्याला कन्फर्म तिकिटे मिळतात आणि भविष्यातील हेळसांडही टाळता येते. देशात आणि परदेशातही फिरताना ही काळजी घेणे गरजेचे आहे.

tourism tips
National Tourism Day: पर्यटन क्षेत्रात नवउद्योजिकांना सुवर्णसंधी, ‘आई’ या महिला केंद्रित धोरणामुळे प्रोत्‍साहन

औषधे असावीतच

सामान्यपणे कोणत्याही ठिकाणी प्रवासाला जाताना आपल्या प्रकृतीसाठी लागणारी औषधे सोबत ठेवायला हवीत. रोजच्या औषधांसोबतच आपत्कालीन स्थितीसाठी लागणारी थोडीफार औषधेही सोबत असावीत.

कोणत्याही ठिकाणी फिरायला जात असताना, विशेषतः परदेशात जाताना गरजेपेक्षा थोडी जास्त औषधे सोबत घेणे गरजेचे आहे. परदेशात आपल्याला हवी ती औषधे मिळतीलच असे नाही. त्यामुळे ती गैरसोय टाळण्यासाठी थोडी जास्त औषधे सोबत ठेवावीत.

वयस्क पर्यटकांनी दोन वेगळ्या बॅगेत औषधे ठेवावीत, म्हणजे बॅग विसरली, हरवली किंवा एका बॅगेत औषधे सापडली नाहीत तर दुसऱ्या बॅगेत ती नक्की असतील.

स्वतःला विसरा, पण कागदपत्रे विसरू नका

हल्ली देशात कुठेही गेलात तरी, आधारकार्ड सोबत बाळगायलाच हवे. आधारकार्ड देशात कुठेही चालते. याशिवाय आपली तिकिटे, बुकिंगच्या पावत्या, इतर काही आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवायला हवीत.

परदेशात फिरायला जात असाल, तर तुमचा पासपोर्ट अत्यंत मौल्यवान आहे. परदेशात तुम्हाला कोणतीही अडचण आली, तर पासपोर्टच्या मदतीने तुम्हाला त्वरित मदत मिळू शकते.

काही हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथे पासपोर्ट जमा करून घेतला जातो. ही सर्वात सुरक्षित पद्धत असल्याची माहिती कॅप्टन निलेश गायकवाड यांनी दिली. हॉटेल्समध्ये तुमचा पासपोर्ट त्यांच्या लॉकरमध्ये ठेवला जातो.

हा पासपोर्ट देताना आणि परत घेताना अशा दोन्ही वेळी कॅमेऱ्याद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाते. त्यामुळे पासपोर्ट गहाळ होऊ द्यायचा नसेल, तर हॉटेल व्यवस्थापनाच्या ताब्यात द्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

याशिवाय परदेशात जाताना ट्रॅव्हल इन्शुरन्स जरूर घ्यावा. यामुळे तुमची एखादी वस्तू हरवली तर ती परत मिळण्यास जास्त मदत होते.

tourism tips
Goa Holiday Package : गोवाभ्रमंतीसाठी IRCTCने लाँच केलं एअर टूर पॅकेज, जाणून घ्या तारीख व तिकीट खर्चाची संपूर्ण माहिती

संपर्कात राहा

भारतात वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला गेलात तर आता मोबाईल रोमिंगची गरज नाही. पण परदेशात जाताना इंटरनॅशनल सिमकार्ड वापरणे गरजेचे आहे. तुमच्या वापरातल्या सिमकार्डावरही तुम्ही इंटरनॅशनल रोमिंग सुरू करू शकता. प्रवासाला निघण्यापूर्वी याची खात्री करून घ्या.

यामुळे तुम्ही लोकांच्या संपर्कात राहू शकाल. तुम्हाला कुठेही काही अडचण आली, तर मोबाईल नेटवर्कची योग्य सोय केल्याने तुम्ही त्वरित मदत मागू शकता.

काही देशांमध्ये वेगळ्या पद्धतीची चार्जिंग सॉकेट असतात. त्यामुळे त्या पद्धतीचे चार्जर सोबत नेणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे चार्जर खरेदी करण्यापेक्षा कन्व्हर्टर, युनिव्हर्सल अॅडाप्टर सोबत ठेवावा. त्याची तयारी इथूनच करून जावे.

अनावश्यक खाणे नकोच

खाण्याबद्दलची आपली मुख्य गरज काय असते तर नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण मिळणे. देशात बहुतांश ठिकाणी आपल्याला हवे ते, खाण्यायोग्य जेवण मिळू शकते. त्यामुळे आपल्यासोबत अनेक खाण्याचे पदार्थ नेणे टाळा.

काही लोक अगदी बॅगा भरून भरून खायला नेतात. पण त्याची गरज नाही. पूर्वी जेवणाच्या फारशा सोयी उपलब्ध नव्हत्या. पण आता देशभरात विविध प्रकारचे खाण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे अनावश्यक पदार्थ सोबत नेणे टाळा. परदेशात आपण मज्जा करण्यासाठी जातो, तिथली माहिती घेण्यासाठी जातो.

त्यामुळे तिथल्या खाद्यसंस्कृतीचीही माहिती घ्या. अनेक देशांमध्ये भरपूर भारतीय हॉटेलं आहेत, त्याचाही आस्वाद तुम्ही घेऊ शकता. पण स्थानिक पदार्थांची चव जरूर चाखा. अर्थात थोडा खाऊ सोबत बाळगण्यास हरकत नाही.

मधुमेहाच्या रुग्णांना विशेषतः खाण्याच्या वेळा पाळाव्या लागतात किंवा काही जणांना भुकेच्या वेळी खाणं लागतं, त्यावेळी हा वरचा खाऊ तुम्ही घेऊ शकता. पण त्याचे प्रमाणही कमी असावे.

tourism tips
Honeymoon Package : हनिमून जास्तच रोमॅन्टिक अन् स्वस्तात मस्त व्हायला हवाय तर थायलंडशिवाय पर्याय नाही, का ते वाचा

पैसे किती न्यायचे?

पैसे किती न्यायचे हे तुमच्यावरच अवलंबून आहे. तुम्ही जर एखाद्या पर्यटन कंपनीसोबत फिरायला जात असाल, तर त्यांच्या पॅकेजची माहिती घ्या.

काही पर्यटन कंपन्या तिथे येणारा खर्च एकदमच तुमच्याकडून घेतात. त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष ठरलेल्या ठिकाणी गेल्यावर एकही पैसा खर्च करण्याची गरज पडत नाही. पण तुम्हाला जर काही खरेदी करायची असेल, अशा वेळी तुम्हाला पैशांची गरज पडेलच.

त्यामुळे थोडाफार विचार करून, हिशेब लावून तुम्ही आवश्यक तेवढी रक्कम सोबत ठेवू शकता. तुम्ही रोख रक्कम सोबत नेणार असाल, तर तुम्ही ज्या देशात जाणार आहात, तिथल्या चलनात ती आधीच रूपांतरित करून घ्या.

कोणत्याही बँकेत जाऊन, तिकीट दाखवून तुम्ही हे करू शकता. तुम्हाला जर तुमचं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरायचं असेल, तर भारतात असतानाच ते कार्ड इंटरनॅशनल वापरासाठी योग्य करून घ्या. बँकेत जाऊन अथवा ऑनलाइन पद्धतीनेही हे करता येऊ शकते.

वैयक्तिक काळजी काय घ्याल?

तुम्ही देशात फिरायला जा अथवा परदेशात जा, एक महत्त्वाची काळजी तुम्ही घ्यायलाच हवी, ती म्हणजे तुमच्या प्रकृतीची.

प्रवासाच्या काही काळ आधी आणि प्रवासादरम्यान अगदी गच्च जेवणे किंवा खूप खाणे टाळा. प्रवासाच्या काही दिवस आधी जागरण करू नका. जेणेकरून तुम्हाला प्रवासाचा आणि फिरण्याचा त्रास होणार नाही आणि मनसोक्त आनंद घेता येईल.

धकाधकीच्या जीवनातून विरंगुळ्याचे काही क्षण पर्यटनाच्या माध्यमातून आपण अनुभवतो. हे क्षण अधिक सुखकर आणि आनंददायक कसे होतील, याची काळजी आपण स्वतःच घ्यायला हवी. एका नव्या सुरुवातीसाठी अशी आल्हाददायक क्षणभर विश्रांती सर्वांनाच गरजेची आहे.

-----------------------

tourism tips
सातपुड्यात अनुभवा निसर्ग वैभवासह अहिराणी भाषेचा गोडवा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com