Screenplay
Screenplay sakal
साप्ताहिक

‘वक्त’ आणि ‘लम्हा’...

सुहास किर्लोस्कर suhass.kirloskar@gmail.com

चित्रपट बघताना पटकथेच्या दृष्टिकोनातून बघितल्यास चित्रपटांचा आस्वाद अधिक उत्तमरित्या घेता येतो आणि तो चित्रपट आपल्याला नेमका कोणत्या कारणामुळे आवडला किंवा आवडला नाही, याची कारणमीमांसा करता येते.

चित्रपटाची लांबी आणि चित्रपटातील घटनेचा/घटनांचा कालावधी यामध्ये फरक असतो. दोन तासांच्या चित्रपटामध्ये अनेक शतके एखाद्या समाजावर होत आलेला अन्याय आणि त्या पार्श्वभूमीवर काही जणांनी कसे बदल घडवून आणले हे दाखवता येते, अनेक वर्षांचे महायुद्ध/स्वातंत्र्यलढा दाखवता येतो.

‘कल आज और कल’सारख्या चित्रपटात तीन पिढ्यांची कथा सांगितली जाते. सर्वात मोठा कालखंड असलेली कथा दोन तासांत सांगणे, हे पटकथाकारासमोरचे आव्हान असते. बायोपिकमध्ये एखाद्याचे संपूर्ण आयुष्य दाखवायचे की निवडक घटना दाखवायच्या?

त्या व्यक्तीच्या आयुष्यातील अनेक घटनांपैकी कोणत्या कालखंडावर अधिक फोकस करावा? याबद्दल निर्णय घेऊन लिहिणे आणि दोन-अडीच तासांत जास्तीत जास्त वेळेचा अनुभव देणे, हे पटकथा लेखकाचे कौशल्य असते.

‘सिटीझन केन’ या चित्रपटामध्ये दीड तासात ४० वर्षांचा कालावधी दाखवला आहे. त्यापैकी डायनिंग टेबलवरच्या एका प्रसंगात नऊ वर्षांचा कालावधी उलटून गेल्याचे ३२ शॉट्सच्या मोन्टाजमधून दोन मिनिटांत दाखवले आहे.

केन (ओर्सन वेल्स) आपल्या पत्नीसह डायनिंग टेबलवर बसला आहे. तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना तो तिला किती वाजले असे विचारतो आणि त्यानंतर पुढच्या वाक्याला, काही वर्षे सरल्यानंतर, त्याची पत्नी उत्तर देते.

‘काल रात्री तुझी किती वाट बघितली’ या प्रश्नावर केन उत्तर देताच पुढील प्रत्येक वाक्याच्या वेळी दोघांचे वय वाढल्याचे दिसते, कपडे- केशभूषा- देहबोली बदलल्याचे जाणवते. नऊ वर्षांत त्या दोघांमधला संवाद थांबल्याचे आपल्याला दोन मिनिटांत दिसते. ओर्सन वेल्सने ‘काळ दाखवण्याचा’ फास्ट-फॉरवर्ड प्रयोग १९४१ सालीच केला होता, हे विशेष.

‘तारे जमीन पर’सारख्या चित्रपटात कथेचा कालावधी एका शैक्षणिक वर्षाइतका आहे. ‘कौन’ चित्रपटाची पूर्ण कथा एका रात्रीमध्ये घडते. ‘डोंबिवली फास्ट’ आणि तो चित्रपट ज्या चित्रपटावरून घेतला, तो मूळ मायकेल डग्लस अभिनित ‘फॉलिंग डाऊन’ चित्रपटासह ‘पॅनिक रूम’, ‘डाय हार्ड’, ‘फोन बूथ’, ‘इनसाईड मॅन’, ‘युनायटेड ९३’, ‘ट्वेल्व्ह अँग्री मेन’, ‘अ वेन्सडे’ अशा चित्रपटांचा कालावधी २४ तासांपेक्षा ही कमी आहे.

‘व्हँटेज पॉइंट’ चित्रपटात अमेरिकेच्या अध्यक्षांच्या खुनाचा प्रयत्न भर सभेमध्ये केला जातो. सभेमध्ये उपस्थित असणारे काही पोलिस आणि काही व्यक्ती त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. ही घटना २३ मिनिटांत घडते, परंतु एकच घटना वेगवेगळ्या व्यक्तींच्या दृष्टिकोनातून प्रेक्षकाला दिसते, आणि अखेरीस त्या कटाचे धागेदोरे व सूत्रधार सापडतो.

‘रन लोला रन’ चित्रपटामध्ये नायिका लोलापुढे वीस मिनिटांत तिच्या मित्रासाठी एक लाख जर्मन मार्क उभे करण्याचे आव्हान आहे. वीस मिनिटांत पैसे उभे करण्याच्या विविध शक्यता चित्रपटात दीड तासामध्ये दाखवल्या आहेत.

(‘रन लोला रन’चा परिणाम त्याचा रिमेक असलेल्या ‘लूप लपेटा’ला मात्र साधता आला नाही.) चित्रपटाची लांबी आणि चित्रपटकथेमधील वेळेचे गणित मांडून पटकथा लिहिणे आव्हानात्मक असते. त्याचप्रमाणे चित्रपटात कथेचा कोणता धागा केव्हा उलगडून दाखवायचा, हे गणितसुद्धा पटकथाकाराला मांडावे लागते.

Screenplay

‘डॉन’ चित्रपटात डॉनच्या गँगमध्ये नकली डॉनला सामील करण्याचा प्लॅन करणाऱ्या डीएसपीचा (इफ्तिकार) मृत्यू झाल्यानंतर आता या नकली डॉनचे काय होणार ही चिंता प्रेक्षकांना वाटते, तसेच नकली डॉन साकारणाऱ्या विजयलाही वाटते. ‘ये कमीना डॉन नही’ हे डॉनच्या गँगला कळते, पण पोलिसांना त्याची खात्री वाटत नाही.

त्यानंतर लाल डायरीचा मुद्दा विजयच्या (अमिताभ) ध्यानात येताच प्रेक्षकांना सुखद आश्चर्याचा धक्का बसतो आणि त्यांना वाटते की आता तरी निदान विजयची सुटका होईल (पटकथा - सलीम जावेद).

चित्रपटातील प्रत्येक प्रसंग कोणत्या वेळी, कोणत्या ठिकाणी घडणार आहे, त्या प्रसंगात चित्रपटातील कोणकोणती पात्रे हजर असतील, हे सर्व पटकथाकार ठरवतो. चित्रपटामध्ये पहिल्या पंधरा मिनिटांत काय घडेल, त्यानंतरच्या पंधरा मिनिटांत प्रेक्षकांना कशाबद्दल माहिती देणे आवश्यक आहे आणि कोणती माहिती प्रेक्षकांना पहिल्या अर्ध्या तासात कळू नये, शेवटच्या अर्ध्या तासात काय सांगायचे/दाखवायचे अशा सर्व बाबी, म्हणजेच कथेची उकल कशी करायची हे पटकथाकार ठरवतात.

‘जॉनी गद्दार’ चित्रपटात एकेक खून प्रेक्षकांनी बघितलेला असला, तरी चित्रपटातील इन्स्पेक्टर कल्याणला (झाकीर हुसेन) त्याची उकल एकेका प्रसंगातून होते आणि प्रेक्षक चित्रपटामध्ये गुंतून जातो, हे पटकथा लेखक श्रीराम राघवन यांचे कौशल्य आहे.

त्यांच्याच ‘एक हसीना थी’ चित्रपटामध्ये तुरुंगातील डॉन प्रमिला, नायिका सारिका वर्तकला (ऊर्मिला मातोंडकर) तुरुंगातून निसटण्याचा सल्ला देते. तुरुंगातून बाहेर पडून सारिकाने प्रमिलाच्या मदतीने नेमके काय करायचे ठरवले आहे, याबद्दल प्रेक्षकांना काहीच माहिती नसते. त्यानंतर एका वस्तीमधल्या घरात सारिकाला पिस्तूल, काडतुसे मिळतात.

आता नायिका काय करणार? हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात येणार हे पटकथाकार श्रीराम राघवन यांना माहीत असते. तरीही त्याची उकल केलेली नाही. वकिलाच्या घरात त्याला दम देऊन ‘करन कहाँ है?’ हा प्रश्न विचारल्यावर वकिलाकडून काय उत्तर मिळते हे प्रेक्षकांना सांगितलेले नाही आणि अचानक पोलिस व्हॅनमधून सीमा विश्वास उतरताना दिसते.

एवढी गर्दी जमली आहे, याचा अर्थ नेमके झाले काय याची उत्सुकता निर्माण झालेली असताना कारच्या टपावर मृतावस्थेतील वकील दिसतो आणि प्रेक्षक नायिकेच्या नियोजनबद्ध बदला घेण्याच्या पद्धतीला दाद देतात.

कोणती माहिती प्रेक्षकांना नियोजनपूर्वक उशिरा सांगावी, याला एक्सपोझिशन (Exposition) म्हणतात. ‘अ वेन्सडे’ या चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे ‘कॉमन मॅन’ (नसरुद्दीन शाह) पोलिस कमिशनरला (अनुपम खेर) प्रत्येक कॉलमध्ये एकेक माहिती ठरावीक अंतराने नियोजनपूर्वक पुरवतो, त्याचप्रमाणे पटकथा लेखक नीरज पांडे यांनी मोजके तपशील प्रेक्षकांना सांगितले आहेत.

बरीच माहिती प्रेक्षकांपासून लपवून ठेवल्यामुळे आणि काही वेळा प्रेक्षकांचे दुसरीकडे लक्ष वेधल्यामुळे चित्रपट पावणे दोन तास प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. ‘द युज्वल सस्पेक्ट’ या चित्रपटाची पटकथा या तंत्राचा वापर करून लिहिण्याचे आणखी एक उत्तम उदाहरण आहे, परंतु त्याबद्दल अधिक तपशील देणे अक्षम्य गुन्हा ठरेल.

चित्रपट हे दृश्य माध्यम असल्यामुळे ‘Show. Don’t tell’ हे तत्त्व अनेक उत्तम चित्रपटांत अत्यंत चतुराईने वापरले आहे. ‘अंधाधून’ चित्रपटात खेकड्याला खाण्यापूर्वी कसे मारायचे याबद्दल तब्बू सूचकतेने सांगते. नायकाचे (आयुष्मान खुराना) डोळे बादलीतल्या पाण्यातून प्रेक्षकांना दिसतात त्यावेळी तो एका डोळ्याने बघू शकतो, हे चाणाक्ष प्रेक्षकांना दिसते.

‘शटर आयलंड’ चित्रपटात आपल्याला दिसणाऱ्या घटनांपैकी टेडीला (लिओनार्दो) होणारे भास कोणते आणि त्याचे कारण काय, याबद्दल पटकथेचे एकेक पदर उलगडताना प्रेक्षकांना दाखवले आहे (सांगितलेले नाही).

Screenplay

अनेक चित्रपटांत प्रेक्षकांना नवीन माहिती पात्रांच्या संवादामधून सांगितली जाते, पण ती माहिती देण्यासाठीच तो प्रसंग लिहिला आहे, याचा प्रेक्षकांना सुगावा लागू दिला जात नाही. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटात इम्रान (फरहान अख्तर) आणि अर्जुन (हृतिक रोशन) यांच्यामधील तणावपूर्ण संबंध त्यांच्या भेटीमधून दिसतात, पण त्याचे कारण समजत नाही.

प्रवासात एका क्षणी चेष्टामस्करी करताना अर्जुनचा मोबाईल इम्रान चालत्या कारमधून बाहेर फेकून देतो. त्यावर अर्जुन संतापून म्हणतो, ‘मेरा फोन बाहर फेकना इज नॉट फनी, मेरी गर्लफ्रेंड के साथ इन्व्हॉल्व्ह होना इज नॉट फनी.’ हे वाक्य ऐकल्यावर दोघांच्या संबंधातील तणावाचे खरे कारण प्रेक्षकांना समजते (पटकथा - रिमा कागती, झोया अख्तर, संवाद - फरहान अख्तर).

कथेचा वेग कसा असावा याचा निर्णय पटकथा लेखक घेतात. ‘भोसले’ चित्रपटाचा वेग अत्यंत संथ आहे, कारण नायकाच्या (मनोज वाजपेयी) मनात जे विचार सुरू आहेत त्याचा अनुभव देण्याचा चित्रपटाचा प्रयत्न आहे.

‘बॉर्न आयडेंटिटी’ किंवा ‘कॅसिनो रॉयल’सारखे चित्रपट वेगवान आहेत. अशा चित्रपटांत पुढे काय होईल याचा विचार करण्याची उसंत प्रेक्षकांना दिली जात नाही. तरीही प्रेक्षक बऱ्याच वेळा चित्रपटकर्त्याच्या पुढे जाऊन विचार करतात.

त्यामुळे पटकथाकाराने कथेला वेगळेच वळण दिल्यानंतर प्रेक्षक आश्चर्यचकित होतात. काही दिग्दर्शक स्वतः पटकथा लिहितात किंवा त्यांच्या अपेक्षेनुसार लिहून घेतात. पटकथेमधील मजकुराला दिग्दर्शक दृश्य स्वरूप कसे देतो, हे महत्त्वाचे असते.

पटकथा लिहिताना कोणती गोष्ट आपण कोणत्या काळात सादर करतो आहोत, याचे भान राखणे गरजेचे असते. १९२० सालची गोष्ट १९७० साली ज्या पद्धतीने सांगितली गेली, त्याच पद्धतीने तीच गोष्ट २००० साली दाखवली जात नाही आणि तीच कथा २०२५ साली वेगळ्या पद्धतीने दाखवली जाईल.

Screenplay

शरदचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या कादंबरीवरून पहिला ‘देवदास’ चित्रपट १९२८ साली नरेश मित्रा यांनी दिग्दर्शित केला. दुसरा देवदास १९३५ साली के.एल. सैगल यांनी साकारला. १९५५ साली बिमल रॉय यांनी दिग्दर्शन केलेला दिलीपकुमारचा देवदास आला.

संजय लीला भन्साळी यांनी २००२ साली झगमगीत वातावरणात देवदास सादर केला. देवदास कादंबरीचे अभिनव रूप देवदास हे नाव नसलेल्या ‘प्यासा’, ‘मुकद्दर का सिकंदर’ या चित्रपटांत दिसले. अनुराग कश्यप यांनी ‘देव डी’ या चित्रपटातून देवदासकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघितले.

‘गुडविल हंटिंग’, ‘मसान’, ‘चक दे इंडिया’ अशा अनेक चित्रपटांची कथा काय आहे, यापेक्षा पटकथाकाराने कोणत्या काळातील कथा कोणत्या वर्षी, कशी सांगितली आहे हे महत्त्वाचे. गुलज़ार यांच्या भाषेत सांगायचे झाले, तर पटकथा लिहिताना ‘वक्त’ आणि ‘लम्हा’ या दोन्हीचा विचार केलेला असतो, परंतु आपल्याला ‘दास्ताँ’ दिसते, ‘लम्हा कहीं नहीं’!

Screenplay

शेक्सपिअरच्या ‘रोमियो जुलियट’वर आधारित कथा ‘वेस्ट साइड स्टोरी’, ‘एक दुजे के लिये’, ‘कयामत से कयामत तक’ अशा वेगवेगळ्या चित्रपटांच्या स्वरूपात सादर करताना त्या काळातल्या युवकांच्या मानसिकतेचा विचार केला जातो.

कारण सिनेमा हा व्यवसाय आहे. सहसा चित्रपट निर्माण करताना तो अनेकांनी बघावा अशी निर्माता-दिग्दर्शकाची इच्छा, अपेक्षा असते. प्रेक्षकांची मानसिकता समजून घेतल्याशिवाय व्यावसायिक यश मिळत नाही.

त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला त्या काळातल्या प्रेक्षकांची मानसिकता समजलेली आहे, असे ठामपणे सांगता येत नाही. एकूणच चित्रपट बघताना पटकथेच्या दृष्टिकोनातून बघितल्यास चित्रपटांचा आस्वाद अधिक उत्तमरित्या घेता येतो आणि तो चित्रपट आपल्याला नेमका कोणत्या कारणामुळे आवडला किंवा आवडला नाही, याची कारणमीमांसा करता येते.

(पटकथा कशी लिहिली जाते, कथेची थीम काय असते, त्यामधील पात्रांची रचना कशी करतात, पटकथेची गुंफण कशी केली जाते, असे पटकथा लेखनामधील बारकावे जाणून घेण्यामध्ये ‘कौन प्रवीण तांबे’, ‘ताऱ्यांचे बेट’, ‘सलाम’ अशा चित्रपटांचे पटकथा लेखक किरण यज्ञोपवीत यांनी मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचे आभार.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT