sant sadhana ji
sant sadhana ji esakal
साप्ताहिक

भेदविरहित भक्तीचा धागा, प्रबोधनाचे ‘उत्तर’पर्व

Pooja Karande-Kadam

डॉ. राहुल हांडे

महायोगी गोरक्षनाथ आणि भक्ती आंदोलनांच्या मधील संधीकाळात हिंदू-मुस्लिम ह्या भेदांना तिलांजली देत उत्तर भारतातील गंगाजमनी संस्कृतीच्या प्रारंभबिंदूंपैकी एक म्हणून आपण संत सधना यांच्याकडे पाहू शकतो.

इसवी सन ११८०. सिंध प्रांतातील सेहवान शरीफ गावात कसाई काम करणाऱ्या एका मुस्लिम कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला. डेरेदार वृक्षांच्या छायेत आणि पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी ह्या मुलाच्या वडिलांचे दुकान होते. वृक्षांची छाया आणि पाण्याची सोय यामुळे केवळ ग्राहकच नव्हे तर त्या मार्गावरून जाणारे पथिकदेखील ह्या दुकानाशेजारी विसाव्यासाठी थांबत. या पथिकांमध्ये काही साधू-संत असतं, तर काही ठगदेखील असत.

समाजातील प्रत्येक प्रवृत्तीचा परिचय ह्या लहान मुलाला होत होता. हा मुलगा किशोरावस्थेत पोहोचला तेव्हा त्यानं दुकानाभोवती त्याला आजवर भेटलेल्या व्यक्तींकडून जे जे काही स्वीकारले होते त्याचा प्रत्यय घरातील लोक आणि इतरांना येऊ लागला. हा किशोरवयीन मुलगा साधू-संतांमध्ये रमत होता. त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्यात रस घेत होता.

भविष्यात हा मुलगा सूफी-वैष्णव, सूफी-शीख आणि हिंदू-मुस्लिम यांना जोडणारा धागा म्हणून ओळखला जाणार होता. जरी त्याचा लौकिक जीवनप्रवास काळाच्या प्रवाहात व इतिहासाच्या अंधारात गाडला जाणार होता, तरी त्याच्या नंतरच्या अनेक संत-महात्म्यांच्या वचनांमधून हा कसायाचा मुलगा त्यांची प्रेरणा म्हणून तळपणार होता.

अनेक संत-महात्म्यांची प्रेरणा ठरलेला हा मुलगा म्हणजे संत सधना. संत सधना यांचा जन्म, बालपण आणि जीवनकार्य याविषयी आज कोणतीही नेमकी माहिती उपलब्ध नाही. मात्र उत्तर भारतात महायोगी गोरक्षनाथांनंतर आणि संतश्रेष्ठ नामदेवरायांच्या आगमनापर्यंतच्या संधीकाळात गीत-गोविंदकार जयदेव, लालदेद यांच्याप्रमाणेच आपल्या अस्तित्वानं काळोखाला प्रकाशित करणारे एक व्यक्तिमत्त्व संत सधना. त्यांच्या जीवनचरित्राविषयी पं. परशुराम चतुर्वेदींसारखे विद्वान संशोधक व अभ्यासकदेखील निश्चित असे विधान करत नाहीत.

पं. चतुर्वेदी यासंदर्भात म्हणतात, ‘संत सधनांच्या बाबतीत असे म्हटले जाते की ते एक अत्यंत प्राचीन संत होते. नामदेवांनी स्वतःच्या काव्यरचनेत त्यांचा उल्लेख केलेला आहे; परंतु मला संत नामदेवांची अशी कोणतीच प्रमाण रचना आढळली नाही, ज्यात संत सधनांची चर्चा करण्यात आली आहे. हे शक्य आहे, की ते नामदेवांच्या समकालीन असावेत अथवा नामदेवांच्या अत्यंत समीप असा त्यांचा जीवनकाळ असावा. त्यांच्या जन्मस्थानाविषयीदेखील निश्चित माहिती उपलब्ध होत नाही. एक सधना किंवा सधन हे सिंध प्रांतातील सेहवान शरीफ येथील निवासी होते.

मात्र काही अभ्यासकांच्या मते ते प्रसिद्ध संत सधना नसावेत. त्यांचा जीवनकाळ तेराव्या शतकातील अखेरच्या पर्वातील मानला तर ते नामदेवांच्या समकालीन ठरतात.’ यासोबतच शीख धर्माचे इतिहासकार व शीख धर्मग्रंथांचे अनुवादक अभ्यासक मॅक्स ऑर्थर मेकॉलिफ संत सधनांविषयी विवेचन करताना म्हणतात, ‘संत नामदेव आणि संत ज्ञानदेव यांच्या तीर्थयात्रेप्रसंगी त्यांची सधना यांच्याशी वेरूळच्या लेण्यांजवळ भेट झाली होती.

संत सधना यांनी नामदेव - ज्ञानदेव यांचे आदरातिथ्य केले आणि तीर्थयात्रेत काही काळ त्यांच्या समवेत सहभागीदेखील झाले.’ पं. परशुराम चतुर्वेदी असोत की मेकॉलिफ यांच्या विवेचनावरून एक गोष्ट लक्षात येते, की संत सधना यांचा कालखंड नामदेवांच्या आसपासचा असावा. तसेच अशा अभ्यासकांच्या मांडणीवरून संत सधना यांची ऐतिहासिक सत्यता सिद्ध होते.

संत सधना यांच्या जीवन प्रवासातील अनेक घटना-प्रसंगांचा उल्लेख हिंदी साहित्यात आणि उत्तर भारतीय लोकजीवनात आढळतो. हे सर्व घटना-प्रसंग प्रामुख्याने लोककथा अथवा दंतकथांच्या स्वरूपात आढळतात. त्यामुळे त्यामध्ये चमत्कारांचे बाहुल्यदेखील आढळते. कोणत्याही संतचरित्रात समाविष्ट करण्यात आलेल्या चमत्कारांचा उद्देश हा त्या संताची अढळ भक्ती आणि विशुद्ध आचरण समाजमानसावर प्रतिबिंबित करण्यासाठी असतो. मात्र यातून भक्ती व विशुद्ध आचरण हरवून जाते आणि फक्त चमत्कार शिल्लक राहतो, हेदेखील वास्तव आहे.

संत सधना यांच्या चरित्राविषयी नेमकी माहिती कोणी ठेवली नसली तरी त्यांच्या भक्तीचा प्रत्यय देणाऱ्या कथांची निर्मिती होत गेली. ह्या कथांमधून त्यांच्या चरित्राचे धागेदोरे जुळवत आधुनिक अभ्यासकांनी त्यांचे चरित्र रेखाटण्याचा काहीएक प्रयत्न केलेला दिसतो. संत सधनांच्या संदर्भात आज ज्या कथा आढळतात त्यामध्ये त्यांच्या कसाई व्यवसायाचा संदर्भ सुमारे सर्व कथांमध्ये आलेला दिसतो. पं. परशुराम चतुर्वेदी सेहवान शरीफचे असलेले सधना अथवा सधन हे संत वेगळे मानत असले तरी संत सधना हे कसाई व्यवसाय करणाऱ्या घरातील होते.

याला मान्यता देतात. त्यांच्या मतानुसार, ‘सधना जातीने कसाई होते, असे म्हणतात. मात्र ते स्वतः पशू हत्या करत नव्हते. इतर कसायांकडून मांस घेऊन ते त्याची विक्री करत असत. त्यांना पशूहत्येविषयी घृणा होती. असं असलं तरी आपल्या पिढीजात व्यवसायाचा त्यागदेखील करू शकत नव्हते.’

संत सधना यांचा व्यवसाय आणि भक्ती संदर्भात एक अत्यंत उद्बोधक कथा सांगितली जाते. सधना मांस विक्री करताना तराजूत जी वजने वापरत त्यामध्ये एक शाळिग्रामदेखील समाविष्ट होता. हा शाळिग्राम वजन अथवा माप म्हणून आपण वापरत आहोत याविषयी सधनांना काहीच कल्पना नव्हती. एक दिवस एक साधू त्यांच्या दुकानासमोर उभा होता. सधना वजन म्हणून शाळिग्राम वापरत आहेत हे ह्या साधूच्या लक्षात आले. शाळिग्रामाच्या वापराबाबत अनभिज्ञ असलेल्या सधना यांना साधूने शाळिग्रामाच्या वापरावरून चांगलेच फटकारले.

त्याने सधना यांच्याकडून शाळिग्राम मागून घेतला आणि आपल्या देवघरात नेऊन ठेवला. मात्र रात्री साधूला स्वप्नात दिसले, की शाळिग्रामाला त्याच्या देवघराऐवजी सधना यांच्या तराजूतच राहणे पसंत होते. अखेर सकाळी साधू शाळिग्राम घेऊन सधना यांच्याकडे गेला आणि त्यांना तो परत केला.

ह्या घटनेचा सधना यांच्यावर सखोल प्रभाव पडला आणि त्यांच्यामध्ये विरक्ती जागृत झाली. आपल्या प्रपंचाचा त्याग करत सधना यांनी जगन्नाथ पुरीचा मार्ग धरला. सधनांच्या जगन्नाथ पुरीच्या यात्रेतील अनेक कथा उत्तर भारतात प्रचलित आहेत. या कथांच्या ऐतिहासिक सत्यतेवर चर्चा शक्य असली तरी सधनांची भक्ती वादातीत असलेली दिसते.

डॉ.जॉर्ज ग्रियर्सन यांनी आपल्या संशोधनात संत सधना यांच्या नावानं उत्तर भारतात अस्तित्वात असलेल्या सधना पंथाचा उल्लेख केलेला आहे. मात्र ग्रियर्सन यांनी सांगितलेला सधना पंथ आणि संत सधना यांचा कालखंड ऐतिहासिक कसोटीवर टिकाव धरत नाही.

ग्रियर्सन यांनी सधना पंथाचे केंद्र काशी असल्याचे सांगितले आहे. त्याचे अनुयायी काशी परिसरात असल्याची माहितीदेखील दिलेली आहे. तसेच संत सधना यांचा कालखंड सतराव्या शतकातील असल्याचे प्रतिपादन केलेले आहे.

मात्र पं. परशुराम चतुर्वेदी त्यांचा हा दावा अमान्य करतात. त्यांच्या मतानुसार काशी परिसरात कुठेही सधना पंथाचे अस्तित्व आढळून येत नाही. तसेच कबीर साहेबांचे समकालीन संतश्रेष्ठ रविदास यांनी संत सधना यांचा उल्लेख आपल्या काव्य रचनांमध्ये केलेला आहे. रविदासांनी कबीर साहेब, संतश्रेष्ठ नामदेव यांच्यासोबतच संत सधना यांना एक महान भक्त म्हणून स्वीकार केलेला आणि त्यांची प्रशंसा केलेली दिसते.

रविदास आपल्या एका रचनेत म्हणतात, ‘नाम दैव, कबीर, त्रिलोचन, साधना सैं तराई। कहि रविदास सुनहु रे संतहु हर जी-ओ तै सभै सराय ।।’ याचा अर्थ नामदेव, कबीर, त्रिलोचन, सधना आणि सैन हे सर्व संत भवसागर तरून गेले. या संतांप्रमाणे प्रत्येक जण हा भवसागर तरून जाऊ शकतो. शीख गुरू अर्जुनदेव यांनी संपादित केलेल्या आदिग्रंथात म्हणजेच गुरू ग्रंथसाहिबमध्ये संत सधना यांच्या एका पदाचा अंर्तभाव केलेला आहे. त्यामुळे डॉ.ग्रियर्सन यांचे दोन्ही दावे सिद्ध होऊ शकत नाही.

नृप कन्निया कै करने इक भा-इ-आ भयख-धारी।

काम आरथी सुआरथी वा की पैज सवारी।।

तव गुन कहा जगत गुरा जा-ओ करम न नासै।

सिंह सरन कट जाए-ऐ जा-ओ जन्बुक गरासै।।१।।

अइक बुंद जल कारणय चात्रिक दुःख पावै।

परां गा-ए सागर मिलै मजा काम न आवै।।२।।

परां जो थकाय थिर नहीं कैसे बिरमावा-ओ।

बूड मू-ऐ-ना-उका मिलै कहो कहि चढावा-ओ।।३।।

माई नहीं कच्छ हा-ओ नहीं किछ आही न मोरा।

ए-ओसर लजा राख लइहो साधना जन तोरा।।४।।

संत सधना यांचे उपरोक्त पद हे गुरू ग्रंथसाहिबचे अंग ८५८ म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. रविदास यांच्या भजनानंतर गुरू ग्रंथसाहिबमध्ये हे पद येते. बिलावल रागामध्ये हे पद गायले जावे, असादेखील निर्देश देण्यात आलेला आहे. सधना यांच्या ह्या पदाला एका कथेचा संदर्भ असलेला दिसतो. ह्या कथेनुसार एका गरिबाच्या मुलाने नृपाच्या म्हणजे राजाच्या कन्येला मोहित करण्यासाठी विष्णूचा वेश धारण केला.

राजाच्या शत्रूने मोठ्या सैन्यासह त्याच्या राज्यावर आक्रमण केले. त्यावेळी राज्यकन्या म्हणाली, आपल्या सोबत साक्षात विष्णू आहे. त्यामुळे आपल्याला भय वाटण्याचे कारण नाही. तो आपले रक्षण करेल. ही गोष्ट ऐकताच विष्णूचा वेश धारण केलेला तिचा गरीब प्रियकर गर्भगळीत झाला. कारण त्याच्याकडे स्वतःचे रक्षण करण्याचेदेखील बळ नव्हते. तो विष्णूला शरण गेला आणि सर्व प्रजेला वाचविण्याची याचना केली.

विष्णूने त्याच्या याचनेवरून सर्व प्रजेसह त्याचेदेखील प्राण वाचवले. ह्या कथेचा धागा धरुन सधना परमेश्वराला म्हणतात, की या गरिबाच्या मुलाप्रमाणे एखादा आत्मा स्वेच्छाचारी आणि स्वार्थी झाला तरी तू त्याचे रक्षण करतो. मी तर तुझा निस्सीम भक्त आहे. माझे कर्म पाहून जर तू माझे रक्षण करणार नसशील, तर हे असेच झाले, की एखाद्याला कोल्हाच जर खाणार असेल तर त्याने सिंहाकडे रक्षणाची याचना का म्हणून करावी?

ज्याप्रमाणे चातक पावसाच्या केवळ एका थेंबासाठी तळमळतो, त्यावाचून त्याचे प्राण गेले, तर सागरदेखील त्याच्या कामाचा नाही. आता माझे प्राण थकले आहेत. माझ्याकडे अधिक काळ उरलेला नाही. हे परमेश्वरा, मला हा भवसागर तरून जाण्यासाठी नाव पाठवण्यास अधिक उशीर केला, तर नावेत चढण्याचे त्राण देखील माझ्यात उरणार नाहीत. भक्ताची तळमळ संत सधनांच्या प्रत्येक शब्दात व प्रत्येक रूपकात ओतप्रोत भरलेली दिसते.

संत सधना अथवा भगत साधना हे सूफी होते की वैष्णव होते की शीख धर्मानुसार ते गुरूमताचे अनुयायी होते अशा विविध शक्यतांबद्दल अनेक अभ्यासक व विद्वान तर्क-विर्तक करताना दिसतात. एक मात्र खरे की हिंदू-मुस्लिम-शीख यासर्वांना आपल्या निष्काम भक्तीने सांधणारे सधना होते. महायोगी गोरक्षनाथ आणि भक्ती आंदोलनांच्या मधील संधीकाळात हिंदू-मुस्लिम ह्या भेदांना तिलांजली देत उत्तर भारतातील गंगाजमनी संस्कृतीच्या प्रारंभबिंदूंपैकी एक म्हणून आपण संत सधना यांच्याकडे पाहू शकतो.

इसवी सन १३५०च्या सुमारास पंजाबातील सरहिंदमध्ये स्वतःसोबत इतरांच्या अवगुणांना छाटणारी सधना कसाई यांची भक्तीची धार असलेली सुरी कायमची शांत झाली. सरहिंदमधील भगत सधना यांची मशीद अथवा समाधी ही तिच्या अस्तित्वाची अखेरची निशाणी.

उत्तर भारतीय भक्ती आंदोलनांच्या धर्म-जात विरहित भक्ती संकल्पनेतील प्रारंभीचा धागा म्हणून संत सधना यांची नोंद घ्यावीच लागते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT