Women's Cricket
Women's Cricket Esakal
साप्ताहिक

Women's Cricket: भविष्यात भारतीय महिला विश्वकरंडकासह जल्लोष करताना दिसतील..

साप्ताहिक टीम

डब्ल्यूपीएलसारख्या व्यावसायिक स्पर्धेचा आवाका वाढत गेल्यास देशांतर्गत महिला क्रिकेटला लवकरच धुमारे फुटतील. डब्ल्यूपीएल खेळायचे हे ध्येय बाळगून कारकीर्द करण्याच्या उद्देशाने भविष्यात बीसीसीआयच्या महिला क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात मुली येतील यात दुमत नसावे.

किशोर पेटकर

जागतिक क्रिकेटमधील सर्वांत श्रीमंत आणि लोकप्रिय असलेल्या आयपीएल स्पर्धेच्या १७व्या आवृत्तीला २२ मार्चपासून सुरुवात होत आहे.

क्रिकेटमध्ये क्रांती घडवलेल्या पुरुषांच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेला २००८ साली सुरुवात झाली. या स्पर्धेने कितीतरी नवोदित भारतीय क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळवून दिले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकण्यासाठी ही स्पर्धा पथदर्शक ठरली.

आयपीएलच्या यशाने प्रेरित होऊन जगभरात फ्रँचाईजी संघ धर्तीवर क्रिकेट स्पर्धांना ऊत आला. आणखी एक नावाजलेली फ्रँजाईजी टी-२० स्पर्धा असलेल्या ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगला २०११-१२ मोसमात सुरुवात झाली. महिला क्रिकेटपटूंनाही संधी देताना ऑस्ट्रेलियात २०१५ साली महिला बिग बॅश लीगला प्रारंभ झाला.

इंग्लंडमध्ये २०२१पासून शार्लोट एडवर्ड्स कप स्पर्धा सुरू झाली. न्यूझीलंडमध्ये २००७पासून महिलांची सुपर स्मॅश स्पर्धा खेळली जाते. या पार्श्वभूमीवर भारतात व्यावसायिक क्रिकेटमध्ये महिला दुर्लक्षितच राहिल्या.

भारतात आयपीएलचा धमाका सुरू झाल्यानंतर महिलांसाठीही अशीच फ्रँचाईज संघांची व्यावसायिक लीग स्पर्धा असावी ही मागणी जोर धरू लागली. मात्र सुरुवातीस भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) याबाबतीत तेवढे गंभीर दिसले नाही.

आयपीएलचे १५ मोसम उलटल्यानंतर अखेर २०२३मध्ये देशात वूमन्स प्रीमियर लीगची (डब्ल्यूपीएल) मुहूर्तमेढ रोवली गेली.

भारतीय महिला क्रिकेटपटू व्यावसायिक लीगसाठी तयार आहेत का? याची चाचपणी करण्यात काही वर्षे गेली, मात्र गतवर्षीची डब्ल्यूपीएल पाहता, परदेशी व्यावसायिक महिला क्रिकेटपटूंसमवेत खेळताना भारतीय महिलाही क्रिकेट मैदानावर प्रगत असल्याचे दिसून आले.

भारतीय महिला क्रिकेटमधील दिग्गज मिताली राज, झुलन गोस्वामी यांच्या निवृत्तीनंतर डब्ल्यूपीएलचे व्यासपीठ सजले. गतवर्षीपासून भारतीय महिला क्रिकेटपटूंचे कौशल्य झळकू लागले आहे.

महिला क्रिकेटमध्येही आता आर्थिक ओघ सुरू झाला आहे. यावेळच्या डब्ल्यूपीएल लिलावात गुजरात जायंट्सने वीस वर्षीय काशवी गौतमसाठी दोन कोटी रुपये मोजले. ही खेळाडू नवोदित, कोणाला माहीतही नव्हती, मात्र लिलावानंतर प्रकाशझोतात आली.

दुर्दैवाने डब्ल्यूपीएल-२ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी दुखापत झाल्यामुळे काशवीला माघार घ्यावी लागली. यूपी वॉरियर्स या संघाने बॅटर वृंदा दिनेशला १.३ कोटी रुपयांच्या मोबदल्यात आपल्या संघात घेतले. थोडक्यात, केवळ नावाजलेल्या महिला क्रिकेटपटूंसाठीच नव्हे, तर नवोदित गुणवत्तासंपन्न महिलांना फ्रँजाईज संघ भाव देत आहे. हे चित्र आश्वासक आहे.

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेसह इतर देशातील प्रतिथयश खेळाडूंसमवेत मैदानावर खेळताना भारतीय महिला क्रिकेट बहरत आहे.

गतवेळच्या डब्ल्यूपीएल स्पर्धेतून श्रेयांका पाटील, तितास साधू, मिन्नू मणी, साईका इशाक या नवोदित खेळाडू प्रकाशमान झाल्या होत्या. त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्वही केले.

महिला क्रिकेटला नवी ओळख

मिताली राज, झुलन गोस्वामी या सफल महिला क्रिकेटपटूंच्या निवृत्तीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या नव्या दमाच्या भारतीय क्रिकेटपटू जोमाने झळकताना दिसत आहेत. सध्याच्या पिढीत कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा यांनी जागतिक क्रिकेटमध्ये यापूर्वीच ठसा उमटवलेला आहे.

लहान वयातच मोठी झेप घेतलेल्या भारतीय महिला क्रिकेटपटूंत शफाली वर्मा, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज यांचे क्रिकेट आक्रमक, सडेतोड. त्या धडाकेबाज, बिनधास्त फलंदाजीसाठी ओळखल्या जातात. जेमिमाचे क्षेत्ररक्षणातील चापल्य लाजवाब आहे. गतवर्षी जानेवारीत दक्षिण आफ्रिकेत झालेली पहिली १९ वर्षांखालील महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा भारतीय मुलींनी जिंकली.

अंतिम लढतीत त्यांनी इंग्लंडला पराभूत केले. या स्पर्धेतून भारताला श्वेता सेहरावत ही आक्रमक शैलीची बॅटर गवसली. गेल्या काही वर्षांत बीसीसीआय भारतीय महिला क्रिकेटकडे खूपच गांभीर्याने पाहताना दिसत आहे. पूर्वी काही शहरांत-राज्यांतच मर्यादित असलेली महिला क्रिकेट गुणवत्ता ग्रामीण पातळीवरही विकसित होताना दिसत आहे.

बीसीसीआयने पुरुषांच्या रणजी क्रिकेट स्पर्धेच्या धर्तीवर महिला क्रिकेटपटूंसाठी मल्टि-डे सामन्यांची स्पर्धा सुरू केलेली नाही. गतवर्षी महिलांच्या कसोटी क्रिकेटमध्ये भारतीयांनी घरच्या मैदानावर इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांना पाणी पाजले. त्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी आंतरराज्य मल्टि-डे स्पर्धेची आवश्यकता भासते.

यंदा विभागीय पातळीवर मल्टि-डे स्पर्धा होणार आहे. बीसीसीआयने २०२३-२४ मोसमापासून १५ वर्षांखालील आणि २३ वर्षांखालील स्पर्धाही सुरू केली आहे. १५ वर्षांखालील स्पर्धेमुळे देशातील महिला क्रिकेटचा पाया अधिकच भक्कम होण्याची आशा आहे.

डब्ल्यूपीएल या व्यावसायिक क्रिकेट स्पर्धेचा विचार करता, १५ वर्षांखालील अथवा १९ वर्षांखालील स्पर्धांतून महिला फ्रँजायची संघांना कच्ची, परंतु नैसर्गिक क्रिकेट गुणवत्ता हुडकणे निश्चितच शक्य होईल.

पाच संघांत चुरस

डब्ल्यूपीएल स्पर्धेत पाच संघांत चुरस आहे. गतवर्षी स्पर्धा मुंबईत झाली. यावेळी स्पर्धेचे दोन टप्पे आहेत. पहिला टप्पा बंगळूर येथे सुरू झालेला आहे, त्यानंतर महिलांचे व्यावसायिक क्रिकेट नवी दिल्लीत अवतरेल.

१७ मार्च रोजी अंतिम सामना होईल, त्यानंतर लगेच पुरुषांची आयपीएल स्पर्धा सुरू होत आहे. यापुढेही आयपीएल स्पर्धेपूर्वी डब्ल्यूपीएल स्पर्धा घेण्याचे बीसीसीआयचे नियोजन कायम राहू शकते. गतवर्षी हरमनप्रीतच्या मुंबई इंडियन्सने शुभारंभी डब्ल्यूपीएल जिंकली. अंतिम लढतीत त्यांनी दिल्ली कॅपिटल्सवर मात केली.

गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूर, यूपी वॉरियर्स हे डब्ल्यूपीएलमधील अन्य संघ आहेत. आयपीएल स्पर्धेत १० संघ आहेत. त्यापैकी मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळूर या फ्रँचाईजींनीच महिलांच्या प्रीमियर लीगमध्ये गुंतवणूक केली आहे.

महिलांच्या क्रिकेटमध्ये इतर व्यावसायिक संघांनी मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केल्यास देशातील महिलांना क्रिकेट मैदानावर आणखी मोठे व्यापक व्यासपीठ मिळेल हे स्पष्टच आहे.

महिलांचे क्रिकेट निरस असते असे मानणारा एक वर्ग आहे. तथापि, डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या आवृत्तीत सुरुवातीचे काही सामने खूपच उत्कंठावर्धक झाले, त्यामुळे महिला क्रिकेटही आकर्षक आणि रोमांचक असल्याचे प्रमाणपत्रच मिळाले.

यावेळच्या पहिल्याच लढतीत दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला दिलेले १७२ धावांचे आव्हान त्यांनी यशस्वीपणे पेलले. संजीवन सजनाने पहिल्याच चेंडूंवर आक्रमक शैलीत षटकार खेचत मुंबईला विजय मिळवून दिला.

भारतीय महिला क्रिकेट आता कचरत नाही याचे प्रमाण त्या षटकाराद्वारे मिळाले. आशा सोभनाने यूपीविरुद्ध पाच गडी टिपत बंगळूरला विजयी केले. सजना, आशा यांची नावे फारशी माहीत नव्हती, पण डब्ल्यूपीएलमुळे आता अशा अनोळखी नावांना संधी मिळत आहे.

या व्यावसायिक स्पर्धेचा आवाका वाढत गेल्यास देशांतर्गत महिला क्रिकेटला लवकरच धुमारे फुटतील. डब्ल्यूपीएल खेळायचे हे ध्येय बाळगून कारकीर्द करण्याच्या उद्देशाने भविष्यात बीसीसीआयच्या महिला क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात मुली येतील यात दुमत नसावे.

आंतरराष्ट्रीय यशाची संधी

डब्ल्यूपीएलद्वारे भारतीय क्रिकेटपटूंचा दर्जा प्रगल्भ होण्यास मदत होईल. भारतीय महिला संघाने विश्वकरंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेली आहे, पण विजेतेपद अद्याप मिळालेले नाही.

त्यांना एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडकात २००५ व २०१७मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. टी-२० विश्वकरंडकातही २०२० साली अंतिम लढतीत अपेक्षित निकाल मिळाला नाही.

भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी डब्ल्यूपीएल आंतरराष्ट्रीय संधी आहे. कदाचित भविष्यात भारतीय महिला विश्वकरंडकासह जल्लोष करताना दिसतीलही. गतवर्षी १९ वर्षांखालील महिला विश्वकरंडक जिंकून भारतीय महिलांनी ताकद दाखवून दिलेली आहेच.

-------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Income: रिझर्व्ह बँकेने केली 2 लाख कोटींहून अधिक कमाई; RBI पैसे कसे कमावते?

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Ebrahim Raisi: मौलवी कुटुंबात जन्म ते इराणचे अध्यक्ष, जाणून घ्या इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेपासून महिलांपर्यंतची मते

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

SCROLL FOR NEXT