women cricket :भविष्यात भारतीय क्रिकेटर महिला विश्वकरंडक जिंकण्याची स्वप्नपूर्ती होणार?

पुरुषांच्या तुलनेत भारतात महिला क्रिकेटची फारशी चर्चा होत नाही, मात्र आता चमकदार कामगिरीमुळे महिला क्रिकेटपटू लक्ष वेधू लागल्या आहेत.
India Woman Cricket Team
India Woman Cricket Teamesakal

भारताच्या महिला क्रिकेट संघाने अजून विश्वकरंडक जिंकलेला नाही. एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत त्यांना २००५ व २०१७मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर टी-२० स्पर्धेत २०२० साली अंतिम लढत जिंकता आली नाही.

आता वूमन्स प्रीमियर लीग, देशांतर्गत महिला क्रिकेटला मिळणारे व्यापक व्यासपीठ यांचा विचार करता, भविष्यात भारतीय महिला विश्वकरंडक जिंकण्याची स्वप्नपूर्ती करू शकतील.

किशोर पेटकर

वूमन्स प्रीमियर लीग, देशांतर्गत महिला क्रिकेटला मिळणारे व्यापक व्यासपीठ यांचा विचार करता, भविष्यात भारतीय महिला विश्वकरंडक जिंकण्याची स्वप्नपूर्ती करू शकतील.

पुरुषांच्या तुलनेत भारतात महिला क्रिकेटची फारशी चर्चा होत नाही, मात्र आता चमकदार कामगिरीमुळे महिला क्रिकेटपटू लक्ष वेधू लागल्या आहेत.

वूमन्स प्रीमियर लीगचा पहिला मोसम सफल ठरल्यानंतर आता दुसऱ्या लीगचे वेध लागले आहेत. नवोदित, प्रकाशझोतात नसलेल्या भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी फ्रँचायसींनी घसघशीत रक्कम मोजली.

या पार्श्वभूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय महिलांनी सातत्य राखताना दोन प्रबळ संघांना पाणी पाजले.

भारतीय महिला क्रिकेट संघ तुलनेत कसोटी सामने फारच कमी खेळतो, जास्त भर एकदिवसीय व टी-२० सामन्यांवर असतो. दीर्घ कालावधीनंतर कसोटी क्रिकेट खेळताना नवोदित खेळाडूंचा भरणा असूनही संघाने सलग विजय मिळवले. त्यामुळे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ कौतुकास पात्र ठरतो.

नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर अनुभवी इंग्लंडचा ३४७ धावांनी धुव्वा उडविल्यानंतर भारतीय महिलांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर अलिसा हिलीच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाला आठ विकेट राखून नमविले.

ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेटमध्ये दबदबा आहे. त्यांनी टी-२० विश्वकरंडक सहा वेळा, तर एकदिवसीय सामन्यांचा विश्वकरंडक सात वेळा जिंकलेला आहे. ऑस्ट्रेलियातील महिलांची लीग सर्वोत्तम मानली जाते.

या अनुषंगाने त्या संघावर भारतीय संघाने नोंदविलेला कसोटी विजय लक्षवेधक आहे. भारताच्या क्रिकेटपटू केवळ झटपट क्रिकेटमध्ये नव्हे, तर कसोटी क्रिकेटमध्येही तरबेज आहेत, हे लागोपाठच्या दोन विजयांमुळे सिद्ध झाले आहे.

India Woman Cricket Team
Women Cricket : महिला क्रिकेट संघासाठी उद्या सन्मानाची लढाई; एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाशी लढणार

संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिलांनी इंग्लंड व ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसदार खेळ केला.

जेमिमा रॉड्रिग्ज, रेणुकासिंग ठाकूर, शुभा सतीश, रिचा घोष या खेळाडू कसोटी पदार्पण करत असल्याचे त्यांच्या आत्मविश्वासावरून जाणवले नाही. मुंबईचे माजी कर्णधार अमोल यांनी संघाला बिनधास्त खेळाचा मंत्र दिला.

खेळाडूंनी कोणतेही दडपण न घेता मार्गदर्शकाच्या सूचनेनुसार खेळ करून दोन बलाढ्य संघांना लोळविले.

अमोल प्रथम श्रेणी क्रिकेट भरपूर खेळले, पण १९९०च्या दशकात भारतीय संघाची फलंदाजी भक्कम असल्याने त्यांना अफाट गुणवत्ता असूनही एकही कसोटी सामना खेळायला मिळाला नाही. ही भारतीय क्रिकेटमधील शोकांतिकाच मानली जाते.

आता प्रशिक्षक या नात्याने अमोल सारा अनुभव प्रत्यक्षात आणत असल्याचे महिला क्रिकेट संघाच्या धडाकेबाज कामगिरीने दिसून आले.

१९७७मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय महिला संघाचा पहिला सामना झाला होता. सुमारे ४७ वर्षांनंतर भारतीयांनी ऑसी संघाविरुद्ध पहिल्या विजयाची चव चाखली.

जानेवारी २०१४मध्ये इंग्लंडविरुद्ध पराभव स्वीकारल्यानंतर ऑस्ट्रेलियाने कसोटी सामना गमावला नव्हता. त्यांची ही मालिका हरमनप्रीतच्या संघाने खंडित केली.

India Woman Cricket Team
Pro Kabaddi League : प्रो कबड्डी लीगच्या 10 व्या हंगमासाठी 'या' दिवशी होणार लिलाव

शानदार अष्टपैलू खेळ

इंग्लंड व ऑस्ट्रेलिया महिला कसोटी क्रिकेट संघाविरुद्धच्या भारताच्या यशस्वी कामगिरीवर नजरा टाकता, शानदार अष्टपैलू खेळ श्रेष्ठ ठरल्याचे दिसून येते. मान्य की, ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघ सध्या संक्रमणातून जात आहे, पण त्यांचे खेळाडू पक्के व्यावसायिक आहेत.

दीर्घकालीन कर्णधार मेघ लॅनिंगच्या निवृत्तीनंतर आता ऑस्ट्रेलियाच्या संघाला आता अलिसा हिली ही नवी कर्णधार लाभली आहे.

अलिसा दीर्घानुभवी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने पहिल्या डावात चारशे धावांचा डोंगर रचला. तुलनेत ऑस्ट्रेलियाला दोन्ही डावात तीनशे धावांचा टप्पा गाठता आला नाही. भारतीय गोलंदाजांचे हे मोठे यश आहे.

स्नेह राणाने दोन्ही डावांत मिळून सात विकेट टिपल्या. तिची परिणामकारक फिरकी गोलंदाजी भारताच्या विजयात निर्णायक ठरली. मध्यमगती पूजा वस्त्रकार यांनी अष्टपैलूत्व सिद्ध केले. रिचा घोषने पदार्पणात अर्धशतक नोंदवून निवड सार्थ ठरविली.

दीप्ती शर्मा व पूजा वस्त्रकार यांनी पहिल्या डावात आठव्या विकेटसाठी केलेली शतकी भागीदारी लाखमोलाची ठरली. स्मृती मानधनाची फलंदाजीही बहरली. त्यामुळे संघाचे बळ आणखीनच वाढले.

हरमनप्रीतने फलंदाजीबरोबरच ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या टप्प्यात दोन महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केल्या. शेफाली वर्मानेसुद्धा नेहमीप्रमाणे आक्रमकता दाखविली. यष्टिरक्षक यास्तिका भाटियाने जबाबदारी चोख पेलली.

एकंदरीत अष्टपैलू कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे शक्य झाले. त्याअगोदर, दीप्ती शर्माच्या भेदक फिरकीसमोर इंग्लंडच्या महिला संघाने नवी मुंबईत साफ नांगी टाकली होती. भारताने पहिल्या डावात ४२८ धावांचा डोंगर रचला.

याउलट इंग्लंडला अनुक्रमे १३६ व १३१ धावाच करता आल्या. दीप्तीच्या फिरकीचा सामना करणे इंग्लिश महिलांना कठीण गेले. या फिरकी गोलंदाजाने पहिल्या डावात अवघ्या सात धावांत पाच विकेट टिपल्या, तर दुसऱ्या डावात ३२ धावांत चौघींना माघारी धाडले.

भारताच्या या लागोपाठच्या कसोटी विजयामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) महिला संघांसाठी अधिकाधिक कसोटी सामन्यांचे नियोजन करू शकेल.

इंग्लंड व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कामगिरीने कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडेही निश्चितच आदराने पाहिले जाईल.

India Woman Cricket Team
Rahul Dravid : वर्ल्डकपनंतरची नवी आव्हाने... मुदतवाढ मिळाल्यानंतर राहुल द्रविड BCCI बद्दल नेमकं काय म्हणाला?

महिला क्रिकेटमध्ये नवी गुणवत्ता

काही वर्षांपूर्वी, भारतीय महिला क्रिकेटमध्ये काही मोजकीच नावे झळकत होती. आता नव्या मुली भन्नाट क्रिकेट खेळताना दिसत आहेत.

त्यामुळे संघातील जागेसाठी मोठी चुरस अनुभवायला मिळतेय. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यांच्या मालिकेत श्रेयांका पाटील, साईका इशाक, तितास साधू यांची कामगिरी लक्षणीय ठरली. त्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संधी मिळाली.

डावखुरी इशाक व ऑफब्रेक श्रेयांका यांची फिरकी इंग्लिश महिलांना खेळणे कठीण ठरले होते. नव्या सफल फिरकी चेहऱ्यांमुळे राजेश्वरी गायकवाडची अनुभवी फिरकी फक्त कसोटीत वापरली गेली. झटपट क्रिकेटमध्ये दीप्ती शर्मा व स्नेह राणा या अनुभवी फिरकी गोलंदाजांनी सातत्यावर भर द्यावा लागेल, कारण नव्या गुणवान मुली रांगेत उभ्या आहेत.

बीसीसीआयने महिला क्रिकेटच्या कक्षा विस्तारल्या आहेत. सीनियर महिलांसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये टी-२० व एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धा घेताना आता २३ वर्षांखालील वयोगटाचाही समावेश करण्यात आला आहे.

ज्युनिअर पातळीवर १९ वर्षांखालील स्पर्धा असून त्यात १५ वर्षांखालील वयोगटाचीही भर पडली आहे. वूमन्स प्रीमियर लीग मूळ धरत आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंडनंतर आता भारतातही महिलांसाठी व्यावसायिक लीग लक्ष वेधू लागलीय.

वूमन्स प्रीमियर लीगच्या दुसऱ्या मोसमासाठी लिलावात गुजरात जायंट्स संघाने अनोळखी काशवी गौतमसाठी तब्बल दोन कोटी रुपये मोजले.

यूपी वॉरियर्स संघाने १.३ कोटी रुपये दिलेली वृंदा दिनेश ही खेळाडूही भारतीय महिला क्रिकेटमध्ये नवोदित आहे.

भारताच्या महिला क्रिकेट संघाने अजून विश्वकरंडक जिंकलेला नाही. एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत त्यांना २००५ व २०१७मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर टी-२० स्पर्धेत २०२० साली अंतिम लढत जिंकता आली नाही.

आता वूमन्स प्रीमियर लीग, देशांतर्गत महिला क्रिकेटला मिळणारे व्यापक व्यासपीठ यांचा विचार करता, भविष्यात भारतीय महिला विश्वकरंडक जिंकण्याची स्वप्नपूर्ती करू शकतील.

--------------------

India Woman Cricket Team
Women T-20 Cricket : भारतीय महिला संघ पहिल्या टी-२० सामन्यात लढणार ऑस्ट्रेलियाशी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com