पुणे, ता. १४ : राज्यांच्या सीमांवरील तपासणी नाक्यांमुळे इंधनाचा अपव्यय, वाहतूक कोंडी आणि लॉजिस्टिक खर्चात वाढ होत असून, आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे देशभरातील नाके तातडीने रद्द करावेत, अशी मागणी ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट काँग्रेसचे माजी अध्यक्ष बल मलकीत सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी नमूद केले आहे, की वस्तू व सेवाकर (जीएसटी) अंमलबजावणीनंतर तसेच डिजिटल तंत्रज्ञानाधारित तपासणी व्यवस्था विकसित झाल्यानंतर सध्याचे राज्य सीमा तपासणी नाके कालबाह्य ठरले आहेत. अनेक राज्यांनी तपासणी नाके बंद केले असले, तरी महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, बिहार, नागालँड, मणिपूर, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, केरळ, पुदुचेरी आणि तमिळनाडू राज्यांमध्ये अद्यापही ते सुरू आहेत. या तपासणी नाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात इंधन वाया जात असून वाहतूक कोंडी, आर्थिक नुकसान, लॉजिस्टिक खर्चात वाढ, पर्यावरण प्रदूषण आणि मनुष्यबळाचा अपव्यय होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः भारताच्या परकीय चलन साठ्यावरही याचा विपरीत परिणाम होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
केंद्र सरकारने देशभरातील राज्य सीमा तपासणी नाके रद्द करण्यासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, तंत्रज्ञानाधारित अंमलबजावणी प्रणाली स्वीकारण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन द्यावे, तसेच अखंड आंतरराज्य वाहतूक सुलभ करण्यासाठी आवश्यक कायदे आणि धोरणात्मक सुधारणा कराव्यात, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
महाराष्ट्रात दरमहा ८१० कोटींचे नुकसान :
महाराष्ट्रात दररोज सुमारे ९० हजार वाहने सीमा नाक्यांवरून ये-जा करतात. रांगेत उभे राहिल्यामुळे प्रत्येक वाहनाचे सरासरी तीन लिटर इंधन वाया जाते. यानुसार राज्यात दररोज २७ कोटी, तर महिन्याला तब्बल ८१० कोटी रुपयांच्या इंधनाचा अपव्यय होत असल्याचा दावा सिंग यांनी पत्रात केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.