अहिल्यानगर जिल्ह्यात कारखान्यांनी
जाहीर केलेला दर संघटनांना अमान्य
पुतळे जाळून निषेध; तीव्र आंदोलनाचा इशारा
अॅग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर ः ऊसदरावरून अहिल्यानगर जिल्ह्यात संघर्ष सुरूच आहे. पालकमंत्री आणि प्रशासनाच्या उपस्थितीत झालेल्या बैठकांमध्ये तोडगा न निघाल्याने काही कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली, तर काहींनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले. मात्र, जाहीर केलेला दर अमान्य करत कोल्हापूरच्या धर्तीवर दर देण्याच्या मागणीसाठी शिवसेना शेतकरी सेनेच्या कार्यकर्त्यांनी कारखानदारांचे पुतळे जाळून निषेध केला.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला, तरी अद्याप ऊसदर जाहीर झालेला नाही. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून एकदा, तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत दोनदा बैठका झाल्या. मात्र या बैठकांकडेच साखर कारखानदारांनी पाठ फिरवली. कारखान्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकीला उपस्थित राहावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी देऊनही कोणीही फिरकले नाही. त्यामुळे शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी संताप व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली. ऊसदरासाठी राहुरी येथे दोनदा, तर नेवासा फाटा येथे एकदा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मात्र तरीही कारखानदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. अखेर संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने सर्वप्रथम ३२०० रुपये पहिली उचल जाहीर केली. काही कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा केल्याची माहिती आहे. मात्र त्याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
गेल्या वर्षीपेक्षा यंदा साखरेला एक हजार रुपये अधिक दर मिळत आहे. मग उसाला दर का देत नाहीत? कोल्हापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील उसाच्या साखर उताऱ्यात एवढा फरक पडतो का? अहिल्यानगर जिल्ह्यात साखर उतारा चोरला जात असून, शेतकऱ्यांना पैसे मिळू न देता कारखानदार मनमानी करत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी केला आहे.
साखर कारखानदार, प्रशासन आणि सरकार शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत आहे. यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. उसाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यात कारखानदार दर न देता शेतकऱ्यांची फसवणूक व छळवणूक करत आहेत. त्यामुळे हा दर मान्य नाही. कोल्हापूरच्या धर्तीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी दर द्यावा, यासाठी सर्व शेतकरी संघटनांकडून आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवी मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब फटांगरे आदींनी सांगितले.
साखर कार्यालयाची भूमिका काय?
अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्याप ऊसदर जाहीर केलेला नाही. त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून, काही कारखान्यांनी जाहीर केलेले दर अमान्य करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. या संघर्षात प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाची भूमिका काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारखाने पुरेसा दर देत नसतील, तर हे कार्यालय कोणती प्रशासकीय कारवाई करू शकते? तसेच कार्यालयाने कारखानदारांच्या की शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, हे स्पष्ट करावे, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.