PNE26W19250
अक्कलकोट : येथील २४८७ कोटींच्या पाच कामांच्या भूमिपूजनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. याप्रसंगी खासदार प्रणिती शिंदे, खासदार ज्योती वाघमारे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजय देशमुख आदी.
जुना पूना नाका ते बोरामणी नाका उड्डाणपुलासाठी एक हजार २० कोटी
केंद्रीय मंत्री गडकरी यांची घोषणा; अक्कलकोट येथे २ हजार ४८७ कोटींच्या कामांचे भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
अक्कलकोट, ता. १४ : येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २४८७ कोटींच्या पाच कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी गडकरी यांनी अहिल्यानगर ते सोलापूर रस्ता चौपदरीकरणासाठी ११०० कोटी, जुना पूना नाका ते बोरामणी नाका उड्डाणपुलासाठी एक हजार २० कोटी, तसेच अहिल्यानगर-सोलापूर-अक्कलकोट या २२२ किलोमीटरच्या रस्त्यासाठी १० हजार कोटींसह विविध विकासकामांची घोषणा केली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातर्फे आयोजित कार्यक्रमास कर्नाटक राज्य धोरण व नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष बी. आर. पाटील, खासदार ज्योती वाघमारे, खासदार प्रणिती शिंदे, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजय देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजू खरे, आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, माजी आमदार राजन पाटील, महापौर विनायक कोंड्याल, शहाजी पवार, अविनाश महागावकर, अमोलराजे जनमेजयराजे भोसले, महेश इंगळे, नगराध्यक्ष मीलन कल्याणशेट्टी, भाजप अक्कलकोट मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील, महेश हिंडोळे, यशवंत धोंगडे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, माजी आमदार राजेंद्र राऊत, राम सातपुते, मैंदर्गी नगराध्यक्ष अंजली बाजारमठ आदी उपस्थित होते.
आमदार कल्याणशेट्टी यांनी भाषणात अक्कलकोट तालुक्याला सहा राष्ट्रीय महामार्ग जोडले गेल्याचे सांगितले. श्री स्वामी समर्थांच्या पवित्र भूमीला रस्त्यांचे चांगले नेटवर्क मिळाल्याने अनेक क्षेत्रांत अक्कलकोटचा विकास होत असल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी त्यांनी अक्कलकोट-दुधनी-गाणगापूर रस्त्याची पुनर्बांधणी, वळसंग-तांदुळवाडी रस्ता मंजूर करणे तसेच सोलापूर शहरासाठी रिंगरोडची मागणी केली. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी या सर्व मागण्या मंजूर केल्या.
यावेळी गडकरी म्हणाले, ‘‘येणाऱ्या काळात विकासाची भूक असली पाहिजे. पर्यटन क्षेत्रात निवास व्यवस्था, हॉटेल व रेस्टॉरंट दर्जेदार उभारण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. पर्यटन वाढल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊ शकतो. मला माझ्या पक्षाचा अभिमान आहे; मात्र विकासाच्या कामात राजकारण करू नये. माणूस गुणाने मोठा व्हावा.’’
खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, ‘‘विरोधकांना सन्मान देऊन त्यांची कामे करणारे आदर्श केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत. ते मुख्यमंत्री झाले असते, तर पुरोगामी महाराष्ट्र टिकला असता. बायपास मार्गाची मागणी पूर्ण केल्याबद्दल त्यांचे आभार.’’
चौकट
या प्रकल्पांचे झाले भूमिपूजन
विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमात एकूण १७१ किलोमीटर लांबीच्या आणि तब्बल २७८४ कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये हसापूर ते बडदाल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १५० (सी) च्या ग्रीनफिल्ड अलाइनमेंटच्या सहापदरीकरणाचा १५५२ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, वागदरी-अक्कलकोट-तोळणूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ (बी) चे पेव्हड शोल्डरसह दुपदरीकरण, मोहोळ-बसवनगर-वळसंग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४६५ चे पेव्हड शोल्डरसह दुपदरीकरण, दुधनी येथील रेल्वे उड्डाणपूल, राष्ट्रीय महामार्ग १५० ई चे उन्नतीकरण व दर्जोन्नतीकरण (प्रकल्प खर्च ९७ कोटी) तसेच राष्ट्रीय महामार्ग १५० ई वरील बोरी उमरगे येथील बोरी नदीवरील मोठ्या पुलाचे बांधकाम (प्रकल्प खर्च २६ कोटी) आदी प्रकल्पांचा समावेश आहे.
चौकट
श्रेयावरून डिजिटल वॉर
मोहोळ-बसवनगर-वळसंग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४६५ च्या पेव्हड शोल्डरसह दुपदरीकरणाच्या कामावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये डिजिटल वॉर पाहायला मिळाले. भाजपने या भूमिपूजन कार्यक्रमाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या छायाचित्रांसह डिजिटल फलक लावले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने खासदार प्रणिती शिंदे यांच्या छायाचित्रांसह डिजिटल लावून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.