AKK26B05905
मिलन कल्याणशेट्टी
विशेष मुलाखत
शिर्डीच्या धर्तीवर अक्कलकोट तीर्थक्षेत्राचा विकास करणार
नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी; शहराचा विकास हाच कामाचा केंद्रबिंदू
चेतन जाधव ः सकाळ वृत्तसेवा
अक्कलकोट, ता. २४ ः अक्कलकोट नगरपालिकेवर भाजपची निर्विवाद सत्ता असून एकूण २५ नगरसेवकांपैकी २२ नगरसेवक भाजपचे निवडून येऊन एकहाती सत्ता भाजपने मिळवली व विक्रमी मताधिक्याने थेट नगराध्यक्षपदी मिलन कल्याणशेट्टी ही निवडून आले आहेत. युवा व उच्चशिक्षित नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्याकडून अक्कलकोट शहरवासीयांना मोठ्या अपेक्षा आहेत त्या पार्श्वभूमीवर त्यांची ही विशेष मुलाखत.
१) तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहराच्या विकासाबाबत आपले काय विचार आहेत?
श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेले तीर्थक्षेत्र अक्कलकोट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोटचा तीर्थक्षेत्र शिर्डीच्या धर्तीवर विकास करण्याचा मानस असून देशभरातून येणाऱ्या भक्तांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखडा लवकरच राबविण्यात येणार असून त्याद्वारे शहराचा मोठ्या प्रमाणावर विकास होऊन आध्यात्मिक पर्यटनक्षेत्र म्हणून देशभरात अक्कलकोटचे नाव उज्वल करण्याचा प्रयत्न करणार आहे. शहराचा विकास केंद्रबिंदू मानून शहराच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहीन याची मी ग्वाही देतो.
२) शहरातील तीव्र पाणीटंचाईविषयी काय उपाययोजना करणार व शहरातील नागरिकांना मुबलक पाणी कसे देणार?
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी अमृत-२ ही योजना मंजूर करून आणली आहे. त्यासाठी ७५ कोटींचा निधी मिळाला असून या योजनेचे काम जलद गतीने शहरात सध्या सुरू आहे. शहरातील अंतर्गत जलवाहिनी खराब झाली असून त्या ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. पाण्याची गळती कमी होऊन शहरातील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. तसेच शहरात अनेक जलकुंभ(पाण्याच्या टाक्या) पूर्ण झाले असून त्यामुळे पाणी साठवणूक क्षमतेमध्ये वाढ होऊन शहरातील नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी लवकरच मिळेल. यासाठी माझा सतत पाठपुरावा असेल. तसेच सांगवी ते अक्कलकोट जलशुद्धीकरण केंद्रासाठी नवीन योजना मंजूर झाली असून त्याचे काम लवकर सुरू होईल.
३) तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहरात कोणती विकासकामे सुरू आहेत?
आ.सचिन कल्याणशेट्टी यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणलेला असून अनेक कामे सुरू आहेत. त्यातील प्रामुख्याने भुयारी गटारीसाठी १४७ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून भुयारी गटारीचे काम सध्या शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसेच मंगरुळे चौक ते कारंजा चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते बेडरकन्हैया चौक हे दोन्ही मोठे रस्ते सध्या पूर्णत्वाच्या मार्गावर असून यामुळे वाहतूक सुलभ होणार आहे.
४) अक्कलकोटमध्ये देशभरातील भक्तांच्या वाहनांची गर्दी होते. त्यामुळे पार्किंग समस्येवर काय उपाययोजना करणार आहात?
शहरात सध्या श्रीमंत कमलाराजे चौक, श्री मल्लिकार्जुन मंदिर परिसर व कारंजा चौक येथे पार्किंगची सुविधा करण्यात आलेली आहे. तसेच वाढत्या वाहनांमुळे पार्किंगसाठी बासलेगाव रोड, मैंदर्गी रोड तसेच हद्दवाढ भागात नवीन पार्किंगचे नियोजन आहे. त्यादृष्टीने लवकरच पावले टाकण्यात येतील.
५) तीर्थक्षेत्र अक्कलकोट विकासासाठी काय करणार?
तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबविण्यात येणार असून त्या अंतर्गत पालखी मार्गही होईल. नमो योजनेतून शहरातील उद्याने विकसित करण्यात येणार आहेत. तसेच वृक्षारोपण करणे, सोलरचे दिवे व हायमॅक्स दिवे बसवून शहर सुंदर बनविण्याचा मानस आहे. सांडपाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा शेतीसाठी पुनर्वापर करण्याची योजना मंजूर आहे. ती पूर्ण करणार आहे. शहरातील प्रमुख चौकांचे सुशोभीकरण करून चौक विकसित करणार आहे.
६) आध्यात्मिक पर्यटनासोबत इतर पर्यटनासाठी काय नियोजन आहे?
आध्यात्मिक पर्यटनाच्यासोबत देशभरात येणाऱ्या भाविकांनी या ठिकाणी जास्त दिवस राहून या ठिकाणच्या पर्यटनाचा लाभ घ्यावा यासाठी हत्ती तलाव येथे दहा कोटी रुपये खर्चून तलावाचे सुशोभीकरण बोटिंग सुविधा करण्यात येणार आहे. तसेच श्री मल्लिकार्जुन मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात येत असून एक सुंदर व देखणे, रेखीव दगडातील हे मंदिर उभे राहत आहे. शहरातील धार्मिक ट्रस्ट, संस्था व सामाजिक संस्था यांचे सहकार्य घेऊन अक्कलकोट शहराला देशभरातील धार्मिक पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपास आणणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.