अकोला
मित्रपक्षांच्या बळावर भाजप सत्तेच्या जवळ
योगेश फरपट
अकोला : महानगरपालिकेच्या ८० जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, कोणत्याही एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. मात्र सर्वाधिक ३८ जागा जिंकणाऱ्या भाजपने मित्रपक्ष आणि काही अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. निकालानंतरचे सत्तागणित पाहता भाजप-शिवसेना -राष्ट्रवादी कॉंग्रेस या महायुतीकडे थेट बहुमत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अकोला महापालिका निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी ४१ च्या बहुमताचा आकडा गाठण्यात तो स्वबळावर अपयशी ठरला. विशेष म्हणजे मागील वेळचा ४८ नगरसेवकांचा आकडाही भाजपला गाठता आला नाही व फक्त ३८ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसने २१ जागा जिंकून मागीलपेक्षा आठ जागांची वाढ करीत प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका मजबूत केली आहे. शिवसेना (यूबीटी) पक्षाला ६, वंचित बहुजन आघाडीला ५, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि एमआयएमला प्रत्येकी तीन जागा मिळाल्या आहेत. तर.शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष, अपक्ष, शहर विकास आघाडी यांना प्रत्येकी एक जागा मिळाली.
निकालानंतरचे सत्तागणित पाहता भाजपसाठी परिस्थिती अनुकूल ठरते. शिवसेना , राष्ट्रवादी कॉंग्रेस, अपक्ष आणि शहर विकास आघाडी यांच्या पाठिंब्याने भाजपकडे एकूण ४२ नगरसेवकांचे संख्याबळ होते. हे सत्तास्थापनेचे गणित तुलनेने स्थिर आणि स्पष्ट मानले जात आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षांकडे संख्याबळ असले तरी एकत्र येण्यासाठी आवश्यक राजकीय सहमती आणि गणित जुळत नाही. काँग्रेस आणि शिवसेना (यूबीटी) पक्ष यांची एकत्रित ताकदही बहुमतापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे विरोधकांची भूमिका महापालिकेत प्रभावी असली, तरी सत्तेवर दावा करण्याइतकी मजबूत नाही. एकूणच अकोला महापालिकेचा निकाल हा राज्यातील सत्तासमीकरणांचे प्रतिबिंब दाखवणारा आहे. भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्याचे वास्तव असले तरी मित्रपक्षांच्या साहाय्याने सत्ता स्थापनेसाठी आवश्यक आकडा सहज गाठता आल्याने महापालिकेवर भाजपप्रणीत सत्तेची शक्यता ठोस झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.