Ashadhi Wari 2024 esakal
पुणे

Ashadhi Wari 2024: पावसाच्या सरींच्या साथीने अवघा वैष्णवांचा मेळा पुण्यनगरीत दाखल! दर्शनासाठी लोटला भाविकांचा जनसागर

Ashadhi Wari News: राज्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावल्याने पेरण्या उरकून लाखो वारकऱ्यांची पाऊले पंढरीच्या वारीसाठी देहू-आळंदीकडे वळली. संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने देहू-आळंदीतून प्रस्थान ठेवले. विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने निघालेले वारकरी व दोन्ही पालख्यांनी रविवारी दुपारच्या सुमारास पुण्याच्या वेशीत प्रवेश केला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे: कपाळी अष्टगंध, डोक्‍यावर गुलाबी फेटा, खांद्यावर भागवत धर्माची पताका घेऊन "ज्ञानोबा - तुकोबा'च्या नावाचा जप करत पंढरीला निघालेला अवघा वैष्णवांचा मेळा रविवारी पुण्यनगरीत दाखल झाला. दिवसभर आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो पुणेकरांचा माथा संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी रथावर टेकत असतानाच या भावभक्तिच्या सोहळ्याला खुद्द पावसानेही हजेरी लावली. रस्त्यांच्या दुतर्फा थांबलेल्या लाखो भाविकांनी पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करत, टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले, पालखीचे दर्शन घेत आपला नमस्कार पंढरीच्या विठ्ठलास पाठविला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या वारकऱ्यांचा यथोचित पाहुणचार करण्यास पुणेकर विसरले नाहीत.

राज्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावल्याने पेरण्या उरकून लाखो वारकऱ्यांची पाऊले पंढरीच्या वारीसाठी देहू-आळंदीकडे वळली. संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने देहू-आळंदीतून प्रस्थान ठेवले. विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने निघालेले वारकरी व दोन्ही पालख्यांनी रविवारी दुपारच्या सुमारास पुण्याच्या वेशीत प्रवेश केला. आळंदी रस्त्यावरील कळस येथे दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांनी संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज पी.बी, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप, किशोरी शिंदे, प्रभारी नगर सचिव योगिता भोसले आदी उपस्थित होते. दरम्यान, संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचा पालखी सोहळा देखील दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बोपोडी येथे दाखल झाला. यावेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज पी.बी. यांनी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन त्यांचे सन्मानपूर्वक स्वागत केले.

...अन्‌ रस्त्यांवर भरला वारकऱ्यांचा मेळा !

रविवारी सकाळपासूनच शहरातील बहुतांश रस्त्यावर वारकऱ्यांचे समूह दिसत होते. विशेषतः दुपारनंतर व पालख्यांचे आगमन झाल्यानंतर मुख्य रस्त्यांवर अक्षरशः वारकऱ्यांची लाट उसळली. टाळ मृदंगाच्या तालावर, रामकृष्ण हरीचा जयघोष करीत वारकरी शांतपणे पालखी मार्गावरून चालत होते. तर डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिलांचे समूह देखील आपापल्या दिंड्यासमवेत जात होते.

विठ्ठलाच्या नामसंकीर्तनात तल्लीन होऊन निघालेल्या वारकऱ्यांच्या पायावरही भाविक डोके ठेवून आशीर्वाद घेत होते. दिंड्यांसमवेतच्या प्रमुख संतांचे पालखी रथ, नगारा, मानाचे अश्‍व, पालखीमधील पादुका, पालखी रथ, रथाच्या बैलजोडीचेही दर्शन घेण्यास भाविक विसरले नाहीत. दिंड्यांसमवेत आयटी दिंडी, पर्यावरणपुरक दिंडी, ज्येष्ठ नागरिकांची दिंडी अशा विविध प्रकारच्या दिंड्यांनीही सहभाग घेतला होता. तर शहरातील काही नागरिकांचे समूह देखील दिंड्यांसमवेत पायी जात होते.

सुट्टीचा दिवस सार्थकी लागला !

रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने पुणेकरांना पालखीचे दर्शन घेणे सोईस्कर ठरले. रविवारी दुपारपासूनच आळंदी रस्ता, बोपोडी येथील जुना मुंबई पुणे महामार्ग, शिवाजीनगर, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, लक्ष्मी रस्ता, नाना पेठ व भवानी पेठ या ठिकाणी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रस्त्याच्या दुतर्फा भाविक आपल्या कुटुंबासमवेत पालखीचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते. लहान मुलांची वारकरी, विठ्ठल, रुक्मिणीची वेशभूषा करण्यात आली होती.

अनेक तरुण-तरुणींनी पारंपरिक वेशभूषा करून पालखीच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती. पालखीतील दिंड्यांमध्ये सहभागी झालेले वारकरी, अश्‍व, पालखी रथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अक्षरशः रीघ लागली होती. पालखीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या अंथरण्यात आल्या होत्या. अनेक संस्था, संघटना, कंपन्या, राजकीय पक्ष यांच्याकडून वारकऱ्यांना ठिकठिकाणी चहा, पाणी, बिस्किटे, फराळाचे जिन्नस, छत्र्या, रेनकोट, वस्तु ठेवण्यासाठी पिशव्या अशा वस्तुंचे वाटप करण्यात आले.

राजकीय पक्षही निघाले भक्तिरसात न्हाऊन निघाले !

विविध राजकीय पक्षांकडून पालखी सोहळ्याचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी दापोडी व विश्रांतवाडी येथे दोन्ही पालख्यांचे स्वागत केले. शहर कॉंग्रेस पक्षाच्यावतीने बोपोडी, म्हस्के वस्ती येथे स्वागत करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह विनोद रणपिसे, राजीव ठोंबरे, राजेंद्र भुतडा, सुंदराताई ओव्हाळ आदी उपस्थित होते.

भाजपच्यावतीने फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील संत ज्ञानेश्‍वर महाराज पादुका चौक, संत तुकाराम महाराज पादुका चौक येथे पालख्यांचे स्वागत करण्यात आले. केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात आरती करण्यात आली. तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तुकाराम पादुका चौक येथे पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, राजेश पांडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis: शेंडापार्कात लवकरच सर्किट बेंच इमारत: मुख्यमंत्री फडणवीस; सर्किट बेंचमुळे कोल्हापुरात विकासाचे दालन उघडले

Shravan Somvar 2025 Vrat Smoothie: शेवटच्या श्रावणी सोमवारी उपवासाला बनवा पौष्टिक स्मूदी, दिवसभर राहाल उत्साही

Pakistan Rainfall Update: 'पाकिस्तानला जोरदार पावसाचा इशारा'; मृतांची संख्या ३२७ वर, शेकडोंचे स्थलांतर

लाडक्या बहिणींच्या पतसंस्था स्थापनेस ब्रेक! शहरातील वॉर्डात, गावात, तालुक्यांतून नाही प्रतिसाद; आता जिल्ह्यात असणार एकच पतसंस्था

सोलापूर शहरात ‘डीजे’चा आवाज १२० डेसिबलपेक्षा जास्त! पोलिस अन्‌ नेत्यांच्या कानात बोळे, अधिकारी झाले बधीर; आवाज मोजणाऱ्या पोलिसांकडील मशीन नावालाच

SCROLL FOR NEXT