BAR26B13063
कंत्राटी कर्मचारी ९ महिन्यांपासून विनावेतन
बार्शी नगरपरिषदेतील कामगारांवर उपासमारीची वेळ; वसुली जोमात असतानाही पगार नाही
सकाळ वृत्तसेवा
बार्शी शहर, ता. २४ : सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि ‘अ’ वर्ग म्हणून डंका पिटणाऱ्या बार्शी नगरपरिषदेत कंत्राटी संगणक कर्मचारी मात्र ९ महिन्यांपासून विनावेतन काम करत आहेत. अभय योजनेतून नगरपालिकेकडे २०२४-२०२५ अखेर २४ कोटी ६५ लाख २० हजार १६ रुपये जमा आहेत. तसेच सध्या वसुली देखील जोमात सुरू असतानाही कर्मचाऱ्यांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे.
याबाबत संबंधित ठेकेदार अमित निकम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. नगरपरिषदेच्या जन्म मृत्यू नोंदणी, नागरी सुविधा केंद्र, करवसुली विभाग, बांधकाम विभाग, लेखा विभाग, आरोग्य विभाग अशा विविध विभागात सुमारे २२ कंत्राटी संगणक ऑपरेटर कामासाठी आहेत. कंत्राटदारामार्फत हे कर्मचारी आवश्यक ती सर्व कामे करतात. पण एक ना दोन तब्बल ९ महिने यांना वेतनच दिले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच वेतनाबाबत बोलले तर त्यांना कामावरून कमी करण्याची धमकी देखील दिली जाते.
यापूर्वी नगरपरिषदेत प्रशासक होते. त्यावेळीही कंत्राटी कर्मचाऱ्यांची अशीच अवस्था होती. सध्या नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता आहे. आता तरी त्यांना ९ महिन्यांचे वेतन वेळेवर मिळणार की २/३ महिन्यांचे वेतन देऊन कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणार अशीच चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे. सध्या घरपट्टी भरणा भरण्याचे काम जोमाने सुरू आहे. नगरपरिषदेच्या तिजोरीतही कोट्यवधीची रक्कम जमा होत असतानाही कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन ९-९ महिने प्रलंबित राहते, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
कोट
- कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची बिले तयार आहेत. पण सध्या कोणत्या विभागात राहिली आहेत ते पाहून कंत्राटदारामार्फत लवकरात लवकरच त्यांचे वेतन अदा करू.
राजाराम नरुटे, उपमुख्याधिकारी, बार्शी नगरपरिषद
पूर्ण वेतन देण्याची कामगारांची मागणी
कंत्राटदारांकडून कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन दिले जात नसल्याची तक्रार आहे. अनेक महिन्यांचा पगार थकल्यानंतर केवळ २ ते ३ महिन्यांचा पगार अदा केला जातो आणि बाकी वेतन पुन्हा तसेच पुढच्या वेळीसाठी ठेवले जात आहे. काम करत असताना पगार वेळेवर देऊन थकीत पूर्ण पगार देण्याची मागणी केली जात आहे.