गवंडी कामगार ते नगरसेवक पदाला गवसणी
भीमाशंकर माऊर यांचा संघर्षमय प्रवास; मलकापूर पालिकेत मिळाली संधी
मलकापूर, ता. ३० : येथील पालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर एका अपक्ष उमेदवाराच्या विजयाची जोरदार चर्चा सुरू आहे. गवंडी कामगार ते थेट नगरसेवक पदाला गवसणी घालणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील भीमाशंकर माऊर (मिस्त्री) यांच्या संघर्षमय प्रवासाचे शहरात कौतुक होत आहे.
श्री. माऊर यांचे मूळ गाव कर्नाटक येथील सिंदगी आहे. १९८४ मध्ये ते कामाच्या शोधात कऱ्हाडमध्ये आले. तेव्हा ते १२ वर्षांचे होते. राहायला जागा मिळत नसल्याने मार्केट यार्डच्या कट्ट्यावर राहात होते. दिवसभर मोलमजुरी करून संध्याकाळी कट्ट्यावर झोपत. तो कट्टा त्यांचे घर बनले होते. त्यानंतर तेथेच एक झोपडी बांधून परिवारासह ते राहू लागले. घर चालवण्यासाठी गवंड्याच्या हाताखाली काम केले. कामावरची निष्ठा, प्रामाणिकपणा आणि कामाची आवड यामुळे ते पुढे ठेकेदार झाले. त्यानंतर मळाई ग्रुपच्या सहकार्याने बिल्डिंग व प्लॉटिंग व्यवसायही सुरू केला. बांधकाम व्यवसायात हात बसला. रो हाऊस, अपार्टमेंट्स, प्लॉटिंग प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करत नाव कमावले.
श्री. माऊर यांचे शिक्षण चौथीपर्यंत झाले असले, तरी गावातील विद्यार्थ्यांसाठी भीमा युनिव्हर्सल सीबीएससी स्कूल सुरू केले आहे. त्याचे ते ट्रस्टी आहेत. श्री मळाई पतसंस्थेचे संचालक, मलकापूर जिमखान्याचे संचालक म्हणून काम करत आहेत. सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे कचरा निर्मूलन, रक्तदान शिबिरे उपक्रम राबवले आहेत. संगमनगर येथील वीस वर्षांपासून रखडलेला रस्ता व मालकीच्या जागेतून सुरू करून नागरिकांची सोय केली.
लहानपणापासून समाजसेवेची आवड असल्याने त्यांनी मळाई ग्रुपचे अशोकराव थोरात त्यांच्याबरोबर सामाजिक माध्यमातून समाजकारणाला प्रारंभ केला.
मलकापूरमध्ये सामाजिक, धार्मिक व जनसंपर्काचे जाळे उभे केले. वाचनालय, योगा सेंटर उभारले. मंदिरांच्या जीर्णोद्धारास सढळ हाताने मदत, सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग, गोरगरिबांच्या अडचणी समजून त्यांना मदत केली आहे. अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व विधायक हिताचे उपक्रम राबविले.
गवंडी कामगार ते नगरसेवकपदापर्यंत हा संघर्ष प्रवास नागरिकांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे. परराज्यातून मोलमजुरीसाठी आलेला युवक ज्याला राहिला घर नव्हते, मात्र त्यांनी जिद्दीच्या जोरावर संघर्ष करत नगरसेवक पदाला गवसणी घातली. जिद्द, चिकाटी व प्रामाणिकपणा असेल तर माणूस काय करू शकतो, त्याचे मूर्तिमंत उदाहरण श्री. माऊर यांच्या कृतीतून दिसून येत आहे.
-------------------------
नागरिकांच्या आग्रहास्तव रिंगणात
मलकापुरात ते भाजपचे पक्षाचे काम करत होते. २०१९ मध्ये तिकीट नाकारले, तरीही त्यांनी भाजपशी निष्ठा ठेवून प्रामाणिक काम सुरू ठेवले होते. सध्याच्या निवडणुकीत भाजपकडून अर्ज भरला; पण पुन्हा उमेदवारी नाकारली. नागरिकांच्या आग्रहास्तव त्यांनी अपक्ष अर्ज भरला. नागरिकांनी त्यांना मोठा प्रतिसाद दिला. भाजपचे माजी नगरसेवक दिनेश रैनाक यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, राजकारणाचा दूरवर संबंध नसताना अपक्ष निवडणूक लढवून ते जिंकून आले.
-----------------------
01139
भीमाशंकर माऊर
----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.