‘बोंडारवाडी’साठी ५४ गावे करणार आंदोलन
डॉ. भारत पाटणकर; केळघरमध्ये २२ मार्चला मेळावा, धरणाच्या ट्रायल पीटसह विविध मागण्या
केळघर, ता. ३ : बोंडारवाडी धरण प्रकल्पाची ट्रायल पीट रखडली असून, वारंवार लोकशाही मार्गाने निवेदने, आंदोलन करूनही प्रशासन वेळकाढूपणा करत आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रमिक मुक्ती दल व बोंडारवाडी धरण कृती समितीच्या वतीने ५४ गावांतील ग्रामस्थांचा केळघरला २२ मार्चला मेळावा होणार असून, त्यावेळी आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात येणार आहे. धरणाची ट्रायल पीट होत नाही तोपर्यंत सिंचन विभागाच्या कार्यालयासमोर ५४ गावांच्या वतीने ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.
बोंडारवाडी धरण कृती समितीच्या वतीने गवडी येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी बोंडारवाडी धरण कृती समितीचे प्रमुख कार्यकर्ते, विविध गावचे पदाधिकारी उपस्थितीत होते.
भारत पाटणकर म्हणाले, ‘‘धरणासाठी एक टीएमसी पाणी सरकारकडून मंजूर करून घेतले आहे. आता सरकारची जबाबदारी आहे. धरणाचे काम गतीने पूर्ण करून घेण्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली जाणार आहेत. त्यांचे योग्य पुनर्वसन करणे, त्यांना योग्य मोबदला देणे याबाबत आराखडा तयार करणे व धरणासाठी ट्रायलपीटचे काम गतीने करून सविस्तर अंदाजपत्रक तयार करून ते पुढे पाठवून प्रशासकीय मंजुरी घेणे गरजेचे आहे. गेली दोन वर्ष प्रशासन फारच धिम्या गतीने सुरू आहे. यासाठी प्रशासन व सरकारला जाग आणण्यासाठी २२ मार्च रोजी भव्य मेळावा घेणार आहे.’’
बोंडारवाडी धरण कृती समिती निमंत्रक आदिनाथ ओंबळे म्हणाले, ‘‘जावळी तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळाले पाहिजे, हे एकमेव ध्येय घेऊन (कै.) विजयराव मोकाशी यांनी गावागावांत जाऊन समाजप्रबोधन केले. सामान्य शेतकऱ्याला शेतीला पाणी मिळू शकते, हे स्वप्न शेतकऱ्यांना दाखवले. शेतकऱ्याचे संघटन करून बोंडारवाडी धरण कृती समितीच्या माध्यमातून पाणी चळवळ सुरू केली असून, ती शेतकऱ्यांच्या शेतात पाणी येत नाही तोपर्यंत चालू ठेऊ.’’
या वेळी श्रमिक मुक्ती दलाचे राज्य समन्वयक संतोष गोटल, व्यसनमुक्त संघटनेचे विलासबाबा जवळ, कृती समितीचे सक्रिय सदस्य नारायण धनावडे, सरपंच, शेतकरी उपस्थित होते.
26A01414
गवडी : बोंडारवाडी धरण कृती समितीच्या वतीने आयोजित बैठकीत बोलताना डॉ. भारत पाटणकर. त्या वेळी आदिनाथ ओंबळे, संतोष गोटल, विलासबाबा जवळ आदी.