PNE26W29784, PNE26W29785, PNE26W29786
बोरामणी : पाण्याच्या शोधातील काळवीट. (दुसऱ्या छायाचित्रात) चाऱ्याच्या शोधातील हरीण. (तिसऱ्या छायाचित्रात) उन्हाने त्रस्त झालेला तुरेवाला चंडोल पक्षी. (सर्व छायाचित्रे : नरेंद्र गायकवाड).
पावसाअभावी वन्यजीव संकटात
बोरामणी, नान्नजच्या माळरानावर प्राण्यांची भटकंती
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २५ : जून महिना संपत आला, तरी जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाने दडी मारल्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा फटका समृद्ध वन्यजीवसंपदेला बसत आहे. जिल्ह्यातील बोरामणी, नान्नज आणि गंगेवाडी येथील वन्यजीवांना पाणी आणि चाऱ्याचे तीव्र दुर्भिक्ष जाणवू लागले आहे.
पुरेसा पाऊस न पडल्याने अद्याप माळरानावर गवताचा एकही अंकुर उगवलेला नाही. पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत असलेले छोटे-मोठे ओढे आणि नाले पूर्णपणे कोरडे पडले आहेत. नैसर्गिक पाणवठे सुकल्यामुळे वन्यजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भीषण परिस्थितीमुळे हरीण, काळवीट, ससे, खोकड आणि लांडगे यांसारख्या प्राण्यांना तसेच विविध प्रजातींच्या पक्ष्यांना अन्न व पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत आहे.
अन्न-पाण्याच्या शोधात हे वन्यजीव अनेकदा मानवी वस्तीकडे किंवा महामार्गांकडे धाव घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या अपघातांचा आणि शिकारीचा धोका वाढला आहे. पाऊस नसल्याने पूर्णपणे विदारक आणि कोरडे पडलेल्या या भागात काळविटांचे कळप अन्नाच्या शोधात जमिनीवर काहीतरी शोधताना दिसत आहेत.
कृत्रिम पाणवठे नियमित भरणे आवश्यक
नैसर्गिक परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे आता वन विभागाने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये नियमितपणे पाणी भरणे गरजेचे आहे. वन्यजीवांचे प्राण वाचवण्यासाठी वनक्षेत्रातील कृत्रिम पाणवठे टँकरद्वारे तातडीने भरावेत, अशी मागणी होत आहे. पाण्यासाठी भटकणारे प्राणी मानवी वस्तीत आल्यास त्यांना इजा होऊ नये, यासाठी विशेष गस्त घालण्याचीही मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.